पुणे प्रवाह न्युज पोर्टल
भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री व कामगारमंत्री यांच्याकडे मागणी
पिंपरी दि.११ (प्रतिनिधी) - राज्यातील बांधकाम कामगारांच्या आरोग्याचा व सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण असताना भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री व कामगारमंत्री यांच्याकडे या कामगारांसाठी पुर्वी असणारी (मेडिक्लेम) आरोग्य योजना तात्काळ सुरू करून नोंदणी व नुतनीकरणातील ऑनलाइनचा त्रास कमी करून योजनेच्या जाचक अटी शिथिल करण्याची मागणी केली आहे.
भाजप कामगार आघाडीचे शहराध्यक्ष प्रकाश मुगडे यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हणले आहे की, "महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना सध्या खुप जाचक अटी नियमांमुळे मिळणाऱ्या लाभांपासुन वंचित राहावे लागत आहे. हे खुप खेदजनक बाब आहे.
बांधकाम कामगारांना आता ऑनलाइन नोंदणी करण्याची सक्ती असल्याने कित्येक अडचणीचा सामना करावा लागत आहे, तसेच जुन्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना नुतनीकरण करण्यासाठी खुप त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे कामगारांना मिळणाऱ्या लाभापासुन बांधकाम कामगार वंचित राहत असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे.
नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मिळत असणाऱ्या अटल आहार योजनेतही सुसुत्रता नसल्याने मर्जीतील बांधकाम व्यावसायिकांच्या साईटवरच ही योजना सुरू आहे. मग नाका कामगारांवर अन्याय का ? खरी गरज ही नाका कामगारांना असताना त्यांच्याकडे आपले सरकार डोळेझाक करत आहे.
बांधकाम कामगारांच्या आरोग्यासाठी लवकरात लवकर पुर्वी असणारी आरोग्य योजना (मेडिक्लेम) सुरू करण्यात यावी, सध्या राज्यातील बांधकाम कामगार जीवाची कसली पर्वा न करता मृत्यूच्या दाढेत काम करत असतो तरी या कामगारांच्या हितासाठी आपण बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील शिल्लक असलेल्या रक्कमेतुन आरोग्य योजना (मेडिक्लेम) साठी निधी उपलब्ध करून त्याचा प्रिमियम तात्काळ भरण्यासाठी पुढाकार घ्यावा. बांधकाम कामगार व त्याच्या कुटुंबातील सदस्यांना चांगली आरोग्यसेवा व चांगले उपचार मिळावेत तसेच कामगार नवीन नोंदणी व नुतनीकरण यातील व योजनेचा लाभ देताना जाचक अटी कमी करून बांधकाम कामगारांच्या हिताचा निर्णय घ्यावा" असे निवेदनात म्हणले आहे.
हे निवेदन भाजप कामगार आघाडी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष प्रकाश मुगडे, सरचिटणीस किशोर हातागळे, रंगनाथ पवार, उपाध्यक्ष सचिन शिंदे, काशिराम कर्डिले यांच्या वतीने मुख्यमंत्री व कामगारमंत्री यांना देण्यात आले आहे.
- भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस पदी किशोर हातागळे यांची नियुक्ती
- भाजप शहराध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र
- संघटीत कामगारांसोबत असंघटित कामगारांच्या हितासाठी भरीव काम करणार असल्याचे हातागळे यांचे आश्वासन
पिंपरी दि.०४ (प्रतिनिधी) - भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याची नवनिर्वाचित कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. भाजप शहराध्यक्ष तथा भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या शुभहस्ते किशोर हातागळे यांची कामगार आघाडीच्या पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
किशोर हातागळे यांनी या अगोदर बांधकाम कामगारांसाठी हजारो असंघटित कामगारांना विविध शासकीय योजनेचा लाभ देत कामगार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, याचबरोबर निगडी भाजप अध्यक्ष ही जबाबदारीही त्यांनी पार पाडली असुन शहरातील विविध प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवला होता.
कोरोना महामारीमुळे संघटित व असंघटित कामगारांनावर बेरोजगाराची व उपासमारीची वेळ आहे सध्या कामगार हा खुप अडचणीत असुन भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीच्या माध्यमातुन कामगारांच्या न्याय व हक्कासाठी भरीव काम करणार असल्याचे मत नवनिर्वाचित सरचिटणीस किशोर हातागळे यांनी व्यक्त केले.
यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, भाजप महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य एकनाथ पवार, नगरसेवक तथा भाजप कामगार आघाडी प्रदेश सरचिटणीस केशव घोळवे, भाजप प्रदेश सरचिटणीस प्रिती व्हिक्टर, भाजप कामगार आघाडीचे शहराध्यक्ष प्रकाश मुगडे हे उपस्थित होते.