बाबासाहेबांच्या चळवळीत त्यांच्या नंतर जर कोणते नावं येत असेल तर ते फक्त दादासाहेबांचे आहे.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अत्यन्त विश्वासु सहकारी दिवंगत दादासाहेब गायकवाड यांचा आज दि 15 ऑक्टोबर रोजी जन्मदिवस,


पुणे :- ते देशाचे आरपीआयचे अध्यक्ष असताना त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक आंदोलने केली. त्यापैकी 1964 ला त्यांनी सरकारला विचारले, कसेल त्याची जमीन परंतु ज्यांच्या जवळ जमीन नाही त्याचे काय? असा सवाल केला व सरकारी जमीन मिळण्यासाठी जेलभरो आंदोलन करण्याचे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. देशभर व विशेषतः महाराष्ट्रात लाखो कार्यकर्त्यांनी यामध्ये सहभाग नोंदवून लाखो कार्यकर्ते जेलमध्ये गेले व राज्यातील सर्व जेल फुल झाले होते. हे एक ऐतिहासिक आंदोलन झालेले होते.


        या आंदोलनाचे पडसाद ग्रामीण भागापर्यंत पोहचले होते. त्यावेळी बुलढाणा जिल्ह्यातही कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागापर्यंत पोहचून आंदोलनाची तयारी करीत होते. त्यावेळी माझे वडील दिवंगत जानुजी घुमरे हे मेहकर तालुका आरपीआयचे अध्यक्ष होते. मेहकर तालुक्यात मेहकर, लोणार व सिंदखेडराजा या तालुक्याचा समावेश होता. या आंदोलनाच्या तयारीसाठी हँडबील बनवून बाजाराच्या ठिकाणी वाटप करण्यात येत होते व माझे वडील त्यांच्या सहकार्यसह तालुक्यायील मोठ्या गावी जाऊन सभा, मिटींग घेऊन वातावरण तयार करीत होते. 6 डिसेंबर 1964 या बाबासाहेबांचा स्मृतिदिनापासून जमिनीच्या आंदोलनाची सुरवात करण्याचे ठरविले. शासनाला या आंदोलनाची तीव्रता जाणवत होती. त्यामुळे आंदोलनापूर्वीच नेत्यांना अटक करण्याचे प्रयत्न ही झाले माझे वडील तेव्हा रात्रीतूनच दुसऱ्या गावी जात असत ते पोलिसांच्या हाती लागले नाही. तालुकाभर मोर्च्यासाठी वातावरण तापले होते. सुरवातीला घाटबोरी पासून सुरवात करण्याचे ठरले व नंतर जानेफळवरून मेहरकरला पायी लोक निघाली त्यादिवशी तालुक्यातील लोणार सिंदखेडराजा येथून हजारो लोक मेहकरला जमा झाले. *मेहकरला स्वतंत्र मैदानावर जाहीर सभा झाली त्यांस विदर्भाचे अध्यक्ष दिवंगत ऍड अवचार साहेब वाशीम व विदर्भाचे नेते दिवंगत शंकरराव खंडारे साहेब अकोला यांचे प्रमुख मार्गदर्शन व वडिलांसोबत तालुक्यातील काही पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली* या सभेस व आंदोलनामध्ये भाग घेण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी हजारो जनता मिळेल त्या वाहनाने व पायीपायी चालत आलेले होते. त्याकाळी या प्रचंड मोर्च्यांचे नेतृत्व दिवंगत घुमरे साहेबांनी केले होते (वडिलांना त्याकाळी सर्वच घुमरे साहेब म्हणत) मोर्च्यांकराना अटक झाली पण तेंव्हा मेहकरला न्यायाधीश हजर नसल्याने त्यांना एसटी मध्ये भरून चिखली येथे न्यायालयसमोर उभे केले त्यांना शिक्षा सुनावण्यात आली तेंव्हा एसटी मध्ये भरून बुलढाण्याचे जेलमध्ये जागा नसल्याने वाशीम, औरंगाबाद, अमराववती व अकोला येथे वेगवेगळे गट करून त्यांची रवानगी केली.


