राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी सुरेशभाऊ लाड यांची वर्णी !

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



 


कर्जत तालुका अध्यक्ष ते जिल्हाध्यक्ष एक अविस्मरणीय प्रवास !


कर्जत ता. 27 गणेश पवार


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रायगड जिल्हाध्यक्ष पदासाठी पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांचे अत्यंत विश्वासू शिलेदार व रायगडचे द्रोणाचार्य तथा गुरुबंधु खासदार सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय कर्जत – खालापूर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांची वर्णी लागल्याने रायगड सहीत कर्जत तालुक्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यात आनंदाचे उधाण आले , तर नवंनिर्वाचित जिल्हाध्यक्ष सुरेशभाऊ लाड यांच्यावर अभिनंदन शुभेच्छांचा वर्षाव झाला .


कर्जत – खालापूर विधानसभेतील राजकारणात सुरेशभाऊंचे नाव सर्व पक्षातील नेते – पदाधिकारी – कार्यकर्ते मोठ्या आदराने घेतात . मनमिळावू , सतत हसतमुख , सर्वांना आपुलकीची वागणूक देणारे भाऊ सर्वांनाच हवेहवेसे वाटणारे नेतृत्व . राजकारणात त्यांना जे भेटले , ते मिळविण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केलेले आहेत . त्यांचे बहूआयामी राजकीय पिंड दोन्ही तालुक्यातील राजकारणात ” न भूतो न भविष्यति ” असे पाहण्यास मिळाले आहे .म्हणूनच आज राष्ट्रवादी काँग्रेसचा वारू त्यांच्या नेतृत्वाखाली चौफेर उधळलेला पाहण्यास मिळत आहे .


सन १९८० च्या दशकात कर्जत तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले , तेंव्हापासून राजकीय पटलावर त्यांनी कधी मागे वळून बघितले नाही . दहिवली ग्रामपंचायतीचे सरपंच पद देखील त्यावेळी त्यांनी भूषविले . पक्ष संघटनेवर त्यांनी भर देऊन काँग्रेस पक्ष ग्रामीण भागापर्यंत पोहचवला .पक्षाने दिलेले काम ते त्यात जीव ओतून करत असल्याने त्यांचे कार्य प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनात जाऊन बसले , म्हणूनच विश्वासू कार्यकर्त्यांची फौज त्यांनी थोड्याच अवधीत तयार केली . १९९० च्या दशकात कर्जत पंचायत समितीवर निवडून गेल्यावर सुरेशभाऊ सभापती झाले .


कर्जत -खालापूर विधानसभेचा आमदार म्हणून अनेक दिग्गजांनी येथे नेतृत्व केले असताना या खुर्चीची आस सर्वांनाच आहे .मात्र राजयोग ज्याच्या नशिबी आहे ,असाच नेता येथे निवडून जाताना दिसत आहे .मग भले आकड्यांची गणिते जुळत नसतील तरीही त्यावर मात करून निवडून येण्याची किमया या मतदार संघातील नागरिकांनी सुरेश भाऊंच्या रुपाने अनुभवली आहे .


 


कर्जत -खालापूर मतदार संघ हा पूर्वीपासून काँग्रेस चा बालेकिल्ला ! सन १९५२ साली झालेल्या प्रथम विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे बाबासाहेब ठोसर यांनी निवडून येऊन पहिला मान पटकावला होता .स्वर्गीय इंदिरा गांधी देखील या मतदार संघात त्याकाळी निवडणुकीच्या प्रचारासाठी आल्या होत्या त्यावेळी काँग्रेसने बाजी मारत कर्जतचे तुकाराम सुर्वे हे आमदार झाले होते .यांत खारीचा वाटा भाऊंचा होता .त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसमधून शरदचंद्र पवार हे बाहेर पडले व त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली . व १९९९ ला झालेल्या निवडणुकीत मिळालेल्या संधीचे सोने करत या मतदार संघाचे उभरते नेतृत्व कर्जत दहिवली येथील सुरेशभाऊ लाड आमदार म्हणून निवडून आले .मात्र २००४ साली त्यांना त्यांच्याच आप्तेष्टामुळे पराभव पत्कारावा लागला मात्र हारल्याची खंत उराशी न बाळगता पुन्हा जिद्दीने सुरेशभाऊ कामाला लागले .झालेल्या चुका सुधारून पराभवावर मात करून २००९ साली सुरेशभाऊ लाड यांनी विजयश्री खेचून आणली व प्रचंड मताने विजयी झाले .आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ करत मोठ्या प्रमाणात विकास कामे करून पुन्हा एकदा २०१४ साली विरोधकांना चितपट करून राजकीय आखाड्याची हि कुस्ती त्यांनी जिंकली व सलग दोन वेळा तसेच ह्या मतदार संघाचे तीन वेळा आमदार झाले . चौथ्या वेळी विकासाच्या जोरावर निवडून येऊन लाल दिव्याची गाडी म्हणजेच मंत्री पदाचे त्यांचे स्वप्न मात्र प्रतीक्षेत राहिले .


सुरेशभाऊ लाड यांनी या मतदार संघात तीन वेळा नेतृत्व करत असताना येथील मतदारांनी त्यांनाच पहिली पसंती दिली आहे .या काटेरी प्रवासात व खुर्चीपर्यंत पोहचण्यासाठी पर्यायी साम -दाम -दंड -भेद असे चौफेर डाव टाकत या मतदार संघातील अनेकांना त्यांनी धोबी पछाड़ केले आहे .अश्या अनुभवाने भरीव नेतृत्वास जिल्हाध्यक्ष पदाची धुरा दिल्याने आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसचा वारू चौफेर उधळण्यास माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांच्या मदतीने नक्कीच मदत होईल , अशी खात्री राजकीय तज्ञ व्यक्त करत आहेत .