रक्तद्रवदात्यांची तपासणी करण्यासाठी विभागीय स्तरावर सुविधा ;गैरसोय होऊ नये म्हणून महापालिकेचा पुढाकार ; के.ई.एम. रुग्णालयात रक्तद्रव पेढी...

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


.


 मुंबई : करोनाबाधित रुग्णांना रक्तद्रव (प्लाझ्मा) उपचार देण्यासाठी वेळेत रक्तद्रव उपलब्ध होण्यासाठी के.ई.एम. रुग्णालयात रक्तद्रव पेढी सुरू करण्यात येणार असून येथे रक्तद्रवदान करण्यासाठी दात्यांना दोनदा हेलपाटे घालावे लागू नयेत म्हणून विभागीय स्तरावरच त्यांची तपासणी करण्याची सुविधा करण्यात येणार आहे. करोनाबाधितांवरील रक्तद्रव उपचारासाठी आवश्यक रक्तद्रव मिळविण्यासाठी रुग्णालये आणि कुटुंबाचे नातेवाईक यांना धावपळ करावी लागते. रक्तद्रव केंद्रीय पद्धतीने एकाच ठिकाणाहून पुरविणे सोयीचे करण्यासाठी के.ई.एम. रुग्णालयात मुंबईतील पहिली रक्तद्रव पेढी सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. यासाठी आवश्यक सामग्री आणि मनुष्यबळ येत्या काही दिवसांत उपलब्ध केले जाईल. दोन आठवडय़ांत ही रक्तपेढी कार्यरत होणार आहे. रुग्णालयात सध्या साडेतीनशेहून अधिक रक्तद्रव साठविलेला आहे. तेव्हा रक्तद्रव साठविणे, दुसऱ्या रुग्णालयांना देणे ही प्रक्रिया सुरूच आहे. परंतु याला केंद्रीय स्वरूप देण्यासाठी रक्तद्रव पेढी निर्माण केली जाणार आहे. रुग्णालयाने ३० हून अधिक रक्तद्रवाच्या पिशव्या खासगी आणि सरकारी रुग्णालयांना दिल्याचे के.ई.एम. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले. रक्तद्रवाची साठवणूक एक वर्षांपर्यंत करता येते. त्यामुळे आवश्यकतेनुसार येथून रक्तद्रव पुरविला जाईल. करोनामुक्त दात्यांच्या रक्तद्रव देण्यापूर्वी विविध तपासण्या करून ते पात्र आहेत का ठरविले जाते. त्यामुळे तपासणीसाठी आणि रक्तद्रव देण्यासाठी असे दोनदा दात्यांना रुग्णालयात येणे गैरसोयीचे ठरते.