'ते' पेंटिंग नव्या पिढीला प्रेरणादायी : जयंत पाटील
- शरद पवार यांच्या भव्य पेंटिंगचे लोकार्पण
पुणे प्रवाह न्युज पोर्टल
माजी उपमहापौर दीपक मानकर यांची संकल्पना
पुणे (प्रतिनिधी) :
'शरद पवार साहेब यांच्या सातारा येथील ऐतिहासिक सभेत भर पावसात सभेला मार्गदर्शन करताना भिंतीवर उभारलेली भव्य दिव्य पेंटिंग ही शहरातील नव्या पिढीला आणि सर्वांनाच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले.
रमणबाग चौक येथे शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या संकल्पनेतून आणि नीलेश खराडे यांच्या कुंचल्यातून साकारण्यात आलेल्या ६० बाय ३० फूट भव्य दिव्य पेंटिंगचे लोकार्पण पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यांनतर ते माध्यमांशी बोलत होते.
याप्रसंगी आमदार संजय शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे, पुणे शहर कॉंग्रेस अध्यक्ष रमेश बागवे, शहर शिवसेना प्रमुख संजय मोरे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, दत्ता सागरे, हर्षवर्धन मानकर, करण मानकर, संजय पालवे, निलेश शिंदे, अप्पा जाधव तसेच महाविकास आघाडीचे शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी भिंतीवर पेंटिंग काढणारे आर्टिस्ट निलेश खराडे, योगेश भुवड, पंकज विसापूरे, विनायक आडगळे, शंतनु जोशी, नितीन परदेशी यांचा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जयंत पाटील म्हणाले की, ' आदरणीय पवार साहेबांचा येत्या १२ डिसेंबर रोजी ८० वा वाढदिवस होणार आहे, त्यानिमित्ताने दीपक मानकर यांच्या संकल्पनेतून आणि निलेश खराडे या आर्टिस्टनी भिंतीवर पवार साहेबांची हुबेहुब आणि उत्तम दर्जाची अशी पेंटिंग साकारली आहे. त्यांचे अभिनंदन आणि दीपक मानकर व त्याच्या मित्र परिवाराचे आभार मानतो. पवारसाहेब हे महाराष्ट्रातील नाही, तर देशातील नव्या पिढीचे प्रेरणादायी आहेत.'
दीपक मानकर म्हणाले की,' आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब हे माझे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या ८० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने काही तरी वेगळे करावे, असे मनात होते. तेव्हा विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक आणि प्रेरणादायी ठरलेल्या सभेचे पेंटिंग काढण्याचे ठरवले आणि तसे ते काढून पुणेकरांच्या वतीन साहेबांना भेट दिली.
Photo : Sushil Rathod