चित्रपट महामंडळात उलथापालथं,अध्यक्ष मेघराज भोसले यांच्या विरोधात अविश्वास ठराव आठ विरुद्ध चार मतांनी अविश्वास ठराव मंजूर, धनाजी यमकर प्रभारी अध्यक्ष

पुणे प्रवाह न्युज पोर्टल



चित्रपट महामंडळात उलथापालथं,अध्यक्ष मेघराज भोसले यांच्या विरोधात अविश्वास ठराव


आठ विरुद्ध चार मतांनी अविश्वास ठराव मंजूर, धनाजी यमकर प्रभारी अध्यक्ष 


कोल्हापूर : चित्रपट व्यावसायिकांची सर्वोच्च संस्था समजल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात गेले काही महिने धुमसत असलेल्या राजकारणाने गुरुवारी वेगळीच कलाटणी घेतली. अध्यक्ष मेघराज भोसले यांच्यावर मनमानी व घटनाबाह्य कामकाजाचा आरोप करत संचालकांनी आठ विरुद्ध चार मतांनी अविश्वास ठराव मंजूर केला. अध्यक्ष भोसले यांच्या विरोधात दंड थोपटणाऱ्या आठपैकी सात संचालक हे सत्तारुढ गटाचे आहेत. दरम्यान मेघराज भोसले यांनी ‘माझ्या विरोधात मांडलेला हा ठराव बेकायदेशीर आहे. यासंबंधी कोर्टात दाद मागू. तसेच अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नाही’अशी भूमिका घेतली आहे.


अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ गेल्या काही महिन्यात या ना त्या कारणानी सतत चर्चेंत आहे. महामंडळातील धनादेश चोरी प्रकरण, सभासदांना मिळालेली साखर काही जणांनी घराकडे नेणे या प्रकारामुळे महामंडळाचे धिंडवडे निघाले होते. चित्रपट महामंडळाची निवडणूक सहा महिन्यावर येऊन ठेपल्याने आरोप प्रत्यारोप वाढले होते. सत्तारुढ गटातच अध्यक्ष भोसले विरुद्ध उपाध्यक्ष धनाजी यमकर, रणजित जाधव असे चित्र निर्माण झाले होते.


गुरुवारी, संचालक मंडळाची बैठक बोलावली होती. दसरा चौक परिसरातील यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक झाली. बैठकीला सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच संचालक रणजित जाधव यांनी अध्यक्ष भोसले यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला. या ठरावाला अध्यक्ष भोसले यांच्या बाजूकडील संचालक संजय ठुबे, चैत्राली डोंगरे,विजय खोचीकर व खजानिस शरद चव्हाण यांनी आक्षेप घेतला. अध्यक्ष भोसले यांनी अशा पद्धतीने अविश्वास ठराव मांडता येणार नाही असे सांगितले. यावरुन संचालक मंडळात वादावादी झाली. बैठकीत सत्तारुढ गटाच्या अनेक संचालकांनी अध्यक्ष भोसले यांच्या कामकाजाचे वाभाडे काढले. महामंडळाचे एकूण चौदा संचालक आहेत. त्यापैकी सातारा जिल्ह्यातील अण्णा देशपांडे यांचे नुकतेच निधन झाले आहे. उर्वरित तेरा संचालकांपैकी आठ जणांनी अध्यक्ष भोसले यांच्या विरोधात मांडलेल्या ठरावाच्या बाजूने मतदान करण्याचा निर्णय घेतला.


 महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, संचालक रणजित जाधव, सतीश रणदिवे, सुशांत शेलार, पितांबर काळे, निकिता मोघे आणि विरोधी गटातून निवडून आलेले संचालक सतीश बीडकर अशा आठ जणांनी अध्यक्षांच्या कामकाजाला विरोध करत अविश्वास ठरावाच्या बाजूनी मतदान केले. अध्यक्ष या नात्याने भोसले यांना मतदान करता आले नाही.


तर भोसले यांच्या बाजूने संजय ठुबे, चैत्राली डोंगरे, शरद चव्हाण, विजय खोचीकर यांनी मतदान केले. आठ विरुद्ध चार मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाला.


…………………………… 


मेघराज भोसले यांच्यासोबत आम्ही गेली साडेचार वर्षे होतो. त्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला. मात्र त्यांनी संचालक मंडळ व सभासदांच्या विश्वासाला तडा जाईल अशा पद्धतीने कामकाज करायला सुरुवात केली. महामंडळात राजकारण आणले. साखर चोर, चेक चोर असलेल्या चुकीच्या व्यक्तींना पाठीशी घालण्याचा उद्योग केला. त्यामुळे त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला.


धनाजी यमकर, उपाध्यक्ष चित्रपट महामंडळ


………………


अध्यक्ष या नात्याने महामंडळ व सभासदांच्या हिताचा कारभार केला. मात्र संचालक मंडळातील काही जण व्यक्तीगत स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. त्यांची गैरकृत्ये उघडकीस येतील म्हणून माझ्याविरोधात एकवटले आहेत. त्यांनी माझ्या विरोधात मांडलेला अविश्वास ठराव हा बेकायदेशीर आहे. अशा पद्धतीने अविश्वास ठराव मांडता येत नाही. याविरोधात कोर्टात जाऊ. अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नाही. आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सभासदांच्या हिताचे निर्णय होणे महत्वाचे होते. मात्र त्यांनी बेकायदेशीररित्या कामकाज केले.


मेघराज भोसले, संचालक चित्रपट महामंडळ


…………………….


मेघराज भोसले यांच्या विरोधात आठविरुद्ध चार मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. त्यांनी महामंडळात मनमानी व बेकायदेशीररित्या कामकाज केले. त्यांच्या व्यक्तीकेंद्रित कामकाजाला संचालक मंडळांनी विरोध केला. येत्या काही दिवसात संचालक मंडळाची बैठक होऊन अध्यक्ष व नवीन पदाधिकारी निवडले जातील. मला अध्यक्ष व्हायचे नाही.महामंडळ एक परिवार आहे. त्या ठिकाणी राजकारण असू नये ही भूमिका आहे.


अभिनेता सुशांत शेलार, संचालक चित्रपट महामंडळ


………………….


प्रभारी अध्यक्षपदाचा कार्यभार धनाजी यमकर यांच्याकडे


भोसले यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर केल्यानंतर संचालक मंडळाने उपाध्यक्ष धनाजी यमकर यांच्याकडे प्रभारी अध्यक्षपदाचा कार्यभार सोपविला आहे. येत्या काही दिवसात संचालक मंडळाची नव्याने बैठक होवून अध्यक्ष निवडला जाणार आहे. त्यानंतर अन्य पदाधिकाऱ्यांच्या निवडी होतील. दरम्यान नवीन अध्यक्ष म्हणून अभिनेता सुशांत शेलार यांच्याकडे जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे.