स्वतःचा दृष्टीकोन बदलल्यास जग बदलेल.  साध्वी निरंजन ज्योतीः २५ व्या संतश्री ज्ञानेश्‍वर -तुकाराम स्मृती व्याख्यानमालाचे एमआयटीत ऑनलाईन उद्घाटन

 पुणे प्रवाह न्युज पोर्टल



स्वतःचा दृष्टीकोन बदलल्यास जग बदलेल. 


साध्वी निरंजन ज्योतीः २५ व्या संतश्री ज्ञानेश्‍वर -तुकाराम स्मृती व्याख्यानमालाचे एमआयटीत ऑनलाईन उद्घाटन


पुणे, दि. २४ नोव्हेंबर: “संतांनी परिपूर्ण असलेल्या या देशाने वसुधैव कुटुम्बकमचा संदेश संपूर्ण जगाला दिला आहे. त्यामुळे सुखी व समाधानी राहण्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवून आणा म्हणजे जगही बदलेल. एमआयटीने संतश्री ज्ञानेश्‍वर तुकाराम यांच्या नावाने सुरू केलेल्या या व्याख्यानमालेचा लाभ संपूर्ण मानवाला होईल” असे विचार केंद्रीय ग्रामिण विकास राज्य मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी व्यक्त केले.


एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्‍व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, आणि संतश्री ज्ञानेश्‍वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत २४ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या २५ व्या तत्वज्ञ संतश्री ज्ञानेश्‍वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमालेच्या ऑनलाईन उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.


तसेच, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, ग्लोबल मास्टर ऑफ हार्टफुलनेसचे संस्थापक व आध्यात्मिक मार्गदर्शक कमलेश पटेल (दाजी), श्री अरबिंदो फाउंडेशन फॉर इंडियन कल्चरचे संचालक डॉ. संपदानंद मिश्रा, नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू व जगविख्यात संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.


 अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिर्टी चे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासन प्रमुख डॉ. विश्‍वनाथ दा. कराड हे होते. यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. एन.टी.राव, प्र-कुलगुरू प्रा. डॉ.मिलिंद पांडे व मिटसॉगचे वरिष्ठ संचालक रविंद्रनाथ पाटील हे उपस्थित होते.


साध्वी निरंजन ज्योती म्हणाल्या,“ भारताने संपूर्ण जगाला योग आणि आध्यात्माची नवी दृष्टी दिली आहे. सर्व संतांची हीच इच्छा आहे की संपूर्ण मानव जातीला शांती कसी मिळावी. या सृष्टीवरील भौतिक शांती ही क्षणिक असते त्यामुळे अध्यात्मिक शांती ही चिरंतन मानवाला सुखी बनविते. मानव कल्याण हाच सर्वात मोठा धर्म आहे. त्यामुळे प्रत्येकाने सेवाभाव ठेवावा. गरीब आणि पिडीत लोकांची सेवा करणारेच खरे ईश्‍वर आहेत.”


सुरेश प्रभू म्हणाले, “संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम यांच्या बरोबरच संत नामदेव यांनी संपूर्ण भारत भ्रमण करून वारकरी संप्रदायाचा अर्थ जनसामान्यात पोहचविला. एकीकडन् संत ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानाच्या माध्यमातून ईश्‍वर प्राप्ती होईल आणि संत तुकाराम यांनी अभंगातून सर्वांना मार्गदर्शन केले. जे कधीही भंग होत नाही ते अभंग तुकारामांचे आहेत. जीवन कसे जगावे, जीवनाचा खरा अर्थ काय आहे. हे या व्याख्यानमालेतून शिकण्यासारखे आहे. प्रत्येकातील क्षमतेला जागृत करण्याचे कार्य यातून होत आहे.”


“मानव हा शांतीच्या शोधात असतांना भगवान गौतम बुद्ध यांनी शांतीचे तत्व मांडले. त्यापासून बरेच लोक प्रेरित झालेत आणि होत आहेत. अध्यात्माच्या मार्गावर चालून सुप्त शक्तीला जागृत करा. तसेच, शुष्क जीवनाला खरा अर्थ आणावा.”


कमलेश पटेल (दाजी) म्हणाले,“ प्रत्येकाला शांतीची गरज असून त्यासाठी त्यांनी ज्ञानधारणा करावी. योगा आणि ध्यान धारणा ही प्रत्येक समस्यांचे समाधान आहे. जीवनात सदैव अडथळे येतील तसेच चढ उतार होतच राहणार आहे. अशा वेळेसे ध्यानाच्या माध्यमातून मनस्थिती शांत ठेवावी व त्यावर विजय मिळवावा. ध्यानाच्या आधारे बुद्धितील इलेक्ट्रॉनिक मॅग्नेटला शक्तीशाली बनवा. यातूनच ब्रेनमध्ये मोठे बदल घडवून आणू शकतो. ज्याचा उपयोग मानवजातीला सुखी, समाधानी आणि शांतीसाठी होईल.”


डॉ. संपदानंद मिश्रा म्हणाले,“साधू, संत आणि महत्मांनी विश्‍वाला वसुधैव कुटुम्बकमचा संदेश दिला आहे. शास्त्रानुसार उपदेश, संदेश व निर्देशातून दृष्टी निर्माण होते. हीच गोष्ट संतांनी समाजाला दिली आहे. दृष्टी ही आपल्या संस्कृतीचा पाया आहे. यातूनच समाजात शांतता नांदेल. ज्ञानेश्‍वर महाराजांनी एकम् सत विप्रा बहुधा वदन्तीचा संदेश संपूर्ण मानवजातीला दिला आहे. याचे अनुकरण प्रत्येकाने करावे.”


डॉ. विजय भटकर म्हणाले,“ व्यावहारिक, प्रांतभाषिक व पारमार्थिक सत्ताचा अनुभव घेऊन जीवन व्यतीत करावे. विज्ञान आणि तंत्रज्ञानची देणगी आपल्याला मिळालेली आहे त्यामुळेच कोरोनाच्या काळात ही व्याख्यानमाला होत आहे. यात आजपर्यंत ५०० पेक्षा अधिक वक्त्यांनी आपले विचार मांडून ज्ञानाचे भांडार उघडले आहे. यातून आम्हाला विचारांचा अदभूत अनुभव मिळत आहे. जो समाज परिवर्तनसाठी महत्वपूर्ण आहे. ज्ञानेश्‍वर आणि तुकाराम यांनी मानव कल्याणासाठी दिलेला संदेश आत्मसात करून वाटचाल करावी.”


प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले “१९९६ साली तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर माऊली व जगदगुरू तुकाराम महाराज यांच्या नावाने ही व्याख्यानमाल सुरू केली गेली. ज्ञानेश्‍वर व तुकाराम महाराजांचा संदेश मानवजातीपर्यंत पोहचविण्याचा मुख्य हेतू होता. आतापर्यंत या व्याख्यानमालेत अनेक विचारवंत, धर्मगुरू, तत्वज्ञ, शास्त्रज्ञ, शिक्षण तज्ज्ञ यांनी मार्गदर्शन करून ज्ञानाची गंगा पोहचविण्याचे कार्य केले आहे. जीवनाचा हेतू व कर्तव्य काय आहे याची जाणिव यातून यातून होत आहे.”


डॉ. मिलिंद पांडे यांनी व्याख्यानमालेच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. ही व्याख्यानमाला गेल्या २५ वर्षापासून सातत्याने होत असल्याचे नमूद केले. रविंद्रनाथ पाटील यांनी प्रास्ताविक केले.


प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रशांत दवे यांनी आभार मानले.