आयआयएमएसची 'थिंक टॅंक'कल्पनाविष्कार स्पर्धा उत्साहात संपन्न

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


आयआयएमएसची 'थिंक टॅंक'कल्पनाविष्कार स्पर्धा उत्साहात संपन्न


'यशस्वी एज्युकेशन सोसायटी'चा अभिनव ऑनलाईन उपक्रम.


पिंपरी:दिनांक :७डिसेंबर२०२० : यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या चिंचवड येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) तर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या 'थिंक टॅंक' या कल्पनाविष्कार स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला. या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यातल्या विविध पदवी व पदव्युत्तर पदवी महाविद्यालयांचे २७ संघ १०० विद्यार्थ्यांसह सहभागी झाले होते. 


कल्पना निर्मिती ही उद्योजकीय वाटचालीतील पहिली पायरी असते असे सांगत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ही 'थिंक टॅंक'कल्पनाविष्कार स्पर्धा महत्वाची भूमिका बजावते आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरसाठीही त्याचा लाभ होतो, असे मत आयआयएमएस चे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी व्यक्त केले. 


या ऑनलाईन स्पर्धेत डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी,पिंपरीच्या सिरील वर्गेसी,सुचिता घाटीकर, यशस्वी शर्मा व अंशुल कुमार या विद्यार्थ्यांचा संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला.सॅनिटरी पॅडचे पोर्टेबल व्हेंडिंग अँड डिस्पोजल मशिन ही कल्पना त्यांनी उत्कृष्टरीत्या सादर केली.  


तर आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयाचे निधी पुंडीर, सायली सोनावणे व निखिल अग्रवाल या विद्यार्थ्यांच्या संघांनी स्पर्धेतील द्वितीय पुरस्कार पटकावला. त्यांनी 'स्मार्ट रश मॅनेजर' या सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांमधील गर्दीची अद्ययावत माहिती देणाऱ्या मोबाईल ऍपची कल्पना मांडली. 


सादरीकरण कौशल्य,सृजनशीलता, नाविन्यता,स्वीकृती, प्रमाण, सामाजिक महत्व व समग्र परिणाम या निकषांच्या आधारे स्पर्धेतील विविध कल्पनांचे परीक्षण करण्यात आल्याचे आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी सांगितले. विजेत्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. डॉ. पुष्पराज वाघ, प्रा.महेश महांकाळ आदींचे या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभले.