रस्ते साफसफाई चे कामाबद्दल  आक्षेप असलेबाबत.. 2) महानगरपालिका करिता नवीन प्रशासकीय इमारती  करीता  आक्षेप असलेबाबत...

. श्रावण हर्डीकर
   आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका,


   पिंपरी, पुणे ४११०१८.

           विषय : 1) रस्ते साफसफाई चे कामाबद्दल  आक्षेप असलेबाबत.. 2) महानगरपालिका करिता नवीन प्रशासकीय इमारती  करीता  आक्षेप असलेबाबत...


महोदय,
          पिंपरी चिंचवड   महानगरपालिकेमध्ये अनेक कामांमध्ये अनागोंदी कारभार चालू आहे.  यापूर्वी काही प्रकरणी आपण अद्याप पर्यंत कोणताही खुलासा शहरवासीयांना तथा मला दिला नाही.
          सदर पत्राद्वारे मी आपणांस सूचित करतो की खालील विषयी सत्ताधारी पक्षाकडून निविदा रिंग करून नागरिकांचा  कररूपी पैसा लाटण्याचा प्रयत्न आहे.
1) पिंपरी चिंचवड शहरातील रस्ते यांत्रिकी पद्धतीने सफाई करणेचे काम अनेक वेळा फक्त सत्ताधारी पक्षाचे नेत्यांचे डील फिस्कटले त्यामुळे पुढे ढकलण्यात येत आहे. वास्तविक अशी कामे करणारे अनेक कंपन्या आहेत पण सत्ताधाऱ्यांचे भय आणि भ्रष्टाचार यामुळेच  स्वच्छतेच्या कामात म्हणजे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या स्वच्छ भारत अभियान च्या योजनेला हरताळ फासला जात आहे.
     या कामात नियमावली दुरुस्त करून स्पर्धा होऊन योग्य व चांगल्या संस्थांना योग्य दरात  अशी कामे मिळू शकतात. मात्र सत्ताधारी पक्षाच्या दबावामुळे एकही निविदा अद्याप प्राप्त झाली नाही, हे सर्व नियोजीतच आहे. ठराविक कंपन्यांनाच  ही कामे मिळणार आहेत. 7 वर्षाच्या दीर्घ मुदतीचे काम का व कोणासाठी?  हा एक प्रश्न आहे. या निविदेत अपेक्षित स्पर्धा होणार नाहीत व दर त्याप्रमाणे येणार नाहीत. योग्य स्पर्धा व नागरिकांच्या पैशाचा योग्य वापर होणेसाठी सदर प्रक्रिया रद्द करून यात नियमावली दुरुस्ती होऊन फेरनिविदा करावी ही मागणी आहे. 


2) महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारती साठी काही सत्ताधारी लोकांनी घाट घातला आहे, हा तर सरळसरळ दरोडाच आहे. आज महापालिकेचे अधिकारी रस्त्यावर तर बसत नाहीत ना?   उलट  राज्यात या महानगरपालिकेकडे पाहूनच सुधारणा होत आहेत  मग आजचा हा अवास्तव खर्च कोणासाठी? 
      शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत आहे, त्यासाठी मोठी कामे गरजेची आहेत.अनेक नगरसेवकांच्या वॉर्ड मध्ये त्यांच्या मागणीनुसार नागरिकांना उपयोगी प्रकल्पांची मागणी आहे, रस्त्यांसाठी भूसंपादनासाठी, स्मार्ट सिटीप्रमाणे प्रत्येक वॉर्ड होणे गरजेचे आहे  अशा सर्व कामांसाठी  खर्च करावा,  आज रोजी ज्या गोष्टीची आवश्यकता नाही व प्रत्यक्ष नागरिकांना त्याचा उपयोग नाही अशा प्रकल्पांवर खर्च करणे म्हणजे केवळ नागरिकांच्या पैशाची लूट करणे हाच आहे. या इमारती मुळे प्रशासकीय बैठक जी आज व्यवस्थित आहे त्या आणखी सुधारणा होतील व सत्ताधार्यांनी 5 स्टार ऑफिस चे प्लँनिंग केल्याचे समजते, त्यापेक्षा देशातील प्रत्येक नागरिक, विद्यार्थी, पर्यटक  आपल्या शहरांत येईल अशा स्वरूपाचे सायन्स पार्क सारखा प्रकल्प करावा. या पत्राद्वारे आपण महानगरपालिकेच्या नवीन इमारती करीता  मंजुरी देऊ नये व समस्त शहरवासीयांसमोर असे प्रस्ताव  सूचनांकरिता ठेवावेत ही मागणी करित आहे.
     कृपया आपण वरील मागणीप्रमाणे दोन्ही विषयांना स्थगिती द्यावी व दोन्ही विषयांचे आपणाकडे उपलब्ध असणारे सादरीकरण आमचे समक्ष करावे  तोपर्यंत  कोणताही अंतिम निर्णय घेऊन नये ही तीव्र  मागणी व विनंती या पत्राद्वारे करीत आहे.
     याबाबत मला आपण पत्रव्यवहार कराल ही विनंती.


सदरची बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिध्द करावी ही विनंती.


कळावे,


आपला स्ंनेहांकित


 संजोग वाघेरे पाटील