एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे तर्फे९वा राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर!८ जानेवारीला राज्यपालांच्या हस्ते एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे येथे पुरस्कार प्रदान 

कृपया प्रसिध्दीसाठी                                                                                                                                       दि. ३१ डिसेंबर २०१९


एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे तर्फे९वा राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर!८ जानेवारीला राज्यपालांच्या हस्ते एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे येथे पुरस्कार प्रदान
पुणे, ३१ डिसेंबर: समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनिय कार्य करून मानवाच्या सर्वांगिण विकासात महत्वपूर्ण भूमिका पार पाडणार्‍या व्यक्तिंना एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे, विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह व भारत अस्मिता फाउंडेशन, पुणे यांच्यातर्फे ९व्या राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. 
यामध्ये कृषीरत्न हा पुरस्कार विष्णुपंत केरू गायखे (रा.पळसे, ता.जि.नाशिक), समाजरत्न सौ. कुशावर्ता चंद्रशेखर बेळे (मु.पो.ता. देवणी, जि. लातूर), आरोग्यरत्न डॉ.संदीप मनोहर डोळे (मु.पो.नारायणगांव, ता.जुन्नर, जि.पुणे), शिक्षणरत्न सुधीर बाळासाहेब खाडे (नळदुर्ग,ता. तुळजापूर, जि.उस्मानाबाद), क्रीडारत्न ऋचा राहुल धोपेश्‍वर (पुणे), ग्रामरत्न पुरूषोत्तम अंबादास घोगरे (खिरगव्हाण समशेरपूर, जि. अमरावती), बचतगटरत्न पुजा नितीन खडसे  (दोंडाईचे, ता. सिंदखेड, जि. धुळे), जनजागरणरत्न जयप्रकाश आसाराम दगडे (लातूर) व अध्यात्मरत्न ह.भ.प.श्री.सुधाकर महाराज इंगळे (मु.पो. राजेश कोठे नगर, सोलापूर) यांना जाहीर करण्यात आले आहेत. 
शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, स्मृती चिन्ह, संत श्री ज्ञानेश्‍वर माऊलीची प्रतिमा व प्रत्येकी रू.११,०००/- रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 
हा पुरस्कार प्रदान समारंभ बुधवार, दि.८ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ५.०० वा. एमआयटी वर्ल्डपीस युनिव्हर्सिटी, संत श्री ज्ञानेश्‍वर सभागृह, कोथरूड, पुणे येथे होणार आहे.
या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगत सिंह कोश्यारी हे उपस्थित राहणार आहेत. तसेच, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. सुप्रसिध्द संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर व ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. 
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड हे असतील. अशी माहिती राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड राज्यस्तरीय पुरस्कार समितीचे समन्वयक व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्‍वनाथ कराड यांनी दिली. 


पुरस्कारार्थीं संक्षिप्त माहितीः


१) राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड कृषीरत्न पुरस्कार - श्री.विष्णुपंत केरू गायखे 
हे प्रगतीशील शेतकरी असून ते ४० एकर जमिनीमध्ये ऊस सोयाबीन व इतर पिके घेत आहेत. २० वर्षांपासून शेतकर्‍यांना मार्गदर्शन करीत आहेत. माती व पाणी परीक्षण केंद्रामार्फत जमिनीची आरोग्य तपासणी कार्यक्रम ते राबवित आहेत. त्यांनी शेकडो गरजू महिलांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. १० गावच्या शेतकर्‍यांना एकत्र आणून त्यांनी नाशिक हनी बी शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड सुरू केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. 


२) राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड समाजरत्न पुरस्कार - सौ. कुशावर्ता चंद्रशेखर बेळे 
६ वी पर्यंत शिक्षण झालेल्या कुशावर्ता यांनी १९८२ पासून समाजसेवेचे व्रत धारण केले. ग्रामीण महिलांच्या ज्वलंत प्रश्‍नावर त्या घडाडीने कार्य करीत आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आरोग्य, पर्यावरण, पाणलोट क्षेत्र, कुटुंब कल्याण, शिक्षण, राजकारण, महिला बचत गटाच्या माध्यमातून अर्थकारण करीत आहेत. ग्रामीण विकास महिला विकास संस्थेच्या माध्यमातून २०० स्वयंसहाय्य महिला बचत गटातील ३ हजार महिलांच्या कुटुंबाचा गाढा त्या ओढित आहेत. धरती बचाओ आंदोलन, दारूबंदी, साक्षरता अभियान, हुंडा बंदी, लघुउद्योग, अंधश्रध्दा निर्मुलन व भ्रष्टाचाराला आळा घालण्याचे काम त्या करीत आहेत.  


३)राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड आरोग्यरत्न पुरस्कार - डॉ.संदीप मनोहर डोळे 
डॉ मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून डॉ. डोळे हे पुणे, अहमदनगर, नाशिक व ठाणे येथील आदिवासी व दुर्गम भागातील रुग्णांच्या नेत्रोपचारासंबंधी ते काम करतात. या फाउंडेशनच्या वतीने आतापर्यंत १.५० लाखापेक्षा अधिक रूग्णांचे निःशुल्क ऑपरेशन केले. रक्तदान शिबिरे, मधुमेह, हदयविकार, त्वचा विकाराशी संबंधीत अनेक आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन त्यांनी केले आहे. नेत्र तपासणीसाठी उपयुक्त मोबाईल आय केअर युनिटच्या माध्यमातून अतिदुर्गम भागातील लोकांच्या घरी जाऊन त्यांना मोफत उपचार डॉ. डोळे देत आहेत. 


४) राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड शिक्षणरत्न पुरस्कार - सुधीर बाळासाहेब खाडे, कार्याध्यक्ष, आपलं घर, नळदुर्ग  
राष्ट्रीय सेवा दलाने १९९३ मध्ये लातूर येथे झालेल्या प्रलंयकारी भूकंपामुळे अनाथ निराधार झालेल्या मुला मुलींसाठी २४ डिसेंबर १९९३ रोजी आपलं घरची स्थापना केली. सध्या पूर्ण अनाथ, अर्ध अनाथ मुला मुलींसाठी निवासी शिक्षणाची संधी या संस्थेच्या माध्यमातून ते देते आहेत. येथे १०वी पर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे. विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक, शारिरीक आणि शैक्षणिक अशा सर्व बाजूंनी विकास व्हावा यासाठी सतत प्रयत्न करीत आहेत. व्यवसाय प्रशिक्षण म्हणून शिलाई वर्ग आणि संगणक वर्ग १ली पासून १०वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी चालविले जात आहेत. स्वयंरोजगाराचे किमान काही कौशल्य विकसित करून भारताचे जबाबदार नागरिक घडविण्याचे कार्य आपलं घर करीत आहे. 


५)  राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड क्रीडारत्न पुरस्कार -  कु. ऋचा राहुल धोपेश्‍वर
ज्यूडो या खेळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पदक मिळविले आहेत. सन २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील  वर्ल्ड स्कूल गेम मध्ये सहभाग घेतला होता. तसेच, २०१५ मध्ये अशियन ज्यूडो चॅम्पियनशीपमध्ये पाचव्या स्थानावर होती. सन २०११ पासून रिचा यांनी या खेळात आपले प्राविण्य दाखवित आतापर्यंत राष्ट्रीय स्तरावर एकूण १५ सुवर्ण पदक, २ रौप्य पदक आणि १ कांस्य पदक मिळविले आहे. 


६) राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड ग्रामरत्न पुरस्कार- खिरगव्हाण समशेरपूरचे सरपंच पुरूषोत्तम अंबादास घोगरे
अमरावती जिल्ह्यातील अंजनगांव सुर्जी तालुक्यातील खिर गव्हाण गावात सरळ जनतेतून निवडून आलेले सरपंच घोगरे यांनी बेटी बचाओ, बेटी पढाओ, गावात जन्माला आलेल्या मुलीच्या नावाने दोन हजार रूपये जमा करणे, गावात १० हजारांपेक्षा अधिक वृक्षारोपण, बंदीस्त नाली, शोषखड्डे, तरूणांना शेतीवर आधारित व्यवसायाची संधी,  मुलींच्या नावे सुकन्या, मुलांच्या नावाने सुपत्र व नवरदेव नवरीच्या नावाने माहेरवाशिण नावाने वृक्षारोपण केले जाते. हे गाव १०० टक्के हगणदारी मुक्त व तंटामुक्त गाव आहे. गावाचा विकास व स्वच्छता पाहून शासनाचे अनेक पुरस्कार या गावाला मिळाले आहेत. 


७) राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड बचतगटरत्न पुरस्कार - पुजा नितीन खडसे या  
गेली १० वर्षापासून ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणासाठी कार्य करत आहेत. बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढविणे आणि त्यांना सक्षम करण्यासाठी यांची संस्था काम करत आहे. पापड उद्योग, कुरड्या बनविण्याचा उद्योग आणि सॅनेटरी नॅपकिन्स निर्मिती आणि विक्री उद्योग उभारले आहेत. या उद्योगाच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातील १ हजाराहून अधिक महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मदत केली आहे. 


८) राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड जगजागरणरत्न पुरस्कार -  जयप्रकाश आसाराम दगडे
गेली चार दशके पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असताना सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व अन्य क्षेत्रात विपूल लेखन केले आहे. लातूर येथील भूकंपावर असंख्य वार्तापत्रे, अंध वासहत उभारण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून पाठपूरावा केला होता.


९) राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड अध्यात्मरत्न पुरस्कार - ह.भ.प.श्री. सुधाकर महाराज इंगळे यांनी अनेक प्रबोधनपर कीर्तने- प्रवचने केली आहेत. संत तुकाराम महाराज, संत मुक्ताबाई यांच्यावर आधारीत पुस्तके लिहिली आहेत. गेल्या २४ वर्षांपासून दरवर्षी २५० कीर्तनांच्या माध्यमातून व्यसन मुक्ती, भारतीय संस्कृती, भागवत धर्म या विषयी युवा पिढीस व जनतेस प्रबोधन करीत आहेत. संत मुक्ताई वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वारकरी सांप्रदायाचे मोफत शिक्षण ते देत आहेत.


या पुरस्काराद्वारे महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये मोलाची कामगिरी बजावणार्‍या मात्र प्रसिद्ध नसणार्‍या व्यक्तींना प्रकाश झोतात आणून त्यांच्या कार्याची माहिती तरूण पिढीला करून द्यावी व या पिढीस त्या मार्गावर चालण्याची जिद्द बाळगण्यास प्रवृत्त करावे, हा संस्थेचा उद्देश आहे.