भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक घोषित करावे*

#PRESSNOTE


*भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक घोषित करावे*


- परशुराम वाडेकर यांची मागणी; भिडेवाडा बचाव कृती समितीतर्फे अभिवादन 


पुणे : "मुलींच्या शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी पहिली शाळा भिडेवाड्यात सुरु केली. त्यामुळे भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक व्हावे, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलने, मोर्चा आदींच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून तातडीने भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे," अशी मागणी भिडेवाडा बचाव कृती समितीच्या वतीने करण्यात आली.


क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी भिडेवाडा येथे त्यांना अभिवादन केल्यानंतर भिडेवाडा बचाव कृती समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर बोलत होते. प्रसंगी नगरसेविका सुनीता वाडेकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, संपर्कप्रमुख अशोक कांबळे यांच्यासह पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.


परशुराम वाडेकर म्हणाले, "महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी १८४८ मध्ये बुधवार पेठेतील भिडे वाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली. या वास्तूला एक इतिहास आहे. या शाळेचे राष्ट्रीय स्मारक करण्यात यावे, या मागणीसाठी अनेक व्यक्ती आणि संस्था विविध मार्गांनी प्रयत्न करीत आहेत. मात्र, सरकारी पातळीवर मागण्यांना कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही. सध्या भिडेवाड्याची अवस्था बिकट असून, यातील काही भाग कोसळल्यास जीवित आणि वित्त हानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने यासाठी भरघोस तरतूद करून, भिडेवाडा हे राष्ट्रीय स्मारक घोषित करून, ते जतन करावे." ही मागणी मान्य न झाल्यास स्मृतीदिनी मोठे आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांना 'भिडेवाडा बचाव कृती समिती'ने दिला आहे.