लॉक डाऊन मध्ये तरुणांनी शोधला रोजगार चार तरुणांनी फुलवला भाजीचा मळा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 



नेरळ,ता.27 गणेश पवार


                       लॉक डाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत,त्यामुळे घरात बसून काय करायचे?हा प्रश्न सर्वांना भेडसावत आहे.मात्र नेरळ जवळील तळवडे गावातील चार तरुणांनी एकत्र येत समूह शेती केली आहे.चार तरुणांनी फुलवलेला भाजीपाला मळा मधून उत्पन्न मिळू लागले असून लॉक डाऊनमध्ये बंद झालेल्या व्यवसायात खऱ्या अर्थाने रोजगार शोधला आहे.


                        कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात 23 मार्च पासून लॉक डाऊन सुरू आहे.लॉक डाऊनची घोषणा झाली,त्यावेळी नवीनच असलेल्या हा लॉक डाऊन महिन्यात थांबेल असा कयास सर्वांना होता.मात्र कर्जत तालुक्यातील तळवडे गावातील चार शेतकरी तरुणांनी लॉक डाऊन काही महिने राहणार हे बरोबर हेरून स्वतःला आपल्या शेतात रमवून घेतले.महेश शेळके, संदीप मसणे,गणेश मसणे, दयेश शेळके या चार तरुणांनी आपल्या कुटुंबातील सर्वांना एकत्र घेत उल्हासनदी मधील बारमाही वाहत्या पाण्याचा उपयोग करून घेतला आणि भाजीपाल्याचा मळा फुलवला. हे सर्व शेतकरी असलेले तरुण पावसाळ्यात भाताची शेती करण्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची शेती करीत नव्हते.त्यामुळे भाजीपाला शेती ही त्यांच्यासाठी तशी नवीनच होती,मात्र जेमतेम 25-35 वयोगटातील हे तरुण शेतकरी यांच्या मदतीला गुगल आणि यु ट्यूब ही माध्यमे आली.हे सर्व तरुण आलेल्या फावल्या वेळेत मोबाईलमध्ये घुसलेले असतात.


                       मार्च 2020 मध्ये त्या तरुण शेतकरी यांनी पहिल्यांदा शेती कशी करायची याची माहिती इंटरनेट च्या माध्यमातून घेण्यास सुरुवात केली आणि त्यातील माहितीचा अभ्यास या सर्व तरुणांनी काही दिवस केला. मग एप्रिल महिना सुरू होताच या तरुणांनी ट्रॅक्टरच्या माध्यमातून जमीन उकरून काढून भाजीपाला लावण्यासाठी आळी करणे, पाट करणे ही कामे करून घेतली. त्यावेळी कोणत्याही शेतीसाठी महत्वाचा असलेल्या पाण्याची व्यवस्था जवळून वाहणाऱ्या उल्हासनदीचे पाणी त्यांनी पंप लावून तर काही भागात कावड तयार करून शेतापर्यंत पाणी आणले. तिकडे लॉक डाऊन मुळे सर्वत्र घरात बसून टीव्ही पाहत असताना या चार तरुण शेतकरी यांनी भाजीपाला शेती करण्यासाठी आपला वेळ सत्कारणी लावला.त्यांनी केलेली भाजीपाला शेती मधून चांगले पीक शेतकऱ्यांच्या हाती लागले आहे.चार शेतकऱ्यांनी चार एकर मध्ये केलेला भाजीपाला यांचे उत्पादन सुरू झाले असून ताजा भाजीपाला खरेदी करून बाजारात विकण्यासाठी भाजीपाला विक्रेते त्यांच्या शेतात पोहचत आहेत आणि भाजीपाला खरेदी करून नेत आहेत.


                        या चार शेतकरी यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने भेंडी,शेपू, टोमॅटो,मिरची,गवार,वांगी, काकडी,मेथी, कोथिंबीर,माठ, पालक,अशा प्रकारच्या भाजीपाल्याचे उत्पादन सुरू झाले आहे. त्याचवेळी उन्हाळ्यात आपल्या घरातील जनावरे यांना हिरवा चारा मिळावा यासाठी त्यांनी हिरवा चारा आणि मका यांचे पीक देखील आपल्या शेतात घेतले आहे.पावसाळा सुरू होण्यास आणखी 15-20 दिवसांचा कालावधी असून भाताची शेती ची कामे सुरू होण्यास महिना आहे.त्यामुळे या तरुणांनी केलेली शेती आणखी महिनाभर परिसरातील जनतेला ताजी आणि सेंद्रिय खत वापरून तयार झालेला भाजीपाला उपलब्ध होणार आहे.


 


 


 


 


 


 


संदीप मसणे-शेतकरी


आम्ही इतरांप्रमाणे लॉक डाऊन मध्ये घरी न बसता भाजीपाला शेती करण्याचा निर्णय घेतला.त्यावेळी आमच्या कुटुंबातील सर्वांनी प्रसंगी नदीमधून डोक्यावर पाणी आणण्याची कामे देखील केली आणि सर्वांच्या प्रयत्नातुन आनंद देणारा मळा फुलला आहे.


 


 


 


शांताराम शेळके-ग्रामस्थ 


आम्ही नोकऱ्या करून निवृत्त झालो आहोत,त्यावेळी कामावर असताना कधी बसलो नाही.त्यामुळे टाळेबंदी मध्ये घरात बसून न राहता त्या सर्वांना शेती करण्याचा सल्ला दिला आणि त्यांनी माझ्यासह त्यांचा अन्य सहकारी दिलीप शेळके यांचे ऐकले.त्यातून खऱ्या अर्थाने त्यांच्या मेहनती मधून मळा फुलला असून भविष्यात अशा तरुणांनी नोकरी च्या मागे न लागता वेगवेगळ्या प्रकारची शेती करावी.