फिरत्या विसर्जन हौदांची संख्या वाढवणार - महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

पुणे प्रवाह न्युज पोर्टल



          - फिरत्या हौदांचे लोकेशनही समजणार


- ९० टक्के पुणेकरांकडून गणेश मूर्तींचे घरच्या घरीच विसर्जन


पुणे | प्रतिनिधी


घरच्या घरीच बाप्पाचे विसर्जन या आपल्या आवाहनाला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. गणेश विसर्जन पुणेकरांना आणखी सोयीस्कर व्हावे यासाठी पर्यावरणपूरक फिरत्या हौदांची संख्या वाढण्यात येणार असून हौदांचे लोकेशनही क्षेत्रिय कार्यालयांच्या माध्यमातून पुणेकरांना समजण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.


           गणेश विसर्जनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी महापौर मोहोळ यांनी महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन केले होते. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. बैठकीला स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासने, काँग्रेसचे गटनेते आबा बागुल, मनसे गटनेते वसंत मोरे, आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह विविध विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. दीड दिवसांच्या गणेश मूर्तींचे ९० टक्के विसर्जन घरच्या घरी झाले होते. याच कल गृहीत फिरत्या हौदांचे नियोजन करण्यात येत आहे.


         यावेळी माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, 'कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक भान जपत पुणेकरांनी आपल्या आवाहनाला प्रतिसाद दिला असून आपल्या घरीच गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यास पसंती दिली आहे. दीड दिवसांच्या जवळपास ९० टक्के मूर्तींचे विसर्जन नागरिकांनी घरातच केले. याबद्दल पुणेकरांचे अभिनंदन आणि धन्यवाद. याच अनुषंगाने पुढील नियोजन करण्यात येत आहे. माझी पुणेकरांना विनंती आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरच्या घरीच विसर्जन करण्यास प्राधान्य द्यावे'.


गेल्या वर्षी दीड दिवसांच्या १३ हजार ५८५, पाचव्या दिवशी २५ हजार ८९६, सातव्या दिवशी २९ हजार ९९७ आणि शेवटच्या दिवशी ३ लाख ५५ हजार १५४ गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम हौदात करण्यात आले होते. यावेळी रासने यांनी शेवटच्या दिवशींच्या मूर्तींची संख्या लक्षात घेता नियोजन करावे, बागुल यांनी धार्मिक भावना लक्षात घेऊन नियोजन करावे तर मोरे यांनी विसर्जनाच्या नियोजनाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी उद्घोषणा आणि जाहिरात करण्याची सूचना केली.


पाचव्या, सातव्या आणि शेवटच्या दिवसाच्या विसर्जनाचे नियोजनही बैठकीत करण्यात आल्याचे महापौर मोहोळ यांनी सांगितले.