Press note
*डॉ.लतिफ मगदूम यांना गुरुवर्य बाबुराव जगताप पुरस्कार प्रदान*
...............................
*इतिहासात रमू नका, विज्ञानाचे गाणे गात चला : डॉ.बाबा आढाव यांचे प्रतिपादन*
पुणे:
'कौमी एकता मंच' संस्थेतर्फे सामाजिक , शैक्षणिक क्षेत्रातील जेष्ठ कार्यकर्ते डॉ.लतिफ मगदूम यांना गुरुवर्य बाबुराव जगताप जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा कार्यक्रम ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, भवानी पेठ येथे रविवारी सायंकाळी झाला. राज्याचे निवृत्त अपर पोलीस महासंचालक अशोक धिवरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ बाबा आढाव अध्यक्ष स्थानी होते.
कौमि एकता मंचच्या अध्यक्ष माया प्रभुणे यांनी प्रास्ताविक केले.मनाली ताले यांनी सूत्रसंचालन केले.
राजीव जगताप,जयप्रकाश जगताप, एड. सरोजिनी मगदूम,रुकाय्या मगदूम, रुजुता वाकडे उपस्थित होते.
डॉ बाबा आढाव म्हणाले,'गुरुवर्य बाबुराव जगताप यांच्या नावाने डॉ. लतिफ मगदूम यांच्या रूपाने योग्य व्यक्तीचा गौरव होत आहे. गुरुवर्य जगताप हे आमचे, भाई वैद्य यांचे गुरू होते. त्यांचा पुतळा त्यांच्या संस्थेत उभारणे आवश्यक आहे.लतिफ मगदूम यांनी राष्ट्रीय एकात्मतेचा ध्यास घेतला. फुले दांपत्याच्या योगदानामुळे मुलींची झपाट्याने प्रगती होत आहे. चिंतनशिलता, कलात्मक सर्जनशीलता यावर समाजाची प्रगती ठरते. सैन्याच्या संख्येवर नाही. म्हणून,मागास समाजाच्या प्रगतीसाठी कार्यकर्त्यांनी पुढे आले पाहिजे. शिक्षणाचा विचार करताना विज्ञानाचे गाणे गायला हवे होते. इतर देश त्यामुळे पुढे गेले. चांद्रयान नेणारा देश इतिहासात इतका रमतो, हे आज पाहायला मिळते आहे. संविधान, संसदीय लोकशाही जपली पाहिजे. मुस्लिम समाज, हिंदू समाज, मुली विज्ञानाकडे हे घटक वळले पाहिजेत यासाठी सामाजिक काम झाले पाहिजे.आज धर्म, जात, लिंगभेद यावरून वाद होत आहे. सर्वांचा मानव्याकडे प्रवास झाला पाहिजे.
डॉ लतिफ मगदूम यांनी सत्काराला उत्तर देताना मनोगत व्यक्त केले.
' पंच हौद मिशन परीसरच्या कॉस्मोपोलिटन वातावरणात सर्व धर्मीय सण साजरे करीत आम्ही सामाजिक कार्यात आलो. गुरुवर्य जगताप यांचा साधेपणाचा आदर्श पुणेकरांसमोर आहे. त्यांच्या नावाने पुरस्कार मिळणे हे भाग्य आहे. ' भ्रष्टाचारापासून दूर रहा, चारित्र्य जपा ' हा संदेश मला बाबुराव जगताप यांनी दिला होता. शैक्षणिक, सामाजिक कामात त्यांचा आदर्श आम्ही समोर ठेवून काम करीत आहे. शिवाजी मराठा संस्थेच्या प्रांगणात पुतळा बाबुराव जगताप यांचा पुतळा व्हावा , यासाठी आम्ही माजी विद्यार्थी प्रयत्न करणार आहोत.
अभिनव शिक्षण संस्थेचे राजीव जगताप म्हणाले'हिंदू मुस्लीम एकात्मतेचे मगदूम कुटुंब प्रतीक आहेत. समाजासाठी कार्यरत शांतपणे कार्यरत राहणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव होत राहिला पाहिजे'.
अशोक धिवरे म्हणाले, 'सर्व समावेशक , कॉस्मोपॉलिटन वातावरण जपले पाहिजे. सामाजिक कार्यकर्ते दुर्मिळ होत चालले आहेत. ते जपले पाहिजेत. भावनांच्या जोरावर देशाची दिशाभूल करणाऱ्यां पासून सावध राहिले पाहिजे. कौमि एकतेचाच प्रसार केला पाहिजे.
...............................................