मानव उन्नतीसाठी सहयोग आणि परस्परावलंबन सूत्राचा वापर करा सुरेश जोशी (भैय्याजी जोशी)

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



मानव उन्नतीसाठी सहयोग आणि परस्परावलंबन सूत्राचा वापर करा


सुरेश जोशी (भैय्याजी जोशी) याचे विचारः २५ व्या ऑनलाईन संतश्री ज्ञानेश्‍वर -तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफतांना


पुणे, दि. २५ नोव्हेंबर: “सहयोग आणि परस्परावलंबन या दोन सूत्रांचा वापर हा मानव उन्नतीसाठी करून त्यावर चालत रहावेे. तरच सृष्टीवरील सर्व व्यक्ती सुखी राहतील. संतांनी सुद्धा आपल्या ऊर्जेचा वापर मानव जातीच्या कल्याणासाठी केला आहे.”असे विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस सुरेश जोशी (भैय्याजी जोशी) यांनी व्यक्त केले.


एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्‍व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, आणि संतश्री ज्ञानेश्‍वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत २४ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या २५ व्या ऑनलाईन तत्वज्ञ संतश्री ज्ञानेश्‍वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंंफतांना प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.


याप्रसंगी इस्त्रोचे माजी अध्यक्ष पद्मश्री ए.एस.किरण कुमार, अक्षरधाम येथील प्रेरक वक्ता व अध्यात्मिक गुरू डॉ. गणवस्तल स्वामी बीएपीएस आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक पं. वसंतराव गाडगीळ


हे सम्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.


 अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिर्टी चे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासन प्रमुख डॉ. विश्‍वनाथ दा. कराड हे होते.


या प्रसंगी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ.मिलिंद पांडे, डॉ. आर.एम.चिटणीस, इंजिनियरींग विभागाचे अधिष्ठात डॉ. प्रसाद खांडेकर आणि कॉमर्स विभागाच्या सहयोगी अधिष्ठात डॉ. अंजली साने हे उपस्थित होते.


सुरेश जोशी म्हणाले,“मानवाला सर्व सुख व समाधान मिळावे, यासाठी तो परिश्रम करतो. आणि त्याच आधारे आजच्या शैक्षणिक धोरणाने त्याला महत्वपूर्ण स्थान दिले आहे. परंतू हे सत्य नाही. मानवाच्या शरीराबरोबर त्याला मन सुद्धा आहे आणि या मनाच्या स्तरावरील शिक्षण देणे गरजेचे आहे. मानव हा ज्ञान साधाना करून सुख मिळवितो. बौध्दिक आणि मानसिक स्तरावर सुख किंवा आनंद हा वेगवेगळा असू शकतो. परंतू आध्यात्मिक स्तरावर मिळणारा आनंद हा सर्वात मोठा आहे. संतांसारखे सर्वांनी समाज उन्नतीसाठी कार्य केले तर ती सर्वात मोठी सकारात्मक ऊर्जा असेल. त्यामुळे मानवाने शरीराच्या वर उठून, मन आणि बुद्धी पासून आत्म्यापर्यंत पोहचावे तेव्हाच खरे सुख प्राप्त होईल.”


“मी समाजाचा अविभाज्य घटक असून त्यासाठी प्रामाणिक कार्य करावे. विश्‍वात जी चैतन्य शक्ती आहे त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा. निसर्गाबरोबर समन्वय साधून चालावे. निसर्गाचा अति उपभोग घेऊ नका पुढील पिढीसाठी त्याचे जतन करून ठेवावे. याला ईश्‍वरीय संकेत समजून आपले जीवन जगावे.”


“जीवनात पुढे जाण्याला कोणतीही मर्यादा नसते. परंतू धर्म आणि मोक्ष हे जीवनाचे दोन अंतिम सत्य आहे. त्यामध्ये अर्थ आणि काम या दोन गोष्टीही तेवढ्याच महत्वाच्या आहे. अशा वेळेस अंतिम लक्ष मोक्ष आहे हे लक्षात ठेऊन जीवनाचा आनंद घ्यावा. मानवाचे शेवटचे लक्ष जगातून मुक्त होऊन मोक्ष प्राप्त करणे आहे.”


