पुणे प्रवाह न्युज पोर्टल



भारतीय शिक्षणाचे आंतरराष्टीयीकरण ही काळाची गरज

चौथ्या नॅशनल टीचर्स कॉँग्रेसच्या तिसर्‍या दिवशी मान्यवरांचा सुरू


पुणे,दि.17 डिसेंबर:“ भारताने शिक्षण क्षेत्रात आंतरराष्ट्रीयीकरणासाठी उचललेले पाऊल भविष्यासाठी सर्वांनाच लाभदायी असेल. त्यामुळे देशात परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रमाणात वाढ होऊन परदेशी चलनात मोठी वृद्धि होईल. शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तापूर्ण संशोधन व कौशल्यांचा विकास झाल्याने भारतीय विद्यार्थी हा जागतिक नागरिक बनेल. त्यामुळे शिक्षणाचे जागतिकीकरण हेही अत्यंत महत्वाचे आहे.” एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे तर्फे आयोजित ऑनलाईन चौथ्या ‘नॅशनल टीचर्स काँग्रेस’च्या तिसर्‍या दिवसाच्या सत्रात असा सूर मान्यवरांनी काढला.

ही परिषद ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020ः उपलब्ध संधी’ या विषयावर आहे. यावेळी शैक्षणिक तंत्रज्ञानः उच्च शिक्षण आणि शालेय शिक्षणामध्ये मूलभूत परिवर्तन आणि भारतीय शिक्षणाचे जागतिकीकरण या विषयांवर मान्यवरांनी विचार मांडले.

 या समारंभासाठी पॅरिस येथील सहयोगी प्राध्यापिका भूमिका गुप्ता, एआययूच्या महासचिव डॉ. पंकज मित्तल, न्यूझीलँड युनिव्हर्सिटीच्या फायनॅन्शियल एज्युकेशन अँण्ड रिसर्च सेंटरच्या संचालिका डॉ. पुष्पा वूड, मिलर कॉलेज ऑफ बिजनेसचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुशील शर्मा, प्रदिप कुमार, अहमदाबाद येथील आयआयएमचे प्राध्यापक सॅबेस्टियन मॉरियस, एसएनडीटी युनिव्हर्सिटीच्या एज्युकेशन टेक्नॉलॉजी विभागाच्या संचालिका जयश्री शिंदे, ईएमएमआरसी पुणेचे संचालक समीर सहस्त्रेबुद्धे हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.  

यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या शिक्षणविभागाच्या संचालिका डॉ. सुहासिनी देसाई उपस्थित होत्या.

भूमिका गुप्ता म्हणाल्या,“ भारतीय शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण करणे हे आमच्या समोरिल मोठे आव्हान आहे. त्यासाठी येथील शैक्षणिक संस्थांनी जागतिक दर्जाचे अध्यापन करावे. एकीकडे सरकारने उच्च शिक्षणावरील परिणामाचे सखोल अध्ययन केले आहे. त्यमुळे आंतरराष्ट्रीय करणाचा भारतीय दृष्टिकोन जगासमोर आला पाहिजे. जागतिकी करणामुळे विद्यार्थ्याना विशेष अभ्यासक्रम निवडण्याची सोय आहे. तसेच निवडक विद्यापिठांमध्ये विद्यार्थ्यांना विशेष शिक्षण दयावे. विद्यार्थ्यांनी पाश्चात देशात संशोधन आणि विकासाच्या क्षेत्रात सहभागी व्हावे. उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयी करण देशासाठी उत्तम आहे. काळानुसार कौशल्य विकास अत्यंत महत्वाचा आहे.”

सुशील शर्मा म्हणाले,“ जागतिकीकरण आणि आंतरराष्ट्रीयीकरण या दोन्हींमध्ये सूक्ष्म फरक आहे. आज ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीयीकरण मोठ्या प्रमणात होत आहे ते जागतिकीकरणाच्या दिशेने उचललेले पाऊल आहे. अमेरिकेतील सर्व शिक्षण संस्थेत जगातील सर्व देशातील विद्यार्थ्यांना प्रवेश देतात. त्यामुळे येथील विद्यार्थी हा जागतिक नागरिक बनतो. शिक्षण संस्थांनी विविध प्रकारच्या परिषदांचे आयोजन केल्यास सहभागी प्राध्यापक जगासमोर येतांना दिसतील.”

