उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सदिच्छा भेट 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



 


पुणे - राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज मंगळवार दिनांक २८ जुलै २०२० रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सदिच्छा भेट दिली. पुणे विद्यापीठात ई-कंटेन्ट तयार करण्यासाठी जे विभाग प्रयत्नशील आहेत, त्या विभागांना भेट देऊन तेथील कामाचा आढावा या भेटी दरम्यान तनपुरे यांनी घेतला. 


 कुलगुरू प्रा. (डॉ.) नितीन करमळकर यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन विद्यापीठाच्या वतीने स्वागत केले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी,कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, सेंट्रल इन्स्ट्रुमेंटेशन फॅसिलिटी विभागाचे संचालक डॉ. अविनाश कुंभार, ई कंटेन्ट डेव्हलपमेंट अँड लर्निंग इनोव्हेशन सेंटरच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर, आय. टी. कन्सल्टंट दीपक हर्डीकर उपस्थित होते. 


 


त्यानंतर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विद्यापीठातील शैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्र (EMRC), सेंट्रल इन्स्ट्रुमेंटेशन फॅसिलिटी , ई कंटेन्ट डेव्हलपमेंट अँड लर्निंग इनोव्हेशन सेंटरच्या (Ecdlic) या विभागांना भेटी दिल्या.


 


विद्यापीठाच्या ई कंटेन्ट डेव्हलपमेंट अँड लर्निंग इनोव्हेशन सेंटरच्या (Ecdlic) स्टुडिओला तनपुरे यांनी भेट दिली. या विभागामध्ये ई कंटेन्ट कशा पद्धतीने तयार केला जातो याबाबत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सविस्तर माहिती घेतली. पुणे विद्यापीठाने लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम द्वारे ३००० पेक्षा जास्त अभ्यासक्रम ऑनलाईन अपलोड केलेले आहेत. याबाबत तनपुरे यांनी विद्यापीठाचे कौतुक केले. 


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांना लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमद्वारे ई-कंटेंट संदर्भात जोडले जाणार आहे. याबाबत सुद्धा राज्यमंत्री तनपुरे यांनी माहिती घेतली. 


याशिवाय राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पुणे विद्यापीठाच्या सेंट्रल इंस्ट्रूमेंटेशन फॅसिलिटीला भेट देऊन तेथील इक्विपमेंट्स, इन्स्ट्रुमेंट्सची पाहणी करून त्यांची माहिती घेतली.