एकसंघ देशासाठी सर्वांच्या मानगुटीवरील जातीचे भूत घालवावे रामराजे नाईक-निंबाळकर यांचे विचारः   एमआयटीत संत श्री ज्ञानेश्‍वर ज्ञान कारंजे व संत श्री तुकाराम विश्‍वशांती कारंजे यांचे उद्घाटन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



पुणे, २५ ऑक्टोबरः “ सध्याच्या काळात युवा पिढीला जातीची कीड लागलेली आहे. या देशाला एकसंघ करण्यासाठी सर्वांच्या मानगुटीवर बसलेले जातीचे भूत घालवावे लागेल. त्यासाठी संतांंनी दाखविलेले मार्ग सर्व सामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे.” असे विचार महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना.श्री. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.


विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूह आणि माईर्स एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठ तर्फे कोथरूड, पुणे येथे तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर माऊली-जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज विश्‍वशांती पर्यावरण प्रकल्प, इको-पार्कच्या अंतर्गत उभारण्यात आलेल्या ज्ञान व विश्‍वशांतीचे प्रतिक असलेले सुमारे १६० फूट उंचीचे तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर ज्ञान कारंजे (Divine Knowledge Fountain) आणि संत श्री तुकाराम विश्‍वशांती कारंजे (World Peace Fountain) यांचा उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.


या प्रसंगी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज, ह.भ.प.श्री. बापूसाहेब मोरे देहूकर हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. नालंदा विद्यापीठाचे कुलपती व संतवृत्तीचे थोर शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे अध्यक्षस्थानी होते.


या वेळी माईर्स एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड व कार्यकारी अध्यक्ष राहुल विश्‍वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, माईर्स एमआयटीचे विश्‍वस्त प्रा.प्रकाश जोशी, कार्यकारी संचालिका प्रा.स्वाती कराड चाटे, कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा कराड नागरे, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ.एन.टी.राव, सौ. उषा विश्‍वनाथ कराड, पं.वसंतराव गाडगीळ आणि राहुल सोलापूरकर हे उपस्थित होते.


रामराजे निंबाळकर म्हणाले,“संत ज्ञानेश्‍वर, संत तुकारामसारख्या अनेक संतांचे कार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत कसे पोहचवता येईल यावर विचार करावा. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान जसे ई बुक्स, सोशल मीडिया सारख्या अन्य साधनांचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागेल. वॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून जाती जातीचे गु्रप्स पहावयास मिळतात. जे समाजात तेढ निर्माण करण्यास कारणीभूत राहू शकतात. अशा वेळेस डॉ. विश्‍वनाथ कराड यांनी केलेल्या जीवन कार्याचा आलेख हेच त्याचे उत्तर राहू शकेल. शून्यातून विश्‍वनिर्माण करणारे डॉ. विश्‍वनाथ कराड हे अध्यात्म, विज्ञान व ज्ञानाची जोड देणारे मूर्तरूप आहेत. यांनी आपल्या अध्यात्मिक विचारांचा कारंजा सर्वसामान्यापर्यंत पोहचवावा.”


“आज समाजात मानसिक व भावनिक ताकद निर्माण करणे गरजेचे आहे. राजकीय व धार्मिक सत्ता एकत्रित आल्या तर समाजाचे कल्याण होईल. ”


मुरलीधर मोहळ म्हणाले,“ पुण्याच्या वैभवात भर घालणारी ही विश्‍वशांती टेकडी म्हणून उदयास येणार आहे. त्यासाठी सर्व कायदेशीर कार्रवाईसाठी मी शक्य तेवढे कार्य करेल. शिक्षणक्षेत्रातील अद्वितीय अशी ओळख निर्माण करणारी एमआयटी संस्थेने शिक्षण, विज्ञान आणि अध्यात्माला जोड देऊन नवीन संगम घडविलेला येथे पाहवयास मिळतो.”


स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज म्हणाले,“ विज्ञानाचे ज्ञान, धनवानांची धनशक्ती आणि नेत्यांचा पुरूषार्थ एकत्र आले तर प्रत्येक गोष्ट यशस्वी होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच तत्वाचा वापर करून ज्ञान, विज्ञान आणि भक्ती यांचे संरक्षण केले. भगवान रामाने सर्वांच्या जीवनाला दिशा दाखविली परंतू त्यानंतर फक्त शिवाजी महाराजांनीच सर्वांनाच दिशा दाखविली. पुरूषार्थाने सर्वच साध्य होते याचे प्रतिक ही दिव्य वाटिका आहे. ज्याचा शुभारंभ विजया दशमीच्या शुभमुहूर्तावर होणे सौभाग्य आहे.”


डॉ. विजय भटकर म्हणाले,“ भारतीय संस्कृती प्राचीन व वैश्‍विक असल्याचे सर्वांना ज्ञात आहे. परंतू येणार्‍या विद्यार्थ्यांना ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्म याचा संगम एकत्र पहायला मिळणार आहे. येणारे जग हे एकीकडे अध्यात्माचे व एकीकडे विज्ञानाचे असेल. त्याच कारंज्याचे प्रतिक येथे आहे. याच्यांच माध्यमातून भविष्यातील संस्कृती व नव पिढी घडणार आहे.”


प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले,“ येथे संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम यांच्या नावाचे ज्ञान कारंजे व विश्‍वशांती कारंजे हे भविष्यात शांती स्थापन करण्यास महत्वाची भूमिका पार पाडेल असा विश्‍वास आहे. या टेकडी वर अध्यात्म आणि विज्ञाचा मेळ दिसून येतो. त्यांचेच विचार हे विश्‍वशांतीसाठी कार्य करतील. येथील कारंज्यामुळे ही टेकडी सुध्दा हिरवळ होईल. स्वामी विवेकानंद यांनी सांगितल्यानुसार २१ व्या शतकात भारत विश्‍वगुरू बनेल याची ही सुरूवात आहे.”


प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड यांनी प्रास्ताविकात सांगितले की, विज्ञान आणि अध्यात्माच्या धागा पकडून येथे हे कारंजे निर्मित करण्यात आले. एमआयटीसाठी ऐतिहासिक या कार्यक्रमाचे नियोजन व याची निर्मिती ही केवळ २७ दिवसांमध्ये केली आहे.


प्रा.गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले व प्रा.डॉ. मंगेश तु. कराड यांनी आभार मानले.