नेरळ गणेश घाट येथील पुलाच्या बांधकामाला मुहूर्त मिळेना कर्जत,दि .21 गणेश पवार कर्जत

 


नेरळ गणेश घाट येथील पुलाच्या बांधकामाला मुहूर्त मिळेना
कर्जत,दि .21 गणेश पवार
                                कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील आदिवासी वाड्यांना जोडणारा पूल मार्च 2018 मध्ये कोसळला आहे.त्या ठिकाणी नवीन पूल बांधण्यासाठी तब्बल दोनवेळा भूमिपूजने करण्यात आली आहेत,मात्र अद्याप त्या पुलाच्या कामाला सुरुवात झालेली नाही.त्या पुलाच्या निर्मिती साठी नेरळ विकास प्राधिकरणने निधी दिला आहे,मात्र तरी देखील पुलाचे काम सुरू होऊ शकले नाही.दरम्यान,नेरळ विकास प्राधिकरण विरुद्ध आदिवासी लोक एकवटले असून लोकप्रतिनिधी यांना घेराव घालण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती मानवाधिकार संस्थेचे कार्यकर्ते गोरख शेप यांनी दिली आहे.
                              24 मार्च 2018 रोजी कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर नेरळ येथील ब्रिटिश कालीन धरणाच्या खाली असलेला लहान पूल कोसळला होता.तो पूल कोसळल्यामुळे नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील सात आदिवासी वाड्या आणि मोहाचीवाडी भागातील रहिवासी यांचा घरी जाण्याचा प्रवास बंद झाला होता.त्याचवेळी त्या सर्व ग्रामस्थांना पूल तुटल्याने पोलीस ठाण्याच्या समोरून जावे लागत होते,परिणामी त्यांचा घरी पोहचण्याचा प्रवास तीन किलोमीटरबे वाढला होता. त्यानंतर तत्कालीन आमदार  तसेच रायगड जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पुलाची तात्काळ निर्मिती केली जाईल असे जाहीर केले होते.पण पुलाच्या बांधकामाच्या प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ मे 2019 मध्ये म्हणजे पूल कोसळल्यानंतर एक वर्षानंतर झाला होता.
                              परंतु त्यावेळी फक्त कामाचा शुभारंभ करण्यासाठी नारळ फोडले गेले आणि 2018 प्रमाणे 2019 चा पावसाळा देखील पलीकडे बाजूला असलेल्या लोकांना जवळचा असलेला रस्ता मिळाला नाही. त्यामुळे नेरळ मधील जनतेने आपली नाराजी व्यक्त करीत सोशल मीडियावर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि रायगड जिल्हा परिषद यांची हुर्यो उडविण्यास सुरुवात केली आहे.ही बाब लक्षात येताच रायगड जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष आस्वाद पाटील यांनी पुलाच्या कामाची पाहणी केली.मात्र तो पाहणी दौरा देखील नेरळकरांसाठी एक स्टंट ठरला असून जिल्हा परिषदेच्या प्रभारी अध्यक्षांनी पाहणी दौरा करून महिना उलटायला आला तरी त्या पुलाच्या कामासाठी खड्डे देखील खोदले गेले नाहीत.ही बाब नेरळ मधील आदिवासी समाजाच्या जिव्हारी लागली असून आदिवासी समाजाचे नेते असलेले वामन ठोंबरे यांच्या पहिल्या स्मृती दिनी कोंबलवाडी येथे झालेल्या कार्यक्रमात नाराजी व्यक्त केली.तर पुलाच्या निर्मितीसाठी पूल तुटल्याने पहिल्या दिवसापासून आवाज उठविणारे मानवाधिकार संघटना आता अधिक आक्रमक झाली आहे.पूल तुटल्यानंतर दीड पेक्षा अधिक वर्षे लोटली असून पूल उभा राहणे दूर पुलाच्या कामाला देखील सुरुवात झाली नाही.त्यामुळे आता स्थानिक आदिवासी लोक आणि मोहाचीवाडी ग्रामस्थ यांना एकत्र घेऊन मानवाधिकार संघटना लोकप्रतिनिधी यांना घेराव घालणार आहे.त्यासाठी आम्ही सर्वत्र जाऊन बैठका घेत आहोत अशी माहिती गोरख शेप यांनी दिली आहे.


 


 



प्रवीण मोरगे-उपाध्यक्ष, मानवाधिकार संघटना
जिल्हा परिषदेने किती अंत पाहायचा याला काही अर्थ असला पाहिजे.जिल्हा परिषद निधी जाहीर करते मग कामे का होत नाहीत हे न समजण्यासारखे असून जनतेला उल्लू बनविण्याचे काम सध्या सुरू आहेत.त्यामुळे यापुढे आम्ही अधिक अंत पाहणार नाही.


 


 



प्रवीण आचरेकर-उप अभियंता, नेरळ विकास प्राधिकरण
या पुलाच्या निर्मितीसाठी नेरळ विकास प्राधिकरण मधून 40 लाखाचा निधी दिला आहे.ठेकेदार देखील नक्की झाला असून पुलाचे काम करण्यासाठी माती आणून टाकली असून लवकरच काम सुरू करण्याचे निर्देश ठेकेदाराला देण्यात येतील.