पुणे प्रवाह न्युज पोर्टल
,
कर्जत दि.8 गणेश पवार
नेरळ धामोते या परिसरात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प सुरु आहेत. हा प्राधिकरणात असल्यामुळे अनेक नामांकित गृह प्रकल्प येथे आकार घेत आहेत. मात्र गृहप्रकल्प उभे करत असताना बिल्डर आपली मनमानी करत आहेत असे चित्र आहे. त्यामुळे येथील पूर्वापारपासूनचे नाले यांचे मार्ग पूर्णतः बंद होत आहेत. नेरळ विकास प्राधिकरणातील कोणी अधिकारी जागेवर येत नाही कि ग्रामपंचायत याना थांबवत नाही. त्यामुळे नेरळ कळंब हा राज्यमार्ग दरवर्षी सातत्याने पाण्याखाली जात आहे. यंदा तर एका इमारत व्यावसायिकाने गृहप्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात भराव केल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात नेरळ कळंब या रस्त्याची काय अवस्था होणार या विचाराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वाटावं पसरले आहे.
कर्जत तालुक्यातील मोठे शहर म्हणून नेरळ आकार घेत आहे. तेव्हा शासनाने विकासाच्या दृष्टिकोनातून साधारण २००२ साली येथे नेरळ विकास प्राधिकरणाची स्थापना केली. तेव्हा इमारत व्यावसायिकाला बांधकाम करताना प्राधिकरणाची मंजुरी घेऊन काम करावे लागते. त्याकरता विकास कर देखील प्राधिकरणाला द्यावा लागतो. या प्राधिकरणात नेरळसह, ममदापुर, बोपेले, धामोते या गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे नेरळ व्यतिरीक्त इतर भागात मोठ्या प्रमाणात बांधकामे सध्या सुरु आहेत. त्यापैकी धामोते गावाच्या हद्दीत नेरळ कळंब या राज्यमार्गालगत सध्या एका गृहसंकुलाचे बांधकाम बिनधोक सुरु आहे. याठिकाणी दलदली भाग असल्याने आणि पावसाळ्याचे पाणी याच मार्गाने नदीत जात असल्याने विकासकाने मातीचा मोठा भराव करून काम सुरु आलेले आहे. मुख्य रस्त्यापासून जमीन साधारण ३ फूट खाली आहे. तिथपासून मातीचा भराव करून बांधकाम वर उचलण्यात आलेले आहे. यामुळे पाण्याचा मुख्य मार्ग बंद होणार आहे. गेले काही वर्ष नेरळ कळंब हा रस्ता सातत्याने पाण्याखाली जात आहे. येथे होणारी बांधकामे हि नियोजन शून्य पद्धतीने होत आहेत. परिणामी मुख्य नाल्याचा मार्ग वळविणे, तो खंडित करणे, अशा गोष्टी सरार्स घडत आहेत. मुळात जिल्हाधिकारी बांधकामासाठी परवानगी देतानाच त्यात मुख्य पाण्याच्या मार्गाना बाधीत न करता बांधकाम करावे अशा अटीवर बांधकाम परवानगी देत असतात. मात्र बिल्डर लॉबी आपली मनमानी करून बिल्डिंग बांधून निघून जातात. त्यानंतर तिथे राहणाऱ्या सदनिका धारकांना भविष्यात अनेक संकट, समस्यांना सामोते जाण्याची वेळ येत असते. २०१७ पासून नेरळ कळंब रस्ता पाण्याखाली येण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे तत्कालीन प्रांताधिकारी दत्ता भडकवाल यांनी धामोते येथे येऊन प्रत्यक्ष पाहणी करून बांधकाम व्यावसायिकांना पाण्याचा प्रवाह मोकळा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र अजून बिल्डर लॉबीची मनमानी सुरूच आहे. त्यामुळे प्रशासनाने या बांधकामावर वेळीच योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे अन्यथा या वर्षी १ दिवसापेक्षा जास्त काळ नेरळ कळंब रस्ता पाण्याखाली जाण्याची दाट शक्यता आहे.
चौकट
नेरळ विकास प्राधिकरण आहे कुठे ?
नेरळ व परिसरातील समाविष्ट गावे यांच्या नियोजनबद्ध पद्धतीने विकासासाठी नेरळ विकास प्राधिकरण शासनाने अस्तित्वात आणले. मात्र सध्या कोण बिल्डर कुठे बांधकाम करतोय, कसे बांधकाम करतोय याचा कोणाला काही थांगपत्ता लागत नाही. तर मोनी विचारलायला गेल्यास प्राधिकरणाची परवानगी आहे असे तोंडी सांगितले जाते. मात्र अलिबागला असलेले नेरळ विकास प्राधिकरणाचे कार्यालयात कोण अधिकारी बसतो हे देखील नेरळकरांना माहित नाही. तर तेथील तांत्रिक अधिकारी हे सुरु असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी देखील येत नसल्याने नियोजन बांध शहराच्या दिशेने होणारी शहराची वाटचाल भकास होण्याच्या दिशेने होत आहे. तेव्हा प्राधिकरण आहे कुठे ? असाच प्रश्न सर्वाना पडला आहे
येथील काम हे नियोजन शून्य पद्धतीने सुरु आहे. कुणीही बिल्डर येतो आणि कुठेही बांधकाम करतो. यात स्थानिक प्रशासन असलेल्या ग्रामपंचायतीला काहीही घेणेदेणे नाही जो तो सदस्य फक्त आपल्याला काय लाभ होईल याचाच विचार करतो. परिणामी याची दुष्परिणाम गावाला आणि ग्रामस्थांना भोगायला लागतात.
: दत्तात्रेय विरले, शिवसेना शाखाप्रमुख धामोते
: सदर इमारत व्यावसायिकाला आम्ही त्यांनी प्राधिकरणाची कि आणखी कोणती इमारत बांधकामाच्या परवानगीचे कागदपत्र ग्रामपंचायतीत सादर करायला सांगितले होते. मात्र त्यांनी ते अद्याप सादर केलेले नाहीत तसेच ग्रामपंचायतीचा बांधकाम ना हरकत दाखला देखील घेतलेला नाही.
रामदास हजारे, सरपंच कोल्हारे ग्रामपंचायत
फोटो ओळ
छायः गणेश पवार