पुणे प्रवाह न्युज पोर्टल
सैनिकांच्या पोलादी मनगटांकरीता
पुणे : शस्त्र हातात घेऊन निधडया छातीने देशाच्या सिमेवर शत्रूंच्या गोळ्यांचा सामना करण्यासाठी सज्ज असणा-या सैनिकांच्या पोलादी मनगटांकरीता पुणेकरांनी राखीचे प्रेमबंधन पाठविले. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचे संकट असले तरी देशाच्या सिमेवर रक्षणाकरीता अहोरात्र सज्ज असलेल्या जवानांना पुण्यातून पाठविण्यात येणा-या राख्यांचे पूजन करण्यात आले.
सैनिक मित्र परिवार व सहयोगी संस्थांतर्फे राखी पौर्णिमेनिमित्त व कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून देशाच्या सिमेवर लढणाºया जवानांसाठी पुणेकरांच्यावतीने ११ हजारपेक्षा जास्त राख्या पाठविण्यात आल्या. बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात प्रातिनिधीक स्वरुपात झालेल्या कार्यक्रमात उपमहापौर सरस्वती शेंडगे यांच्या हस्ते राखीपूजन झाले.
यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे, दत्तमंदिर ट्रस्टचे उत्सवप्रमुख शिरीष मोहिते, आनंद सराफ, लायन्स क्लब आॅफ पुणे विजयनगरचे अध्यक्ष अविनाश शहाणे, राजश्री शेठ, पराग ठाकूर, कल्याणी सराफ, सुरेखा होले, डिंपल ओसवाल, अल्पा भावसार आदी उपस्थित होते. लायन्स क्लब आॅफ पुणे विजयनगर ने उपक्रमात सहभाग घेतला.
सरस्वती शेंडगे म्हणाल्या, देशाच्या सिमेवर लढणारे सैनिक देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करतात, त्यामुळे त्यांची आठवण प्रत्येकाने ठेवायला हवी. पुण्यातून पाठविण्यात येणा-या राख्यांची सिमेवरील सैनिक दरवर्षी वाट पहात असतात. सैनिक हाच ध्यास आणि सैनिक हा देशाचा श्वास ही भावना मनात ठेऊन सैनिक मित्र परिवार व सहयोगी संस्थांतर्फे पाठविण्यात येणा-या राख्यांचा उपक्रम कौतुकास्पद आहे.
मनिषा झेंडे म्हणाले, सैनिक रात्रं-दिवस सिमेवर खडा पहारा देतात, त्यामुळे आपण येथे आनंदाचा श्वास घेऊन शकतो. सातत्याने पुण्यातून सलग २३ वर्षे या राख्या पाठविण्याचा उपक्रम राबविणे सोपे नाही. यामध्ये केवळ सामाजिक संस्थाच नाही, तर शाळा-महाविद्यालयांसह सामान्य नागरिकांना देखील सहभागी करुन घेतले जाते. त्यामुळे आपल्या भावना सैनिकांपर्यंत पोहोचत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
आनंद सराफ म्हणाले, भारतीय सण हे नाती दृढ करणारे सण आहेत. गेल्या काही वर्षांपासून या सणांना सामाजिकतेची जोड मिळत आहे. समाजाच्या या कृतज्ञतेचा प्रत्यय सैनिकांना करुन देण्यासाठी व त्यांनाही सण-उत्सव साजरा करता यावा, याकरीता १९९८ पासून हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. देशाच्या सिमाभागांत १५० पोस्टवर प्रत्येक रेजिमेंटमध्ये या राख्या पाठविल्यानंतर तेथे पूजन करुन सैनिकांपर्यंत पोहोचविल्या जातात. अनेकदा सैनिकांकडून राख्यांना उत्तर म्हणून पत्र आणि भेटवस्तूदेखील पुणेकरांना पाठविल्या जातात.
* फोटो ओळ : सैनिक मित्र परिवारातर्फे राखी पौर्णिमेनिमित्त व व कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून देशाच्या सिमेवर लढणाºया जवानांसाठी पुणेकरांच्यावतीने ११ हजारपेक्षा जास्त राख्या पाठविण्यात आल्या. बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात उपमहापौर सरस्वती शेंडगे यांच्या हस्ते राखीपूजन झाले.