विनामास्क ५०० रुपये दंड घेताना नागरिकांना १० मास्क द्यावे- अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय सदस्य सूर्यकांत पाठक यांची मागणी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


प्रेसनोट प्रसिद्धीसाठी- 


पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात विनामास्क फिरणा-यांवर पुणे महानगरपालिकेकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मात्र, विनामास्क फिरणा-यांकडून ५०० रुपये दंड घेताना त्यांना १० मास्क द्यावे. यामुळे ते मास्कचा वापर करण्याकरीता उद्युक्त होतील, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय सदस्य व ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांनी केली आहे. 


 


विनामास्क संचार करणा-या नागरिकांकडून दंड वसुलीचे आदेश महापालिका आयुक्तांनी बुधवारी दिले आणि गुरुवारपासून या कारवाईला सुरुवात झाली आहे. कारवाईचे अधिकार आरोग्य निरीक्षक दर्जाच्या अधिका-यांना देण्यात आले आहेत. मास्क घालणे आवश्यक असले, तरी दंडाची रक्कम मोठी आहे. 


 


सूर्यकांत पाठक म्हणाले, नागरिकांनी मास्कचा वापर करणे अत्यावश्यक असले, तरी ही दंडात्मक कारवाई करुन याकडे उत्पनाचे साधन म्हणून पाहणे चुकीचे आहे. त्याकरीता त्या रकमेच्या बदल्यात नागरिकांना मास्क दिल्यास ते स्वत: व त्यांच्या कुटुंबातील सदस्य मास्क घालण्यास उद्युक्त होतील. हेल्मेटसक्तीच्या वेळी देखील मोठया प्रमाणात दंड वसुली करण्यात आली होती. आता, मास्क ही गरजेची गोष्ट असली, तरी ती केवळ उत्पन्न मिळविण्याच्या दृष्टीने केली जाणे हे योग्य नाही. त्यामुळे त्या दंडाच्या रकमेमध्ये मास्क किंवा आरोग्यदृष्टया आवश्यक वस्तू नागरिकांना दिली जावी, अशी मागणी त्यांनी केली.