पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पुणे : देशाचा इतिहास पाहिला तर प्रत्येक चळवळीतील कार्यकर्ता हा प्रथम गणेशोत्सव कार्यकर्ता असतो. सर्व जातीधर्मातील लोक एकत्र येवून गणेशोत्सव साजरा करतात. गणेशोत्सव म्हणजे सामाजिक समरसतेचा उत्सव आहे, असे मत गणेशोत्सवाचे अभ्यासक आनंद सराफ यांनी व्यक्त केले.
भवानी पेठेतील श्री शिवाजी मित्र मंडळ ट्रस्टच्यावतीने कोरोनाच्या काळात मदत करणाºया गणपती मंडळांना श्री गणेश कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी साईनाथ मंडळ ट्रस्टचे पीयुष शाह, श्री शिवाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रल्हादभाऊ थोरात, कार्याध्यक्ष गोविंदा वरंदानी, गणेश गोळे, सुहास जगताप, हसिम खान, विजय पुर्सनानी उपस्थित होते.
यावेळी सेवा मित्र मंडळ, अखिल मोहननगर मित्र मंडळ, महाराष्ट्र तरुण मंडळ, वीर हनुमान मित्र मंडळ, युगंधर मित्र मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ, साईनाथ मंडळ ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ तरुण मंडळ, हिंद तरुण मंडळ कॅम्प, श्रीकृष्ण मित्र मंडळ या मंडळांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानाचे उपरणे, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
आनंद सराफ म्हणाले, अर्थव्यवस्थेला चालना देणार हा उत्सव आहे. गणेशोत्सव नेटका पार पाडण्यासाठी कार्यकर्ता हा तत्पर असतोच, परंतु समाजावर जर संटक आले तर हाच कार्यकर्ता मदतीसाठी सर्वात आधी पुढे येतो. कोरोनाच्या काळातही हे दिसून आले आहे. त्यामुळे अशा कार्यतत्पर गणेशोत्सव कार्यकर्त्यांचे कौतुक प्रत्येकाने केले पाहिजे.
प्रल्हादभाऊ थोरात म्हणाले, गेल्या पाच महिन्यांच्या कोरोनाकाळात समाजासाठी अतुलनीय योगदान देणा-यांचा सन्मान मंडळाच्यावतीने करण्यात आला. स्मशानभूमीत काम करणारे कर्मचारी, पोलीस बांधव व अधिकारी, डॉक्टर, नर्स, हॉस्पिटलमधील इतर कर्मचारी, रुग्णवाहिका चालक, महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी व अधिकारी, महावितरणमधील अधिकारी आणि कर्मचाºयांच्या कार्यला सलाम करण्यासाठी मंडळाच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. कोरोनाच्या काळात २०० नागरिकांना भोजन व शिधा वाटप सलग ३ महिने करण्यात आले.
*फोटो ओळ - भवानी पेठेतील श्री शिवाजी मित्र मंडळ ट्रस्टच्यावतीने कोरोनाच्या काळात मदत करणा-या गणपती मंडळांना श्री गणेश कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर व सन्मानार्थी.