हृदयरोग टाळण्यासाठी मांसाहार, व्यसन वर्ज्य करण्याची आवश्यकता डॉ. कल्याण गंगवाल; जागतिक हृदय दिवसानिमित्त 'सुर्यदत्ता'तर्फे सन्मान

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


हृदयरोग टाळण्यासाठी मांसाहार,


व्यसन वर्ज्य करण्याची आवश्यकता


डॉ. कल्याण गंगवाल; जागतिक हृदय दिवसानिमित्त 'सुर्यदत्ता'तर्फे सन्मान


पुणे : "बदलती जीवनशैली, मानसिक तणाव, व्यायामाचा अभाव, मांसाहाराचा अतिरेक आणि वाढती व्यसने यामुळे हृदयरोगाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. येत्या काही वर्षात भारत हृदयरोगाची राजधानी बनू पाहत आहे. हे टाळण्यासाठी आपल्याला सदाचारी, शाकाहारी आणि व्यसनमुक्त जीवनपद्धती अवलंबण्याची आवश्यकता आहे," असे मत शाकाहार पुरस्कर्ते आणि सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. कल्याण गंगवाल यांनी व्यक्त केले.


जागतिक हृदयरोग दिवसाच्या निमित्ताने सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने डॉ. कल्याण गंगवाल यांना 'सुर्यदत्ता हृदयस्पर्शी आंतरराष्ट्रीय पुरस्कार २०२०' देऊन सन्मानित करण्यात आले. बावधन कॅम्पसमध्ये झालेल्या या सोहळ्याप्रसंगी सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, कार्यकारी संचालक प्रा. डॉ. शैलेश कासंडे, अधिष्ठाता डॉ. प्रतीक्षा वाबळे, माजी विद्यार्थी प्रशांत दवे, आदी उपस्थित होते.


डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, "मद्यपान, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन यामुळे हृदयरोग होण्याचे प्रमाण तिशीत आले आहे. या तरुण पिढीला निरोगी आयुष्य जगायचे असेल, तर सदाचारी आणि व्यसनमुक्त होण्याची गरज आहे. तणावापासून दूर राहण्यासह स्थूलता वाढणार नाही याची काळजी घ्यायला हवी. आहार, विहार, विचार आणि आचार चांगले असणे गरजेचे आहे. आज व्यसनांना मिळणारी प्रतिष्ठा घातक ठरत आहे. व्यसनांच्या आहारी गेलेल्या सेलिब्रिटींच्या प्रेमात पडणे थांबवले पाहिजे. आजच्या या दिवसाच्या निमित्ताने हृदयरोगाच्या बाबतीत जगभरात जनजागृती होत आहे, ही सकारात्मक बाब आहे."


प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, "डॉक्टरांनी दिलेल्या आहार, विहार, आचार आणि विचार या चतु:सूत्रीचे पालन करू. सुर्यदत्तामध्ये नेहमीच्या शकाहाराला प्रोत्साहन दिले जाते. येथील विद्यार्थ्यांना, शिक्षकांना व सर्व स्टाफला व्यसनमुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. माणसांसह पशु-पक्ष्यांच्याही हृदयाला हात घालून त्यांचे प्रेम जिंकणाऱ्या डॉ. कल्याण गंगवाल यांना हा पुरस्कार देऊन सन्मान करताना आम्हाला आनंद होतो." प्रा. सुनील धनगर यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.


------------------


चौकट


कोरोनाची भीती बाळगू नका, काळजी घ्या


वाफ घेणे, गरम पाणी पिणे, प्रतिकारशक्ती वाढवणे, मांसाहार टाळणे गरजेचे आहे. कोरोना हा काळजी करण्याचा नव्हे, तर काळजी घेण्याचा आजार आहे. स्थूलता, मधुमेह, हृदयरोग, श्वसनाचे आजार हे कोरोनाला पूरक आहेत. त्यामुळे योग्य व्यायाम आणि आहार घेतला, तर कोरोनवर सहज मात करता येते. गंभीर लक्षणे असतील तरच डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात जावे. अन्यथा दहा ते बारा दिवस घरीच थांबून योग्य ती काळजी घेतली तर कोरोना सहज बरा होतो