माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंच्या पदरी निराशा ;  जदयूकडून तिकीट नाही , भा.ज.पा.नं उमेदवाराच्या नावाची केली घोषणा.....

पुणे प्रवाह न्युज पोर्टल बिहार :- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लगबगीनं स्वेच्छानिवृत्ती घेत जदयूमध्ये प्रवेश करणारे बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांची निराशा झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची पहिली यादी जदयू व भा.ज.पा.कडून जाहीर करण्यात आली. यात ज्या बक्सर विधानसभा मतदारसंघातून पांडे निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. जदयूनं जाहीर केलेल्या यादीत पांडे यांचं नाव नव्हते. त्यामुळे भा.ज.पा.कडून त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा होती. मात्र, भा.ज.पा.नं दुसराच उमेदवार घोषित केल्यानं पांडे यांची निराशा झाली आहे. उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर पांडे यांनी आपली भूमिका मांडली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणामुळे चर्चेत आलेले बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांना जनता दल (संयुक्त) व भा.ज.पा. या दोन्ही पक्षांनी निवडणुकीपासून दूर ठेवलं आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणामुळे चर्चेत आलेले पांडे बिहार विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा आधीपासूनच सुरू झाल्या होत्या. निवडणूक जवळ आल्यानंतर पांडे यांनी अचानक स्वेच्छानिवृत्ती घेत जदयूमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांना जदयूकडून तिकीट मिळण्याची शक्यता होती. गुप्तेश्वर पांडे बक्सर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र, एन.डी.ए.च्या जागावाटपात बक्सर मतदारसंघ भा.ज.पा.कडे गेला. त्यात जदयूनं जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत पांडे यांचा पत्ता कापण्यात आल्याचं समोर आलं. पण भा.ज.पा.कडून त्यांच्या नावाची घोषणा होण्याची चर्चा सुरू होती. मात्र, भा.ज.पा.नं बक्सरमधून परशुराम चतुर्वेदी यांना उमेदवारी दिली. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून पांडे यांच्या पदरी निराशा पडली.