कर्जत तालुक्यातील 1200 शेतकऱ्यांची पंतप्रधान किसान लाभ मध्ये फसवणूक... सामान्य शेतकऱ्यांना ठरवले करदाते जमा झालेली पेन्शन परत करण्याचे आदेश शेतकरी चिंताग्रस्त

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


कर्जत तालुक्यातील 1200 शेतकऱ्यांची पंतप्रधान किसान लाभ मध्ये फसवणूक...


सामान्य शेतकऱ्यांना ठरवले करदाते


जमा झालेली पेन्शन परत करण्याचे आदेश


शेतकरी चिंताग्रस्त 


कर्जत,ता.22 गणेश पवार


                 देशातील शेतकऱ्यांना शेतीशिवाय कोणताही व्यवसाय नसेल तर त्यांना जगता यावे यासाठी पंतप्रधान किसान योजना मधून वर्षाला 6000 रुपये दिले जाणार होते.कर्जत तालुक्यातील 3000 शेतकऱ्यांना त्या योजनेमधून 8000 ते 12000 दरम्यान रक्कम मिळाली आहे.मात्र कर्जत तालुक्यातील पंतप्रधान किसान योजनेतून पेन्शन मिळालेल्या 1200 शेतकऱ्यांना कृषी विभागाने करदाते ठरवले आहेत. दरम्यान,आपण कधी आयकर हे नाव ऐकले नाही आणि कधी आयकर भरला नाही असे असताना आयकर जमा झाल्याने पंतप्रधान किसान योजनेचे पैसे परत मागण्याचा शासनाने प्रयत्न सुरू केला.


             केंद्र शासनाने पंतप्रधान किसान योजना जाहीर करून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजाराची पेंशन देण्याचे धोरण 2018 मध्ये जाहीर केले.त्यानुसार शेतकऱ्यांच्या याद्या बँकांमार्फत शासनाकडे पोहचल्या.ज्यावेळी 2000चा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर येण्यास सुरुवात झाली,त्यावेळी सर्व भागातील शेतकऱ्यांनी आपली नावे पंतप्रधान किसान योजनेत यावीत यासाठी प्रयत्न सुरू केले. कर्जत तालुक्यात या योजनेमधून जेमतेम 3000 शेतकऱ्यांना पेंशन येत असून तालुक्यातील एकूण सातबारा नोंदीवर नाव असलेले शेतकरी यांची संख्या ही 15000 च्या आसपास आहे.त्यामुळे पंतप्रधान किसान योजनेचा लाभ जेमतेम 20टक्के शेतकऱ्यांना मिळाला,पण मागील वर्षभर पेंशन घेणाऱ्या शेतकऱ्यांना आता फास घेण्याची वेळ त्या शेतकऱ्यांवर आणली आहे.ज्या 3000 शेतकऱ्यांना शासनाने पंतप्रधान किसान योजनेमधून वर्षाला 6000 ची पेंशन देण्यास सुरुवात केली आहे,त्या शेतकऱ्यांना आयकर विभाग किंवा आयकर हा शब्द माहिती नव्हता,पण पंतप्रधान किसान योजनेची पेंशन शासनाने त्या शेतकरी खातेदाराच्या खात्यावर जमा केली आणि त्यातील 1200 शेतकरी स्वतः फसले गेले आहेत.


                 तालुक्यातील पंतप्रधान किसान योजनेचे पेंशन घेणाऱ्या 1200 शेतकऱ्यांना कर्जत तहसीलदार कार्यालय यांनी नोटिसा धाडल्या आहेत.पुणे येथे असलेले राज्याचे कृषी उप आयुक्त कार्यालयाने पंतप्रधान किसान योजनेच्या लाभार्थी यांच्याबाबत नवीन शोध लावला आहे.ज्या शेतकऱ्यांनी कधी इन्कम टॅक्स किंवा आयकर हा शब्दच ऐकला नाही,त्या 1200 शेतकऱ्यांच्या घरी कृषी उपआयुक्त यांच्या सुचनेने तहसिल कार्यालयाने नोटिसा पाठवल्या आहेत.त्यात पंतप्रधान किसान योजनेचे कर्जत तालुक्यातील 1200 शेतकरी लाभार्थी हे आयकर भरतात आणि असे आयकर भरणारे शेतकरी पंतप्रधान किसान योजनेचे लाभार्थी होऊ शकत नाहीत.त्यामुळे त्या 1200 शेतकऱ्यांनी आपल्या खात्यात शासनाने पाठवलेली पंतप्रधान किसान योजनेची पेंशन 7 दिवसांच्या आत तहसिल कार्यालयात येऊन जमा करावी असे लेखी कळविण्यात आले आहे.


चंद्रकांत ढुमणे-शेतकरी, झुगरेवाडी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना पेंशन देण्याची योजना सुरू केली आणि त्यात आम्हाला वर्षाला सहा हजार मिळू लागल्याने आम्ही खुश होतो.पण आता आम्ही आयकर भरतो असे कृषी विभागाचे म्हणणे असल्याने पेंशन म्हणून मिळालेली रक्कम परत देण्याची सूचना करण्यात आली आहे.आयकर म्हणजे काय? हे आम्हाला माहिती नाही आणि आम्ही आयकर भरतो म्हणून पेंशन परत करावी हे शासनाचे म्हणणे म्हणजे आम्हाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारी बाब आहे.त्यात लॉक डाऊन मुळे आमच्या हाताशी फुटकी कवडी नाही आणि असे असताना पैसे परत करायचे कसे?हा गंभीर प्रश्न सरकारने आमच्या समोर उभा केला आहे.