स्टार प्रवाहवरील ‘वैजू नंबर वन’ मालिकेच्या सेटवर रंगणार मंगळागौर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


स्टार प्रवाहवरील ‘वैजू नंबर वन’ मालिकेच्या सेटवर रंगणार मंगळागौर


 


श्रावण महिना सुरु झाला की आपसुकच सणांची चाहूल लागते. श्रावणातले उपास आणि व्रतवैकल्यांसोबत आवर्जून साजरी केली जाते ती मंगळागौर. मंगळागौरीचा हा सण म्हणजे तमाम स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय. मंगळागौरीच्या याच सणाचा जल्लोष स्टार प्रवाहवरील ‘वैजू नंबर वन’ या मालिकेतही पाहायला मिळणार आहे. तिसरी मंझिलमधील लेडी गँग मंगळागौर खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. पण इथेही ट्विस्ट आहेच बरं का. कारण मंगळागौर जसा स्त्रियांचा आवडता सण तसाच गटारी अमावस्या हा पुरुषांच्या आवडीचा सण. तिसरी मंझिलमध्ये पुरुषांचा गटारी अमावस्येचा प्लॅन शिजत असताना या चाळीतल्या लेडी गँगने त्यात घोळ घातला. त्यामुळेच याचा बदला घेण्यासाठी मंगळागौरीच्या कार्यक्रमात गोंधळ उडावा यासाठीचा कट तिसरी मंझिलमधल्या पुरुषांनी रचलाय. त्यामुळे या महिलांची मंगळागौर निर्विघ्नपणे पार पडणार का हे पहाणं उत्सुकतेचं असेल.


 


या सणाच्या निमित्ताने संपूर्ण तिसरी मंझिल सजवण्यात आलीय. वैजू, तिची सासू आणि सगळ्याच महिलांनी पारंपारिक नऊवारी साडी परिधान केलीय. मंगळागौरीच्या खेळाची खास रंगीत तालीमही झालीय. त्यामुळे ‘वैजू नंबर वन’चा हा भाग मनोरंजनाने परिपूर्ण असणार यात शंका नाही. तेव्हा पाहायला विसरु नका ‘वैजू नंबर वन’ मालिकेचा हा मंगळागौर विशेष भाग या आठवड्यात रात्री १० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.