पुणे, दि. २७ डिसेंबर : विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे भारत तर्फे सोमवार, दि. ३० व मंगळवार, दि. ३१ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी ६.०० ते रात्री ९.३० वाजेपर्यंत विश्वराज बंधारा, विश्वशांती गुरुकुल, राजबाग, लोणी काळभोर, पुणे येथे 'एमआयटी सांस्कृतिक संध्या' संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दोन दिवस साजरा होणार्या या 'एमआयटी सांस्कृतिक संध्या' संगीत महोत्सवाचे उद्घाटन सोमवार, दि. ३० डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी ६.०० वाजता सुप्रसिध्द लेखक व दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल हे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
अत्यंत निसर्गरम्य व सुंदर अशा परिसरात होणार्या या संगीत महोत्सवामध्ये युवा शास्त्रीय गायक श्री. रमाकांत गायकवाड, श्रीमती देबवर्णा बसु, गायक श्री. रविंद्र यादव, सुप्रसिध्द पखवाज वादक पं.उध्दवबापू आपेगावकर आणि पं. सुप्रियो मोईत्रा हे आपली कला सादर करतील.
दि. ३१ डिसेंबर २०१९ रोजी सुप्रसिध्द व्हायोलिनवादक श्री.तेजस उपाध्ये, सुप्रसिद्ध बालगायिका कु.नंदिनी गायकवाड व कु.अंजली गायकवाड आणि सुप्रसिद्ध गायिका श्रीमती गोदावरीताई मुंडे आणि सुप्रसिध्द गायक श्री. उपेंद्र भट हे आपली कला सादर करणार आहेत . या कार्यक्रमाची सुरुवात श्री. तुकाराम दैठणकर यांच्या सनई वादनाने होईल.
भारतीय संस्कृती व परंपरेनुसार चैत्र शुध्द प्रतिपदा 'गुढी पाडवा' हाच खर्या अर्थाने नववर्ष दिन म्हणून ओळखला जातो. तथापि, ३१ डिसेंबरचा दिवस हा नववर्ष दिनाची पूर्वसंध्या म्हणून वेगळ्याच पाश्चात्य स्वरूपातील जल्लोषात सर्व भारतात व जगातही साजरा केला जातो. परंतु, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि विश्वशांती संगीत कला अकादमी, पुणे या संस्थेच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण समाजामध्ये व विशेष करून तरूण वर्गाच्या मनामध्ये 'स्वधर्म, स्वाभिमान व स्वत्व' जागवून खर्या अर्थाने 'भारतीय अस्मिता' जागविण्याचा संस्थेचा एक विनम्र प्रयत्न आहे. 'एमआयटी सांस्कृतिक संध्येच्या' कार्यक्रमातून 'संगीताच्या साधनेतून ईश्वर दर्शन व शांत रसाची अनुभूती' देणारा एक आगळावेगळा अलौकिक आविष्कार सर्व जाणकार रसिकांना मंत्रमुग्ध करेल.
विश्वशांती गुरुकुल येथील विश्वराज बंधार्याच्या विस्तीर्ण जलाशयात उभारलेल्या मंदिरस्वरूपी श्री महासरस्वती, श्री महालक्ष्मी व श्री महाजलदेवता या तीन विशेष मंचांवरून शांतरसाची अनुभूती देणारा 'एमआयटी सांस्कृतिक संध्या' हा विशेष कार्यक्रम दरवर्षी ३० व ३१ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
दि. १ जानेवारी २०२० रोजी सुरू होणार्या नव्या वर्षाची ही अभिनव सुरूवात भारतीय संस्कृतीला अनुसरून नामवंत, तसेच तरुण गायक व संगीतकार यांच्या सादरीकरणातून होणार आहे. एमआयटी सांस्कृतिक संध्येचा समारोप दि. ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री, त्याग व समर्पणाचे प्रतीक असलेल्या यज्ञकुंडामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर, विकार, विकृती व विकल्पासारख्या दुर्गुणांची आहुती देऊन, स्वत:चे आणि संपूर्ण समाजाचे पुढील २०२० हे वर्ष अत्यंत सुखाने, समाधानाने व शांततेने पार पडावे यासाठी प्रार्थना करून संकल्प सोडला जाईल.
या सांस्कृतिक संध्येच्या कार्यक्रमात सहभागी होऊन नाद-ब्रह्म-स्वरूपी 'संगीताच्या साधनेतून ईश्वर दर्शन व शांतरसाची अनुभूती' घ्यावयाची असेल, त्यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे विनम्र आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
अशी माहिती विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड व विश्वशांती संगीत कला अकादमीच्या कार्यकारी संचालिका सौ. ज्योती ढाकणे आणि महासचिव श्री.आदिनाथ मंगे
महोत्सवाचे आयोजन सुप्रसिध्द लेखक, दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या शुभहस्ते उदघाटन
महोत्सवाचे आयोजन
सुप्रसिध्द लेखक, दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या शुभहस्ते उदघाटन