डॉ. पुष्पा वूड म्हणाल्या,“ आंतरराष्ट्रीयीकरणामुळे आपण देशात जागतिक नागरिक घडवित आहोत. नव्या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांचे मन व बुद्धि घडविले जात आहे. येथील शिक्षण पद्धती आणि पाश्चात्य शिक्षण पद्धतीत खूप मोठे अंतर आहे. आंतरराष्ट्रीय करणामुळे आपल्या येथे मूल्याधिष्ठित शिक्षण पद्धतीची जडण घडण होण्यास मदत होईल. आता समग्र स्वरूपाच्या शिक्षणाची गरज आहे. त्यासाठी शालेय शिक्षणपासूनच लक्ष दयावे. आर्थिक कारणामुळे शिक्षण पद्धतीवर परिणाम होताना दिसतात. परदेशी शिक्षणामुळे देशातील विद्यार्थ्यांना परदेशी वातावरणाचा परिचय होतो.”

डॉ.पंकज मित्तल म्हणाल्या,“उच्च शिक्षणासाठी देशात विदेशातील बरेच विद्यार्थी येतांना दिसत आहेत. यावरून भारताच्या शिक्षणाला आंतरराष्ट्रीय स्वरूप येत आहे. तरी सुद्धा या संदर्भातील आपल्या देशातील कायदे शिथिल करण्याची गरज आहे. वर्तमान काळात भारतीय विद्यापीठे आणि परदेशी विद्यापीठांमध्ये शैक्षणिक करार होत आहेत. त्यामुळे आपल्या देशात परदेशी चलन येतांना दिसत आहे. देशातील आयुर्वेद व योग सारख्या विद्याशाखांना मोठी मागणी आहे. काही बाबतीत आंतरराष्ट्रीय धोरण हे खुले असावे. त्यासाठी असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी कार्य करीत आहे. सध्या ऑनलाइन टीचिंग पद्धतीमुळे परदेशी विद्यार्थ्यांची चांगली सोय होतांना दिसतेे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमुळे परदेशी विद्यार्थ्यांना भारताचा परिचय होतो. त्यातून ते येथे प्रवेश घेण्यास प्रवृत्त होतात. भारतात आंतरराष्ट्रीय स्वरूपाची समिती अस्तिवात आली पाहिजे.”

प्रा. सॅबेस्टियन मॉरियस म्हणाले,“ शिक्षणाची पाळेमुळे ही शालेय शिक्षणापासून सुरू होतात. शिक्षणाच्या प्रवाहात आपण विद्यार्थ्यांच्या कौशल्याकडे दुर्लक्ष केले आहे. ऑनलाइन शिक्षण पद्धतीच्या काळात कालानुरूप पारंपारिक विद्यापीठे नाहिशी होतील. अशा परिस्थितीत तंत्र शिक्षण संस्था आणि खाजगी शिक्षण संस्था मोठी कामगिरी बजावतील. आजच्या काळात सरकारकडून अर्थपूरवठा व्यवस्थित होत नसल्यामुळे समाजातून अनुदान मिळणे गरजेचे आहे. जगातील सर्व उच्च माध्यमिक शाळा वेगळ्या पद्धतीने चालविल्या जात आहेत. आजच्या काळात विद्यापीठांचे विकेंद्रीकरण आवश्यक बनले आहे. त्यामुळे उच्च शिक्षणामध्ये मुलभूत स्वरूपाचे बदल होतील.”

डॉ. जयश्री शिंदे म्हणाल्या,“ राष्ट्रीय शिक्षण धोरण हे वेगाने बदलणार्‍या तंत्रज्ञानावर आधारित आहे. अशा वेळेस एका प्रकारचे तंत्र शिकल्यास दुसरीकडे त्याचा खूप मोठा उपयोग होतो असे नाही. त्यासाठी अनेक प्रकारच्या अभ्यासक्रमांचे एकत्रीकरण विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरते. चांगल्या शिक्षणासाठी नवीन तंत्रज्ञान शोधणे आवश्यक आहे. तसेच यामुळे शिक्षणावर काय परिणाम होईल याचे ही संशोधन करावे लागेल. या शिक्षण पद्धतीत कौशल्यांचाही विचार होणे गरजेचे आहे.”

समीर सहस्त्रबुद्धे म्हणाले, “आजच्या तंत्रज्ञानाने एक नवीन समाजच जन्माला घातला आहे. त्यामुळे देशाच्या वेगवेगळ्या भागातून याला मोठी मागणी येत आहे. ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थी यात समरस होतांना दिसत आहे. हे सर्व पृथककरणात्मक तंत्र असल्यामुळे आम्हाला सामाजिक दृष्टिकोन असावयास हवा. या पद्धतीसाठी शिक्षकांनासुद्धा पूर्व तयारी करणे आावश्यक ठरते. त्यासाठी ऑनलाइन पद्धती उपयुक्त आहे. यामध्ये असंख्य अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. त्यातून आपल्याला एकाची निवड करावयाची आहे.”

यानंतर प्रदीप कुमार यांनी शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाचे लाभ सविस्तर समजावून सांगितले.

प्रा. अनुराधा पै व प्रा. आसावरीफडके यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ. मंगेश बेडेकर यांनी आभार मानले.