एक लाखाहुन अधिक गरजू पर्यंत पोहचले ‘आपुलकीचे जेवण’* -'वाणी चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर’ आणि लाड शाखीय वाणी समाजाचा उपक्रम

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


*एक लाखाहुन अधिक गरजू पर्यंत पोहचले ‘आपुलकीचे जेवण’*


-'वाणी चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर’ आणि लाड शाखीय वाणी समाजाचा उपक्रम


पुणे, दि. 14 –  लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये हातावर पोट असणारे कामगार,  स्वच्छता कर्मचारी, परिचारिका, बाहेरगावाचे विद्यार्थी यांना जेवण मिळावे या हेतूने 24 मार्च पासून विविध भागात फूड पॅकेटचे वाटप केले जात आहे. वाणी चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड  ऍग्रीकल्चर व अखिल भारतीय लाड शाखीय वाणी समाज महासंघ,पुणे यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमातून आजपर्यंत १ लाखाहून अधिक गरजूंना ‘आपुलकीचे जेवण’ देण्यात आले आहे.


या उपक्रमांतर्गत दरदिवशी तब्बल सात ते आठ हजार लोकांना दोन वेळचे जेवण देण्याचे काम या संस्था करीत आहेत. ट्रॅफिक पोलीस कर्मचारी आणि इतर सेवाभावी संस्थांनी यामध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत कोणताही नागरिक उपाशी झोपू नये ही या मागची संकल्पना आहे. समर्थ ग्रुपचे कैलास वाणी, अभिनव ग्रुपचे श्यामकांतजी शेंडे व स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतपेढी मर्यादित यांचेकडून नागरिकांना फूड पॅकेट्सचे वितरण केले जात आहे. वाटप व अन्न बनविण्यासाठी पन्नास लोक यामध्ये सक्रिय सहभागी असून शहरातील विविध भागात डबे,पॅकेट्स गरजूं पर्यंत पोहोचविण्याचे काम ते करत आहेत. मंगळवारी पोलिस अधिकारी प्रतिभा जोशी यांच्या हस्ते फूड पॅकेटचे वाटप करण्यात आले.


या उपक्रमांबद्दल बोलताना कैलास वाणी म्हणाले, सामाजिक बांधिलकीतून आम्ही आपल्या माणसांसाठी म्हणून 'आपुलकीचे जेवण' हा उपक्रम सुरू केला. सुरवातीला चारशे ते पाचशे लोकांपासून सुरुवात केली, आजघडीला दिवसभरात 7 ते 8 हजार नागरिकांपर्यंत आपुलकीचे जेवण पोहोचत आहे. पत्रकार, पोलीस कर्मचारी,आरोग्य सेवक यांचे आम्हाला सहकार्य मिळत असून हा उपक्रम गरजूंच्या पर्यंत पोहोचत आहे.


गरजू नागरिकांनी कोणताही संकोच न बाळगता आपुलकीचे जेवण या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन चेंबरच्या माध्यमातून करण्यात येत आहे. वारजे, कर्वेनगर व कोथरुड येथे राहणाऱ्या नागरिकांना सकाळी 11 ते 12 आणि सायंकाळी 5 ते 6 या वेळेत गीताई संकुल,पौड रोड, कोथरुड येथून फूड पॅकेटचे वाटप केले जाते असे वाणी यांनी सांगितले.