खेड-शिवापूर टोल नाका टोल वसुली सुरू ; काही जणांन कडून चुकीची माहिती पसरवली जात आहे

खेड-शिवापूर : पुणे-सातारा रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या mh12 आणि mh14 पासिंगच्या वाहनांनी खेड-शिवापूर टोल नाक्यावर उद्यापासून टोल भरू नये, असा एक मेसेज सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. मात्र अशा प्रकारे कोणताही आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलेला नाही. तर जिल्हाधिकारी कार्यालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पाठविलेल्या पत्राचा अर्धवट भाग सोशल मिडीयावर पसरवून नागरीकांची दिशाभूल केली जात आहे.


पुणे-सातारा रस्त्यावर प्रवास करणाऱ्या mh12 आणि mh14 या पासिंगच्या वाहनांनी उद्यापासून खेड-शिवापूर टोल नाक्यावर टोल भरू नये, असा मेसेज आणि त्याला जोडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्राच्या एका पानाचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.मात्र या पत्राची खातरजमा केली असता हा मेसेज अर्धवट आणि चुकीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अशा प्रकारे कोणताही आदेश देण्यात आलेला नाही. तर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मुख्य प्रबंधकांना पाठविण्यात आलेले हे पत्र आहे. या पत्रात जिल्हाधिकारी यांनी खेड-शिवापूर टोल नाक्यासंदर्भात आजपर्यंत झालेली आंदोलने, बैठका आणि त्यावेळी केलेल्या मागण्या याचा उल्लेख या पत्रात केला आहे.


2011 साली झालेल्या एका आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्ते लोकप्रतिनिधि , राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे-सातारा टोल रोड कंपनी यांच्यामध्ये बैठक झाली होती. या बैठकीत खेड-शिवापूर टोल नाका ज़ोपर्यन्त भोर तालुक्याच्या हद्दीबाहेर हलविला जात नाही, तोपर्यन्त mh12 आणि mh14 पासिंगच्या वाहनांकडून टोल घेण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात आली होती.


त्यावेळी झालेल्या या आंदोलनाचा आणि मागणीचा उल्लेख या पत्रात करण्यात आलेला आहे. मात्र या पत्राचा अर्धवट फोटो आणि अर्धवट माहिती सोशल मिडीयावर पसरवून लोकांची दिशाभूल केली जात आहे.