   *या आंदोलनात घुमरे साहेबांसोबत त्यावेळचे पदाधिकारी दिवंगत सखाराम खंदारे काकाउमरा, दिवंगत नागोराव जाधव काका दिवंगत राघोजी पेशवे काका, सिंदखेडराजा दिवंगत किसन काकडे दिवंगत किसन देबाजे दिवंगत तान्हाजी टेलर काका मेहकर दिवंगत सोमाजी सरदार काका शेंदला दिवंगत कंकाळ काका दिवंगत हरिभाऊ नवघरे काका व सध्या असलेले रामभाऊ खंदारे काका लोणी गवळी, दिवंगत गवई काका भोसा, दिवंगत महादु अंभोरे काका घाटबोरी, दिवंगत यशवंत वानखेडे काका देऊळगाव शाकरसा, दिवंगत श्रावण इंगळे वेणी, दिवंगत पनाड काका सुल्तानपूर, दिवंगत शाहीर अवसरमोल काका कल्याणा, दिवंगत गवई काका देऊळगाव माळी, दिवंगत भगवान मानकर धायफळ, दिवंगत दैनाजी गवई काका मारोतीपेठ, दिवंगत मारोती मिस्त्री बेळगाव, दिवंगत किसन खंदारे शेलगाव देशमुख, सध्या असलेले त्रंबकराव खंदारे काका विसवी, दिवंगत त्रंबकजी खंदारे उमरा दे, दिवंगत रावबा घवांदे अंजनी, दिवंगत खोडके काका डोणगाव दिवंगत सोनाजी पंडित जानेफळ दिवंगत जयराम खरात काका हिवरा, दिवंगत प्रतापराव नरवाडे काका टिटवी, दिवंगत मोरे काका लोणार दिवंगत गायकवाड काका नायगाव इ नेते होते* (काही नेत्यांची नावे मला आठवत नाहीत) त्या मोर्च्यांचे वेळी मी 10 वर्ष्याचा होतो परंतु ही नेते मंडळीं मेहकरला घरी सतत येतजात होते. ( दिवंगत दादासाहेबानंतर विदर्भात आरपिआयचे दोन गट अधिक सक्रिय होते बॅरिस्टर खोब्रागडे गट व दादासाहेब गवई गट, तेंव्हा तालुक्यात एकच गट राहावा म्हणून वडिलांनी बरेच प्रयत्न केले आरपीआय गट पडल्याने ते खुप दुःखी झाले होते पण दिवंगत सोमाजी सरदार काका यांनी गवई गट स्थापन केला होता. त्यावेळी खोब्रागडे गटाचे तालुकाध्यक्ष दिवंगत सखाराम खंदारे काकांना करून वडील जिल्ह्यामध्ये उपाध्यक्ष झाले तेंव्हा जिल्हाध्यक्ष दिवंगत गोपाळराव जाधव काका बुलढाणा हे होते व त्यांच्या नंतर वडील जिल्हाध्यक्ष झाले होते)


