पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पुणे- प्रजापती ब्रह्मकुमारी, माऊंट अबू, राजस्थान येथून 80 साधक/अनुयायी पुणे येथे आज पोहोचले. त्यांची वैद्यकीय तपासणी जिल्हा रुग्णालय, औंध या ठिकाणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या तपासणीमध्ये कोरोना (कोविड -19) संदर्भात कोणीही संशयित रूग्ण आढळून आलेले नाही, त्यामुळे त्यांच्या तळहाताच्या मागील बाजूस होम क्वारंटाईनचा शिक्का मारून, त्यांना घरी पाठवण्यात आले.
माऊंट अबू येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील साधकांना राज्यात परत आणण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न केले. राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात राज्य सरकारने प्रवासासाठी परवानगी दिली. माऊंट अबू येथेही आरोग्य तपासणी करण्यात आली. पुणे येथील साधकांसाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांची समन्वयक म्हणून नेमणूक केली होती. सोशल डिस्टन्सिगचा अवलंब करून 80 साधकांना सुखरूप पुण्यात आणण्यात आले.