पुणे प्रवाह न्युज पोर्टल
वादळात घर मोडलेल्या डायरे कुटुंबाचे विजय हजारेंनी पुसले अश्रू,भाच्या पाठोपाठ दात्याकडून मदत
कर्जत,ता.6 गणेश पवार
बुधवार 3 जून रोजी रायगड जिल्ह्यात थैमान घातलेल्या निसर्ग चक्री वादळात अनेकांचे संसार उध्वस्त झाले.त्यात कर्जत तालुक्यातील धामोते गावात नव्याने इंदिरा आवास योजनेतून मंजूर झालेले घरकुल अपंग लाभार्थींने उभे केले,पण अंग मेहनत आणि तुटपुंजी आर्थिक बाजू यातून उभे राहिलेल्या अर्ध्यापेक्षा जास्त भिंती देखील बाधित झाल्या होत्या. हलाखीची परिस्थिती असलेल्या त्यात अपंग असलेल्या गणेश डायरे या कुटुंबावर मोठे संकट कोसळले मात्र येथील सामाजिक कार्यकर्ते विजय हजारे यांनी त्यांचे दुःख समजून घेत डायरे कुटुंबाला दहा हजार रुपयांची मदत केली आहे. त्यामुळे हजारे यांच्या रूपाने खरेखुरे सामाजिक कार्य दिसले आहे.त्यात आपल्या मामा चे कोसळलेले घर बघून महेश कराळे याने आपल्या मामाला आर्थिक मदत केली असून त्याचे घर पुन्हा उभे राहत आहे.
कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत धामोते हे गाव आहे. या गावात राहणाऱ्या डायरे कुटुंबातील गणेश डायरे यांना इंदिरा आवास योजनेतून घरकुल मंजूर झाले होते.अपंग असलेल्या गणेश काशीनाथ डायरे यांना ग्रामपंचायतने लाभ दिल्यानंतर आपल्या जागेत घर बांधण्यास सुरवात केली होती. शरीराने अपंग असलेले गणेश डायरे हे येथील एका हॉटेलमध्ये काम करीत होते. मात्र लॉकडाउन सुरू झाल्याने गेले तीन महिने ते घरीच होते. त्यामुळे घरात परिस्थिती तशी हलाखीचीच. घरात आई,पत्नी,मुलगी अशी एकंदर मंडळी. त्यांचे कसेबसे भागवत डायरे कुटुंब संघर्षमय जीवन जगत होते. घराचे काम सुरू असल्याने काही दिवस ते भाडे देऊन दुसरीकडे राहत होते. मात्र लॉकडाउन काळात हाताला काम नसल्याने भाडे परवडत नव्हते तेव्हा ते घर नुकतेच पूर्ण होत आल्याने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घरात राहायला गेले. तरी घरातील खिडक्या दरवाजे ही कामे अजून अपूर्णच होती. शेवटी डायरे कुटुंबाच्या संघर्षमयी जीवनात निसर्गाने त्यांच्या संयमाचा अंत पाहायचा ठरवला आणि बुधवारी रायगड जिल्ह्यात थडकलेल्या निसर्ग वादळात काडी काडी जमवून उभारलेले घर उघडे पडले. घरातील जीवनावश्यक वस्तू, कपडे, धान्य, सगळं भिजल कसे बसे जीव वाचवून हे कुटुंब घराच्या बाहेर पडल. पण घर मोडल्यामुळे डायरे कुटुंबाच्या अश्रूंचा बांध मात्र फुटला. काही वेळाने वादळ तर शमले मात्र डायरे कुटुंब यांच्या आयुष्यात अजून वादळ सुरूच होते.
दुसऱ्या दिवशी महसूल विभागाने पंचनामा केला खरा पण शासनाची मदत मिळण्याची अपेक्षा फार दूर असते.याची जाणीव असल्याने गणेश डायरे यांचा बेकरे येथे राहणारा भाचा मुंबई पोलीस मध्ये नोकरी करीत आहे.महेश कराळे या पोलीस शिपायाने आपल्या मामा चे कोसळलेले घर पुन्हा उभे करण्यासाठी मदत आपल्या वडिलांचे हातातून पाठवली.
त्यातून घराची उडालेली 48 पत्रे पुन्हा टाकण्याचे काम सुरू आहे.मात्र अपंग ग्रामस्थ गणेश डायरे यांना पुन्हा उभे करण्यासाठी मदतीचा हातभार कोल्हारे येथील राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुका उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते विजय हजारे यांनी दिला.शनिवारी त्यांनी डायरे कुटुंबाची भेट घेऊन त्यांना 10 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.ही मदत डायरे कुटुंबासाठी पूर्ण जरी नसली तरी पाठीवर हात ठेवून फक्त लढ हे म्हणा या वाक्याचा प्रत्यय आणणारी तरी नक्कीच आहे. याप्रसंगी कोल्हारे ग्रामपंचायत उपसरपंच रामदास हजारे,ग्रामपंचायत सदस्य जयवंत हजारे,माजी सदस्य विलास हजारे आदी उपस्थित होते.
अनेकदा आपल्याला सामाजिक कार्यकर्ते हे वाक्य मिरवणारी माणसे दिसतात. मात्र त्यात काही अपवाद वगळता समाजासाठी त्यांनी किती योगदान दिले काही हा विचार करावा लावणारी गोष्ट आहे. असे असले तरी धामोते गावात खरेखुरे सामाजिक कार्य असते हे दाखवणारे काम विजय हजारे यांनी केले आहे. त्यांचा आदर्श घेऊन इतरांनी देखील डायरे कुटुंबाला मदत केल्यास त्यांचे दुःख हलके होण्यास नक्कीच मदत होईल.