पुणे महापालिकेचे वॉर्ड आणि पोलीस स्टेशनचा प्रोत्साहनपर स्पर्धेद्वारे 'गुण गणेश पुरस्कारा'ने होणार गौरव-

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



पुणे महापालिकेचे वॉर्ड आणि पोलीस स्टेशनचा प्रोत्साहनपर स्पर्धेद्वारे 'गुण गणेश पुरस्कारा'ने होणार गौरव-


सामाजिक कार्याच्या माध्यमातून वर्षभर काम करणा-या शहरातील ५ गणेश मंडळांचा पुढाकार ; तब्बल १ लाख रुपयांची पारितोषिके ; पुणे शहर पातळीवर स्पर्धा


 


पुणे : कोरोना महामारीच्या काळात शहरासाठी अहोरात्र झटणारे पुणे महानगरपालिकेचे वॉर्ड आणि पोलीस स्टेशनमधील अधिकारी, कर्मचा-यांच्या कार्याला मानवंदना देण्यासोबत प्रोत्साहनपर स्पर्धेद्वारे गुण गणेश पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. येत्या १५ जुलै ते १५ आॅगस्ट दरम्यान आपापल्या कार्यक्षेत्रात सर्वोत्तम कार्य करणारे वॉर्ड व पोलीस स्टेशनला गौरविताना तब्बल १ लाखांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. पुणे शहरातील वर्षभर सामाजिक कार्याच्या माध्यमातून अग्रेसर असणा-या ५ गणेश मंडळांनी याकरिता पुढाकार घेतला आहे.  


 


पत्रकार परिषदेला शिरीष मोहिते, उदय जगताप, अ‍ॅड.नितीन झंझाड, पीयुष शाह, चेतन शिवले, राहुल जाधव उपस्थित होते. 


 


उदय जगताप म्हणाले, पुण्यातील ५ गणपती मंडळे जी वर्षभर सामाजिक कार्य करत असतात ते यंदाच्या गणेशोत्सवाच्या खर्चातून या प्रोत्साहनपर स्पर्धेचे आयोजन करीत आहेत. आदर्श मित्र मंडळ धनकवडी, सेवा मित्र मंडळ ट्रस्ट शुक्रवार पेठ, साईनाथ मंडळ ट्रस्ट बुधवार पेठ, श्री काळभैरवनाथ तरुण मंडळ गणेश पेठ, अष्टविनायक मित्र मंडळ विश्रांतवाडी या मंडळांनी स्पर्धेच्या आयोजनाकरीता पुढाकार घेतला आहे. 


 


अ‍ॅड.नितीन झंझाड म्हणाले, ही स्पर्धा दिनांक १५ जुलै ते १५ आॅगस्ट या कालावधीमध्ये त्या त्या कार्यालयांतील अधिका-यांनी केलेले कार्य आणि कमी झालेली रुग्णसंख्या यावरील निकषाच्या आधारे होणार आहे. मागील ४ महिन्यापासून पुणे मनपातील सर्व वॉर्ड अधिकारी, पोलिस अधिकारी कोरोनाच्या निर्मूलनासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता लढत आहे. त्यांच्यासाठी वॉर्ड व पोलीस स्टेशन स्तरावरील स्पर्धा हे केवळ निमित्त असून, त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी याचे प्रामुख्याने आयोजन करण्यात आले आहे. 


 


पीयुष शाह म्हणाले, पुणे शहरात आता पुन्हा लॉकडाऊन करण्यात येतआहे, त्यामुळे त्याअंतर्गत प्रत्येक वॉर्ड व पोलीस स्टेशनची यंत्रणा ही एकत्रितरीत्या कार्य करणार आहेत. यातील सर्वोत्तम कार्य करणारे ३ वॉर्ड व ३ पोलीस स्टेशन यांना एकूण १ लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गुणगौरव करण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकास २५ हजार रुपये, व्दितीय क्रमांकास १५ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकास १० हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात येणार आहे. तसेच इतर ३ उल्लेखनीय कार्य करणारी वॉर्ड व पोलीस स्टेशन यांना देखील सन्मानपत्र व गौरवचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. यंदाच्या गणेशोत्सवा दरम्यान हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. 


 


तरी वरील बातमीस आपल्या सुप्रसिद्ध दैनिक/ वृत्तवाहिनीवर प्रसिद्धी द्यावी, ही नम्र विनंती. 


पीयुष शाह उदय जगताप


शिरीष मोहिते