पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी सातत्याने येणा-या भारतीय लष्करातील ६ मराठा बटालियनच्या सैनिकांनी जम्मू-काश्मिरमध्ये दगडूशेठ च्या श्रीं ची प्रतिकात्मक मूर्ती स्थापन केली आहे. जम्मू काश्मीरमधील गुरेज सेक्टर कंजलवान या गावी गणपतीसाठी सुंदर मंदिर बांधण्यात आले असून त्या मंदिरात दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती असणा-या मूर्तीची नुकतीच प्रतिष्ठापना करण्यात आली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ख्याती केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर सर्वदूर पसरलेली आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोप-यातून भाविक पुण्यात येतात. त्यामुळे श्रीं च्या दर्शनासाठी येणा-या ६ मराठा बटालियनच्या सैनिकांनी जम्मू-काश्मिरमध्ये दगडूशेठ च्या श्रीं ची प्रतिकात्मक मूर्ती स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याकरीता कमांडिंग आॅफिसर कर्नल विनोद पाटील यांनी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्याकडे विनंती करणारे पत्र ट्रस्टला पाठविले होते.
त्यानुसार दगडूशेठ ट्रस्टने सैनिकांच्या इच्छेला मान देऊन श्रीं ची हुबेहुब प्रतिकात्मक मूर्ती देण्याचे मान्य केले आणि काही दिवसांपूर्वी ही मूर्ती रेल्वेने काश्मिरकडे रवाना झाली होती. कर्नल विनोद पाटील यांनी या संकल्पनेची व मंदिराची मुहूर्तमेढ नोव्हेंबर २०१९ मध्ये रोवली होती.
कर्नल विनोद पाटील यांनी पत्रात म्हटले की, मंदिर उभारणीसाठी बटालियनच्या सर्व जवानांनी मनापासून व उत्साहाने योगदान दिले. मंदिर उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली तेव्हा मंदिराच्या जागेवर जवळजवळ ४ ते ५ फूट इतका बर्फ होता. पुढे नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान हा बर्फ १२ फुटांपर्यंत वाढत गेला. परंतु जवानांनी श्रीं चे काम प्राथमिक कर्तव्य समजून कामाला सुरुवात केली. जवानांनी त्याकरीता आर्थिक योगदानही दिले. मंदिराच्या सुशोभिकरणामध्ये चीड या झाडाच्या लाकडाचा उपयोग करण्यात आला आहे. हे मंदिर म्हणजे भक्ती, जिद्द, चिकाटी आणि कलेचा सुबक संगम आहे. मंदिरात दररोज पूजा व धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. दगडूशेठ गणपतीच्या प्रतिकृतीचे दर्शन घेऊन जवानांच्या शौर्यात वृद्धी होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, जम्मू-काश्मिरमध्ये देशामधील सर्व राज्यांतील सैनिक कार्यरत असतात. त्यामुळे बाप्पाचा आशीर्वाद सर्व सैनिकांना मिळेल आणि अप्रतिम मूर्तीमुुळे या मंदिराची शोभा वाढेल. याकरीता जवानांच्या इच्छेनुसार अडीच फुटांची गणेश मूर्ती या मंदिरासाठी ट्रस्टने भेट म्हणून दिली. सन २०११ पासून ६ मराठा बटालियन आणि दगडूशेठ गणपती ट्रस्टचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या विनंतीचा सन्मान राखून मूर्ती भेट म्हणून पाठविण्याचे ट्रस्टने ठरविले. दगडूशेठ गणपती मंदिरात धार्मिक विधी करुन ही फायबर ग्लास मधील ३६ इंचाची मूर्ती जून महिन्यामध्ये सैनिकांकडे सोपविण्यात आली होती. आता ती प्रत्यक्ष मंदिरात विराजमान झाली आहे.
* फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी सातत्याने येणा-या भारतीय लष्करातील ६ मराठा बटालियनच्या सैनिकांनी जम्मू-काश्मिरमध्ये दगडूशेठ च्या श्रीं ची प्रतिकात्मक मूर्ती स्थापन केली आहे. जम्मू काश्मीरमधील गुरेज सेक्टर कंजलवान या गावी गणपतीसाठी सुंदर मंदिर बांधण्यात आले आहे.