पुणे प्रवाह न्युज पोर्टल
मराठीतील नव्या चित्तथरारक वेबसिरीजचे चित्रीकरण
लॉकडाऊननंतर सिनेमांच्या आणि वेबसिरीजच्या चित्रीकरणासाठी सरकारने परवानगी दिली. त्यामुळे अनेक सिनेमांचे आणि वेबसिरीजचे चित्रीकरण सुरू करण्यात आले. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मसमुळे वेबसिरीजना सुगीचे दिवस आले आहेत. त्यामुळे प्रेक्षकवर्ग वेबसिरीजकडे वळला आहे.
नवोदित दिग्दर्शक 'तेजस लोखंडे' याने नव्या वेबसिरीजच्या चित्रीकरणाला सुरूवात केली आहे. वेबसिरीजच्या शुटिंग दरम्यानचा एक फोटो नुकताच त्याने सोशल मिडीयावर शेअर केला आहे. 'चंद्र फिल्म ॲंड एंटरटेन्मेंट', 'चंद्रप्रकाश यादव' आणि 'प्रशांत सावंत' हे या वेबसिरीजची निर्मिती करत आहेत. या वेबसिरीजचे सहनिर्माते प्रशांत मधुकर राणे आहेत. तर शिवराज सातार्डेकर हे डिओपी आहेत. यातील कलाकारांची नावे सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.
अंजली, दुहेरी, नकळत सारे घडले या लोकप्रिय मालिकांचे दिग्दर्शन करणारा दिग्दर्शक 'तेजस लोखंडे' त्याच्या नव्या प्रोजेक्टविषयी सांगतो, ''ही माझी पहिलीच वेबसिरीज असल्याकारणाने मी खूप उत्सुक आहे. या वेबसिरीजचा विषय माझ्या अत्यंत जवळचा आहे. ही वेबसिरीज करण्यापूर्वी मी ब-याच वेबसिरीज पाहिल्या त्यांचा अभ्यास केला. माझ्या नव्या वेबसिरीजसाठी देवाचे आणि तुमचे आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी राहू देत. हीच सदिच्छा.
या वेबसिरीजचे निर्माते चंद्रप्रकाश यादव आपल्या पहिल्या वेबसिरीजविषयी सांगतात, ''ही माझी पहिलीच वेबसिरीज आहे. तेजस लोखंडे हा अनुभवी दिग्दर्शक आहे तर अजिंक्य ठाकूर हा लेखन कौशल्यात तरबेज आहे. आणि सहनिर्माते प्रशांत राणे हे या वेबसिरीजचे प्रोजेक्ट प्रमुख आहेत. अशी संपूर्ण टिम या वेबसिरीजसाठी कार्यरत आहे. त्यामुळे मी फार उत्सुक आहे.''
निर्माते प्रशांत सावंत यांना वेबसिरीजच्या निर्मितीविषयी विचारता ते म्हणाले, ''२०११ पासून मी या क्षेत्रात काम करत आहे. निर्माते चंद्रप्रकाश यादव यांच्यामदतीने मी २०१९ साली 'चंद्र एंटरटेन्टमेंट' ह्या प्रोडक्शन हाऊसची निर्मिती केली. गेली एक वर्ष ह्या प्रोडक्शनच्या माध्यमातून काही तरी नविन करण्याचा प्रयत्न चालू होता आणि माझ्या प्रयत्नांना यश मिळाले. या नव्या मराठी वेबसीरीज कथेची टिम माझ्या संपर्कात आली. आणि त्यावर मी काम करण्याचा निर्णय घेतला. या सर्व प्रयत्नात प्रशांत मधुकर राणे यांनी मला मोलाचे सहकार्य केले आणि आम्ही या वर्षाअखेरीस ह्या वेबसिरीजचे चित्रीकरण सुरू केले.''
या वेबसिरीजचे लेखक अजिंक्य ठाकूर वेबसिरीजच्या शुभारंभाविषयी म्हणतात, ''बऱ्याच महिन्यांच्या प्रयत्नांनंतर या वेबसिरीजच्या चित्रीकरणाचा शुभारंभ होत आहे. ह्यात मोरयाचे आशीर्वाद आणि संपूर्ण टिमचे कष्ट जोडलेले आहेत. आता श्रीं नी ह्याची मुहूर्तमेढ रोवली आहे म्हटल्यावर पूर्णत्वाला नेण्याची जबादारी ही त्यांचीच राहते. ह्या वेब शोचा लेखक म्हणून मी आपल्या सर्वांच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा कायम ऋणी राहीन.''
चंद्र फिल्म ॲंड एंटरटेन्मेंट, चंद्रप्रकाश यादव आणि प्रशांत सावंत ह्यांची निर्मिती असलेली, तेजस लोखंडे दिग्दर्शित आणि अजिंक्य ठाकूर लिखित या नव्या मराठी वेबसिरीजचे चित्रीकरण दणक्यात सुरू झाले आहे. यात कोणकोणते कलाकार असणारं आहेत याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळतेय.