अतुलनीय शौर्याचा आणि अजोड स्वामीनिष्ठेचा पावनखिंडीतला थरार रुपेरी पडद्यावर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



 


‘जंगजौहर’ चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षक भेटीला


१३ जुलै १६६0


आषाढ शुद्ध पौर्णिमा


मराठेशाहीच्या इतिहासातील रक्तरंजित अध्याय याचदिवशी घोडखिंडीत लिहिला गेला.


अतुलनीय शौर्याचा आणि अजोड स्वामीनिष्ठेचा हा ठसठशीत वस्तूपाठ जगासमोर साकारला गेला.


बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या पराक्रमाचा हा थरार ‘जंगजौहर’ या मराठी चित्रपटाच्या रुपात लवकरच रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ अशा शिवचरित्रावर आधारीत यशस्वी चित्रपटांच्या मालिकेतील पुढचं सुवर्णपान युवा लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आपल्यापुढे उलगडणार आहेत. अजय आणि अनिरुद्ध आरेकर यांच्या ‘आलमंड्स क्रिएशन्स’ने या भव्य चित्रपटाची निर्मिती केली आहे


पावनखिंडीतल्या या रक्तरंजित संघर्षाला आता ३५० हून अधिक वर्षे उलटून गेलीत. हा शिवकाळ पुन्हा जिवंत करणं अतिशय आव्हानात्मक होतं. त्यासाठी आवश्यक भव्य सेट्स, अतिशय अवघड साहसदृश्ये आणि तांत्रिक कौशल्य यांची मोट बांधणं जिकीरीचं होतं. हे शिवधनुष्य दिग्पाल लांजेकर आणि त्यांच्या टीमने नेहमीच्या अभ्यासू वृत्तीने आणि मेहनतीने उचलले आहे. आधीच्या सिनेमांच्या अद्भुत अनुभवामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.


यात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर यांच्यासह सुमारे २१ कलाकारांची भली मोठी मांदियाळी दिसणार आहे. लहानपणापासून ऐकलेला पावनखिंडीतील दिव्य पराक्रमाचा इतिहास पडद्यावर अनुभवणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ‘जंगजौहर’ चित्रपटाचे चित्रीकरण संपवून लवकरच प्रदर्शनासाठी सज्ज होत आहे. त्याआधी १३ जुलैला, सोमवारी या चित्रपटाची पहिली झलक पोस्टर आणि टीझर रुपात आपल्याला पहायला मिळणार आहे.