दामखिंडी धनगरवाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण, ग्रामस्थांचे आमदार महेंद्र थोरवे यांना साकडे,

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


दामखिंडी धनगरवाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण, ग्रामस्थांचे आमदार महेंद्र थोरवे यांना साकडे,


 


कर्जत दि. 23 गणेश पवार


 


           कर्जत तालुक्यातील दामखिंडी धनगरवाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर खाजगी जागा मालकाने अतिक्रमण केले आहे. त्यामुळे येथून धनगरवाड्याकडे जाण्याचा रस्ता बंद झाला आहे. रस्ता बंद झाल्याने ग्रामस्थांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरील अतिक्रमण हटवून ग्रामस्थांना रस्ता खुला करून द्यावा यासाठी रायगड जिल्हा हर हर चांगभले धनगर समाज संस्थेने आमदार महेंद्र थोरवे यांना निवेदन दिले आहे. 


      खोपोली शहापूर या राज्य महामार्गावरून तिघर गावाहून धनगरवाड्याकडे जाण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने 2004 साली रस्ता तयार करण्यात आला होता. या रस्त्यावर खडीकरण देखील झाले आहे. परंतु आता स्थानिक जागामालकाने या रस्त्यावर अतिक्रमण करून रस्ता बंद केला आहे. परिणामी येथील धनगर ग्रामस्थांचा रस्ता बंद झाला असून याचा नाहक त्रास ग्रामस्थाना सहन करावा लागत आहे. ग्रामस्थांची ही व्यथा समजून घेत रायगड जिल्हा हर हर चांगभले धनगर समाज संस्था कर्जत यांनी याप्रकरणी कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांना साकडे घातले आहे. आमदार थोरवे यांना याबाबत लेखी निवेदन देऊन या प्रकरणाची चौकशी करून ग्रामस्थासाठी रस्ता खुला करून द्यावा अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे केली. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करून तहसिलदार व उपविभागीय अधिकारी यांची भेट घेऊन रस्त्याची समस्या सोडविणार असल्याची ग्वाही आमदार महेंद्र थोरवे यांनी ग्रामस्थाना दिली 


    याप्रसंगी हर हर चांगभले धनगर समाज संस्थेचे जिल्हाध्यक्ष संतोष आखाडे, तालुका अध्यक्ष रामदास कोकरे, पळसधरी ग्रामपंचायतचे सरपंच जयेंद्र देशमुख, माजी सरपंच लहू कोकरे, गोविंद गोरे नागेश गोरे, नंदू गोरे, उमेश कोकरे, नागेश गोरे, सुरेश आखाडे, सचिन गोरे, नरेश कोकरे आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.