विद्यार्थिनीला जबरदस्तीने कारमध्ये खेचून अश्लिल चाळे; युवासेनेच्या कार्यकर्त्याला चोपले.

विद्यार्थिनीला जबरदस्तीने कारमध्ये खेचून अश्लिल चाळे; युवासेनेच्या कार्यकर्त्याला चोपले.
__________________________________


अल्पवयीन तरुणीला जबरदस्तीने गाडीमध्ये खेचून तिचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेना युवासेनेच्या कार्यकर्त्याला चांगलाच चोप मिळाला आहे. सुमित खांदवे असे आरोपीचे नाव आहे. नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे. या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून अवधुतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. महिलांवरील बलात्कार, अत्याचाराच्या वाढत्या प्रकरणांवरून देशात संतापाची लाट उसळलेली होती. त्यातच शिवसेनेचे आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संघटनेच्या कार्यकर्त्याने हे प्रताप केल्याने यवतमाळमध्ये संतापाची भावना आहे. सुमित खांदवे हा युवासेना कार्यकर्ता आहे.खांदवे याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या या अल्पवयीन विद्यार्थिनीला गाडी थांबवत कामध्ये खेचले. यानंतर त्याने चालत्या कारमध्येच तिच्यासोबत अश्लिल चाळे केले. या प्रकाराने घाबरलेल्या विद्यार्थीनीने आरडाओरडा करताच रस्त्यावरून ये जा करणाऱ्या लोकांच्या लक्षात आले. त्यांनी ही कार पाठलाग करून थांबविली आणि मुलीची सुटका केली. यानंतर खांदवेच्या कृत्याने संतापलेल्या नागरिकांनी त्याला चांगलेच चोपले.लोकांनी पकडले असतानाही खांदवेने दादागिरी करत काही भाईंची नावे सांगत उपस्थितांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. यामुळे नागरिकांनी आणखी चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. खांदवेवर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे यवतमाळ शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनी आणि पालकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. याप्रकरणानंतर काही राजकीय पुढाऱ्यांनी प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी प्रयत्न केल्याचे समजते आहे. तक्रार मागे घेण्यासाठी मुलीच्या पालकांवर दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत.