वस्त्यावस्त्यांमध्ये जाऊन रेशनकार्डधारकांमध्ये जागरुकता आणत आहे नागपुरातील तरुणाई

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


वस्त्यावस्त्यांमध्ये जाऊन रेशनकार्डधारकांमध्ये जागरुकता आणत आहे नागपुरातील तरुणाई
___________________________________


मिळायला हवे २० किलो तांदूळ मात्र मिळालेत फक्त पाचच किलो. नियमानुसार १५ किलो गहू व दोन किलो साखरही मिळायला हवी. मात्र साखरेचा तर पत्ता नाही पण गहू दहा किलोच दिलेत. अशा अनेक कहाण्या सध्या सगळीकडून ऐकू येत आहेत. नागपुरातल्या गल्लोगल्लीतल्या रेशन दुकानासमोरची. नियमाने जे धान्य मिळायला हवं आहे ते मिळत नाही याची ओरड सर्वत्र होते आहे.अर्ध शिक्षित व टेक्नोसॅव्ही नसलेल्या नागरिकांना लुटण्याचा प्रकार होतो आहे. या अन्यायाला रोखण्यासाठी नागपुरातील तरुणांचा एक गट दिवसरात्र एक करतो आहे आणि वस्त्यावस्त्यांमध्ये जाऊन रेशनकार्ड धारकांना भेटून त्यांना किती धान्य मिळायला हवं आहे याची माहिती देतो आहे.


रेशनकार्डवरचा नंबर पाहून तो सरकारच्या पोर्टलवर टाकून संबंधित व्यक्तीला किती धान्य मिळू शकतं हे शोधलं जातं. तशी माहिती संबंधित रेशनकार्ड धारकाला दिली जाते आणि त्याने आपला एआरसी नंबर पोर्टलवर टाकला तर सर्व माहिती समोर येते. आतापर्यंत किती धान्य घेतले व किती द्यायचे आहे हे सर्व त्यात दिसते. मोबाईलवरून ते दाखवल्यानंतर नागरिकांना तर धक्काच बसतो असे या टीममधील एक सदस्य असलेले शोएब मेमन यांनी सांगितले. त्यांनी आतापर्यंत गंगानगर, कळमना, राजनगर, डिप्टी सिग्नल, फ्रेन्डस कॉलोनी, गिट्टी खदान आदी भागात जाऊन तेथील रेशनदुकानांसमोर बसून नागरिकांना जागरुक केले आहे. त्यांच्या या टीममध्ये प्रवीण जोसेफ, मन्नू भनोत, निलेश भंबवानी आणि संकेत राऊत यांचा समावेश आहे.