पुणे प्रवाह न्युज पोर्टल
आमच्या टॅक्सच्या पैशावर शेतकरी कर्जमाफी नको म्हणणारे सध्या कुठे गायब झाले.........
आज जगाचे सर्व व्यवहार थांबले आहे. अनेक उद्योग-व्यवसाय थांबले तरी आपले फारसे काही बिघडलेले नाही, हे लक्षात आले आहे. आज आपण जिवंत आहोत ते फक्त फक्त डॉक्टर्स, पोलीस, प्रशासन आणि शेतकरी यांच्यामुळे.......
सव्वाशे कोटी जनतेच्या ताटात आज ह्या बळीराजामुळेच दोनवेळचा घास पडत आहे. शेतकऱ्याचे हे उपकार कधीच न विसरता येण्यासारखे आहे. ते कुठे फुकट विकत आहेत, ते तर ह्या संधीचा फायदा घेत आहेत. त्यात उपकार कसले, असे म्हणणारा मोठा नतद्रष्ट वर्ग आजही मोठ्या प्रमाणात आपल्या आजूबाजूला आहे. आता हाच निकष त्यांनी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सगळ्यांना लावला तर ............
पण शेतकरी म्हटले कि काहींच्या पोटातील मळमळ खूप वाढते. मग ओकाऱ्या सुरू होतात, आमच्या टॅक्सच्या पैशांवर यांना कर्जमाफी, आमच्या पैशांवर उधळपट्टी वगैरे वगैरे. एकतर टॅक्सचे पैसे म्हणजे काही फक्त इन्कम टॅक्स नव्हे, हे या मंद महर्षींना समजून घ्यायचे नसते. इतर अनेक प्रकारचे टॅक्स शेतकऱ्यासह सामान्यजण भरत असतातच. देशभरात हजारो कोटी रूपयांची उधळपट्टी सुरू असताना यांचा आवाज कुठे जातो. फार दुर कशाला, आपल्या वॉर्डातला नगरसेवक अनेकवेळा गरज नसताना अनेक “लोकोपयोगी” कामे करतो, तेव्हा यांच्या टॅक्सच्या पैशाचे काय होते ? तेव्हा यांची लेखणी जाते कुठे, वस्तुत: जवळच राहणाऱ्याला नगरसेवकाला प्रत्यक्ष भेटून जाब विचारणे शक्य असते, पण नंतर............
शेतकऱ्याला शिव्या देणे त्यातुलनेत एकदमच सोपे असते. आज हीच ती वेळ आहे हे समजून घेण्याची कि तो नसेल तर आपण कितीही पैसा ओतला तरी आपल्या ताटात एक कणही पडू शकत नाही. तो जीव धोक्यात घालून, प्रतिकुल परिस्थितीमध्ये तुमच्या दारापर्यंत फळे-भाजीपाला पोहचवतो आहे.म्हणून आपण जिवंत आहोत.
भीक मागणारे, सबसिडी लाटणारे,आळशी अशा शेलक्या विशेषणांनी उध्दार करणे हा तुमचा खोटारडेपणा आहे हे तुमच्या लक्षात आले असेल. तो तुम्ही आता तरी थांबवाल असा विश्वास वाटतो. कोरोनाने एवढे तर नक्की शिकवले आहे की, कितीही पैसा असला तरी तुम्ही एकटे काहीच करू शकत नाही. तुम्ही परावलंबी आहात. साध्या साध्या गोष्टीही पैशाने विकत घेता येऊ शकत नाही, हे कोरोनाने दाखवून दिले आहे. म्हणून हीच ती वेळ आहे, अन्नदात्याबद्दल कृतज्ञता जपण्याची........
ता.क.– शेतकऱ्यांच्या संपाच्या वेळी अन्न धान्य आम्ही बाहेरहून आयात करू , असे उदगार एका पक्षाच्या प्रवक्त्यांनी काढले होते. आता यांची आयात कुठून होणार आणि यांचे “भांडार” भरेल कसे हा प्रश्न माधवाला (म्हणजे भगवान श्रीकृष्ण बरं का) पडला असेल का ?
जाता जाता- “सर्व काही थांबु शकते,शेती नव्हे” हे उद्गार पं.नेहरूंनी १९४८ साली काढले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याचा अनुभव सुज्ञांनी (म्हणजे नेहरूंचे विरोधक नव्हे हं) घेतला असलेच.
*जय बळीराजा*