चीनी मांजा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी* डॉ. कल्याण गंगवाल यांची मागणी; 'विद्याप्रमाण रेस्क्यू अभियान' राबवणार

#PRESSNOTE


*चीनी मांजा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी*


डॉ. कल्याण गंगवाल यांची मागणी; 'विद्याप्रमाण रेस्क्यू अभियान' राबवणार


पुणे : मकरसंक्रातीच्या निमित्ताने पतंग उडविण्याची धामधूम सुरु झाली आहे. पतंग आणि मांजा बाजारात आला आहे. चीनी आणि नायलॉन मांजामुळे गेल्या काही वर्षात अनेकांना आपला जीव गमावावा लागला आहे. या मांजाच्या वापरावर कायद्याने बंदी आहे. मात्र, छुप्या पद्धतीने हा चीनी मांजा विकला जात आहे. त्यामुळे माणसांच्या जीवावर बेतणार्‍या या चीनी मांजा विकणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी पत्रकार परिषदेत केली. या मांजामुळे जखमी होणार्‍या मुले, पशु, पक्ष्यांच्या बचावासाठी 'विद्याप्रमाण रेस्क्यू ऑपरेशन' ३१ जानेवारीपर्यंत राबविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. यावेळी राजेश जैन, केसरीनाथ जैन, रवींद्र लोहाडे आदी उपस्थित होते.


डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच पतंगबाजी करणार्‍यांची लगबग सुरु होते. बाजारात विविध प्रकारचा मांजा येतो. बोहरी आळीसह शहर आणि उपनगरांतील छोट्या-मोठ्या दुकानांत हा मांजा विकला जातो. यात बहुतांश मांजा चीनी किंवा नायलॉनचा असतो. त्यामुळे अपघातांचे प्रकार वारंवार घडताना आपण पाहिले आहे. दोन वर्षांपूर्वी सुवर्णा मुजुमदार या महिलेला शनिवारवाड्याजवळील पुलावर मांजाने गळा कापल्याने आपला जीव गमवावा लागला. काल-परवाही मांजाने गळा कापल्याच्या दोन-तीन घटना ताज्या आहेत. अशा मांजाची निर्मिती, विक्री, साठवण, खरेदी व वापर यावर कायद्याने बंदी आहे. चीनी मांजा सापडल्यास संबंधितांवर पाच वर्षांचा तुरुंगवास व एक लाखाच्या आर्थिक दंडाची तरतूद आहे. मात्र, शासकीय यंत्रणेच्या ढिलेपणामुळे हा मांजा बाजारात विकला जात आहे. त्यामुळे प्रशासनाने याआधी घटलेल्या दुर्घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन चीनी मांजा विक्री करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी. तसेच राष्ट्रीय हरित लवादाने याप्रकरणी लक्ष घालावे. ”


“या मांजाला अनेक मुले, पशु-पक्षीही बळी पडतात. त्यामध्ये कबुतरे, कावळे, घुबड, पोपट, घार आणि फुलपाखरे यांचा समावेश आहे. या सर्वांवर मोफत उपचार केला जाणार आहेत. जखमी पशु-पक्ष्यांच्या, मुलांच्या बचावासाठी सर्वजीव मंगल प्रतिष्ठान गेल्या १६-१७ वर्षांपासून काम करीत आहे. आजवर १५०० मुले, पशु-पक्ष्यांना वाचविण्यात यश आले आहे. यंदाही 'विद्याप्रमाण रेस्क्यू ऑपरेशन' ३१ जानेवारीपर्यंत राबविण्यात येणार आहे. यामध्ये एक अ‍ॅम्ब्युलन्स, दोन पशुवैद्यकीय डॉक्टर आणि सात-आठ सामाजिक कार्यकर्ते सहभागी आहेत. मुले-पशु व प्राण्यांच्या रेस्क्यूसाठी डॉ. कल्याण गंगवाल (९८२३०१७३४३) यांच्याशी संपर्क करावा. झाडावर अडकलेला मांजा पक्ष्यांसाठी धोकादायक असतो. त्यामुळे हा मांजा गोळा करून देणाऱ्यास रोख बक्षीस दिले जाणार आहे. या मोहिमेत अहिंसाप्रेमी नागरिकांनी सहकार्य करावे,” असे डॉ. गंगवाल यांनी नमूद केले. 
------------------------------------------------------------