सारथी संस्था वाचवण्यासाठी, मराठा समाजातील तरुणांच्या हक्कासाठी मी आयुष्यात पहिल्यांदा लाक्षणिक उपोषणाला बसणार आहे. गेले अनेक दिवस मी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले आहे, विशेष म्हणजे या संस्थेचे उदघाटन माझ्या अध्यक्षतेखालीच झाले होते. या संदर्भात काही दिवसांपूर्वी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटलो होतो. त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर तात्काळ मार्ग काढण्याचा शब्दही दिला होता.
त्यानंतर , दुसऱ्याच दिवशी मी सारथी च्या पुण्यातील कार्यालयात जाऊन, दोन्ही बाजूंची भूमिका समजुन घेतली आणि सरकार स्थिरस्थावर होईस्तोवर कुठलाच नवीन आदेश न काढण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु जे पी गुप्ता हे प्रधान सचिव दररोज नवीन आदेश काढून संस्थेला बदनाम करत असल्याचे दिसून येत आहे. त्यांना अशी कोणती घाई झाली आहे, की दररोज आदेश काढत आहेत?
आज मला जाणीव झाली आहे की, लोकशाही मार्गाने या मनमानी विरोधात लाक्षणिक उपोषण करण्याशिवाय पर्याय नाही. दिनांक- 11-01-2020 रोजी सारथी कार्यालयाजवळ शेकडो कार्यकर्ते आणि सारथी च्या लाभार्थ्यांसोबत बसणार आहे.
छत्रपती संभाजीराजे