नेहरु युवा केंद्राच्या उपक्रमांना सहकार्य करावे        - डॉ. जयश्री कटारे जिल्हास्तरीय युवा कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक संपन्न

नेहरु युवा केंद्राच्या उपक्रमांना सहकार्य करावे 
      - डॉ. जयश्री कटारे
जिल्हास्तरीय युवा कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक संपन्न


     पुणे दि. २६: केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या नेहरु युवा केंद्राच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांना संबंधित विभागांनी सहकार्य करावे, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी दिल्या.  जिल्हास्तरीय युवा कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक डॉ. कटारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली, यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीला नेहरु युवा केंद्राचे समन्वयक तथा समितीचे सदस्य सचिव यशवंत मानखेडकर उपस्थित होते.
     आदिवासी युवा आदान-प्रदान कार्यक्रम व काश्मिरी युवा आदान-प्रदान कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी शासकीय विभागांनी सहकार्य करावे, असे डॉ. कटारे यांनी यावेळी सांगितले. नेहरु युवा केंद्राच्या माध्यमातून कार्यरत असणा-या विविध संस्था, स्वयंसेवक तसेच जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारे युवक व नागरिकांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी 'स्वयंसेवा युवा दुत' ही संकल्पना जिल्ह्यात राबविण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच केंद्राच्या माध्यमातून वर्षभर चालणा-या उपक्रमांबाबत सदस्यांनी सूचना केल्या. 
 श्री. मानखेडकर म्हणाले, नवीन मतदारांसाठी स्थापन झालेले  'मतदार जागृती मंडळ' अधिक बळकट होणे आवश्यक असून शासकीय योजनांच्या प्रचार व प्रसारासाठी या मंडळाची मदत घेण्यात येईल.


  बैठकीला राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी  रामदास मारणे, प्रवीण निकम, शंतनु जगदाळे, समाजकल्याण अधिकारी विशाल लोंढे, क्षेत्रीय लोकसंपर्क अधिकारी पंकज दाभाडे, नवनाथ खांदवे तसेच शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते.
0000