स्वामी विवेकानंदांच्या विचारांची आज नितांत गरज  - डॉ. एस. एन. पठाण
स्वामी विवेकानंदांच्या विचारांची आज नितांत गरज 












- डॉ. एस. एन. पठाण
नारायणगांव ः सध्या देशात आमच्यावर अन्याय होतो म्हणून एक गट मोर्चा काढतोय तर दुसरा गट प्रतिमोर्चा काढून आधिच्या गटाचे म्हणने चुकीचे आहे असे सांगतो. विशेष म्हणजे युवकांच्यामध्ये सुद्धा या मोर्चा प्रतिमोर्चाची लागण झाली आहे, ही गंभीर बाब आहे. अशा या कठीण परिस्थितीमध्ये स्वामी विवेकानंदांच्या विचारांची देशाला खरी गरज आहे असे महत्त्वपूर्ण उद्गार डॉ. एस. एन. पठाण यांनी नारायणगांव, ता. जुन्नर येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त बोलतांना काढले.  
नारायणगांव येथील ‘धर्मवीर संभाजी पतसंस्था’, ‘भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट’ व ‘समविचारी मंच’ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू व विश्‍वशांती केंद्र (आळंदी), पुणे चे सल्लागार डॉ. एस. एन. पठाण यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी व्यासपीठावरून ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
डॉ. एस. एन. पठाण आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, स्वामी विवेकानंदांना “वेदांन्तिक मेंदू आणि इस्लामिक देह’ असा माणूस अपेक्षित होता व तो भारताचा सुवर्णकाळ असेल असे ते म्हणाले होते. इस्लाममधील समानतेवर आधारलेली समाजरचना त्यांना हवी होती. आज देशात अंतर्गत कलह निर्माण झाला आहे अशावेळी आपली भारतमाता विश्‍वगुरू कशी बनेल? असा विचार डॉ. पठाण यांनी मांडला. स्वामी विवेकानंदांनी “आयुष्यभर संघर्ष नको - परस्परांना सहाय्य करा, आत्मसात करा - विनाश करू नका, कलह नको, मैत्री हवी, शांती हवी” हाच विचार राबवला व म्हणूनच स्वामी विवेकानंदांच्या विचारांची आज देशाला नितांत गरज आहे असे डॉ. पठाण म्हणाले.
राजमाता जिजाऊंच्या मातृसत्ताक कुटुंब पद्धतीचा आदर्श
राजमाता जिजाऊंच्या बद्दल बोलतांना डॉ. पठाण म्हणाले की, छत्रपती शिवरायांच्यामध्ये प्रदान केलेली सर्व मानवी ऊर्जा संस्काराने विकसित करण्याचे काम राजमाता जिजाऊंनी केले. त्यामुळे छत्रपती शिवरायांचे राज्य म्हणजे ‘मातृसत्ताक कुटुंब पद्धतीचा आदर्शच’ म्हणावयास हवे. मातृसत्ताक कुटुंब पद्धती जगात विश्‍वशांती निर्माण करू शकेल हे त्यांनी अनेक उदाहरणाने पटवून दिले.
कार्यक्रमास नारायणगांवचे सरपंच श्री. योगेश (बाबु) पाटे, श्री. अमित बेनके, श्री. वसंतराव देशमुख, श्री. अनिल डेरे, श्री. दिपक वारूळे, श्रीमती संगिता बेहनजी, श्री. रविंद्र वाघोले, इ. मान्यवर उपस्थित होते.

फोटो ओळ - डॉ. एस. एन. पठाण यांचा सत्कार करतांना श्री. अनिल डेरे, सरपंच श्री. योगेश पाटे, श्री. अमित बेनके, श्रीमती संगिता बेहनजी, डॉ. डेरे, श्री. दिपक वारूळे आणि इतर.