    जेंव्हा घुमरे साहेबांसोबतचे कार्यकर्ते यांना चिखलीवरून अकोल्याच्या जेलमध्ये 3,4 एसटीने पाठविले माझे मित्र मा चंद्रकांत झिने यांचे वडील दिवंगत झिने काका यांनी मला पुढील किस्सा सांगितला होता ते म्हणाले की मी त्यावेळी अकोला येथे तहसीलदार होतो अकोला यातील जेलमध्ये जागा नव्हती तेंव्हा या कार्यकर्त्यांनी खूप घोषणाबाजी करून गोंधळ घातला ही बाब पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना सांगितली यावर उपाय काय करावा अशी चर्चा करतांना त्यांना कोणीतरी सुचविले की तहसीलदार काका हे बुलढाण्याचे असून त्यांचे घुमरे यांचे संबंध चांगले आहेत तेंव्हा त्यांना जिल्हाधिकारी यांनी बोलावून घेतले यावर उपाय काय करावे विचारले तेव्हा त्यांनी जिल्हाधिकारी यांना सांगितले की मी त्यांना शांत करतो पण मला 2, पोते ज्वारीच्या भाकरी, बेसन व हिरव्या मिरच्यांचा ठेसा बनवून द्यावयास सांगा कारण ते 2 दिवसापासून उपाशी आहेत व जिनिग फक्ट्रीतुन मोठ्या ताडपत्र्या मागविण्यात याव्यात जेवल्यानंतर जेलच्या पटनगणातच ते झोपतील व काही तासातच त्याची तयारी करावी लागेल त्याप्रमाणे जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले व झिने काका वडिलांना व त्यांचा सहकार्यांना भेटण्यास गेले. त्यांना पाहून आमच्या वडिलांनी त्यांना मिठ्ठी मारली व या सर्वांची जेवण्याची सोय करा अशी विनंती केली तेंव्हा काकांनी सांगितलें की तुमच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे थोड्याच वेळात जेवण येईल. सगळे आनंदित झाले कारण त्यांच्या पोटात अन्न नव्हते मग जेवण आले सर्वच बेसन, भाकरीवर तुटून पडले खुप दाबून जेवण त्यांनी केली व उन्हाळ्याचे दिवस होते जेलच्या पटांगणात ताडपत्र्या टाकण्यात येऊन त्यांना झोपण्याची सोय केली दुसऱ्या दिवशी पुन्हा जेवण देऊन त्यांना सुट्टी देण्यात आली.


    या आंदोलना नंतर दिवंगत दादासाहेबांनी आमच्या वडिलांना नाशिकला बोलावून घेतले हे 2,3 पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन गेले.रेकॉर्डब्रेक आंदोलन केल्याने त्यांचे स्वागत दादासाहेबांनी केले व 2 दिवस मुक्काम त्यांनी तेथे केला तेंव्हा दादासाहेबांच्या सहवासात व दिवंगत शांताबाई दाणी यांच्या सोबत त्यांना राहावयास मिळाले.


       त्यानंतर दादासाहेबांनी सरकारी पडीत जमीन किंव्हा गायरान जमीन अतिक्रमण करून काढण्याचे व ती जमीन भूमिहीनांना देण्याचा हा कार्यक्रम पदाधिकाऱ्यांना दिला तेव्हा घुमरे साहेबांनी तालुक्यातील जवळ जवळ ज्या गावी सरकारी पडीत जमीन किंव्हा गायरान जमीनआहे त्या गावाला जाऊन व धुऱ्यावर उभे राहून जमिनी काढावयास लावल्या त्यावेळी गावातील सवर्ण जातीतील लोकांचा खुप दबाव असायचा मारहाण होत होती, पोलीस स्टेशनला तक्रारी होत होत्या. पेरून उगवलेले उभे पीक जनावरे घालून चारत असत खूपच त्रास तेंव्हा झाला पण घुमरे साहेब व त्यांचे सहकारी ठामपणे त्यांच्या पाठीशी राहत त्याकाळी हजारो एकर जमीन काढण्यात आली बुलढाणा जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जमीन मेहकर तालुक्यात काढण्यात आली त्याची सुरवात घुमरे साहेबानी त्यांच्या अंत्री देशमुख या गावापासून केली. आम्ही 6 एकर सरकारी गायरान जमीन काढली आजही ती जमीन कायम भाडेपट्ट्यासह आमच्याकडे आहे. त्याकाळी काढलेल्या जमिनीस कायम भाडेपट्टे त्यांना मिळवून दिले व जे पिढ्यान पिढ्या दुसऱ्याचा जमिनीवर मजुरी करावयाचे ते 5, 10 एकराचे मालक झाले हे निव्वळ दादासाहेबांच्या कृपेने हा चमत्कार घडून आला असे किती तरी निर्णायक लढे मागासवर्गीयांच्या हक्कासाठी त्यांनी दिले.


     *असे हे महाननेते दिवंगत दादासाहेब गायकवाड यांना त्यांच्या स्मृती दिनानिमित्त त्रिवार वंदन करतो.*


*लक्ष्मणराव घुमरे, बुलढाणा*