 डॉ. गणवत्सल स्वामी म्हणाले,“वैश्‍विक मुल्याधिष्ठित शिक्षण पद्धती आजच्या काळात सर्वात महत्वाची आहे. मानवकल्याण व एकतेसाठी हे अत्यंत गरजेचे असून प्रत्येक विद्यापीठांनी यावर अधिक भर द्यावा. यासाठी कठोर मेहनत म्हणजे प्रामाणिक पुरूषार्थ करावा, संयम किंवा ब्रह्मचर्याचे शिक्षण दयावे, कठीण परिश्रम, धर्माचा समावेश आणि देवावर विश्‍वास असावा, या गोष्टींचा समोवश शिक्षणपद्धतीत करावा. अपराविद्या हे विद्यापीठामध्ये मिळते, जे जीवन जगण्यासाठी गरजेचे आहे. परंतू खरी गरज ही परा विद्या म्हणजेच अध्यात्मिक शिक्षणाची आहे. ज्यामुळे मानवाची प्रगती होते.”


पद्मश्री ए.एस.किरण कुमार म्हणाले,“एकीकडे मानव चंद्रावर गेला तसेच, त्यांनी सर्व क्षेत्रात प्रगती केली. परंतू ते करतांना त्याने नैसर्गिक साधन संपत्तीचे मोठ्या प्रमाणात शोषण केले. त्याचा परिणाम म्हणजे आपल्यावर रोज नवनवीन संकटे येत आहेत. अंतराळ शास्त्रात प्रगती झाल्यामुळे आज आम्ही २४ तास सृष्टीवरील प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेऊन असतो. त्यामुळे सुरक्षा, सेना आणि नागरी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल घडविले जात आहेत. अंतराळ तंत्रज्ञानाने कृषी क्षेत्रात परिवर्तन करून त्यानुसार आम्ही नियोजन करीत आहोत. यामुळे आर्थिक, सामाजिक प्रगती आणि पर्यावरणासाठी मोठा उपयोग होत आहे. स्पेसमुळे कोविडच्या काळात शिक्षण क्षेत्रात बदल झाले. आज सर्व जग बंद असल्यावरही केवळ तंत्रज्ञानमुळे शिक्षण सुरू आहे.”


प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले “संतांनी जगासमोर आत्मिक विकास, समाज विकास आणि बुद्धिचा विकास मांडला. त्यात संत ज्ञानेश्‍वर यांनी बालपणातच वैश्‍विक तत्वे मांडून मानवाला सुखी व समाधानाचा मंत्र दिला. त्यामुळे त्यांनी सांगितलेले तत्व आपल्या जीवनात उतरवावे. त्यांनी निसर्ग तत्वाचे गुपीत ही सांगितले आहे. भारतीय संस्कृती, तत्वज्ञान आणि परंपरेचा यात मुद्दा आहे. या देशाने सदैव ज्ञानाची पूजा व अंतिम सत्याचा शोध घेतला आहे. वैश्‍विक मुल्याधिष्ठित शिक्षण पद्धतीमुळे मानवाचा सर्वांगिण विकास होऊ शकतो. त्यासाठी प्रत्येक शिक्षण संस्थेने पुढाकार घेऊन याचा अवलंब करावा.”


पं. वसंतराव गाडगीळ म्हणाले,“भारताने संस्कृत भाषा ही जगाला दिलेली देणगी आहे. विश्‍व शांती व विश्‍व कल्याणाचा संदेश आर्यव्रताने फार वर्षापूर्वीच मानवजातीला दिला आहे. तसेच संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम यांनी मानवजातीच्या उन्नतीसाठी सुख समाधानाचा मार्ग दाखविला आहे. वसुधैव कुटुम्बकम ही भारताची ओळख आज संपूर्ण जगात गरजेची बनलेली आहे.”


डॉ. मिलिंद पांडे यांनी व्याख्यानमालेच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली.


प्रा. अर्पणा दीक्षित यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. प्रसाद खांडेकर यांनी आभार मानले.