जम्बोतर्फे कोविड निदान ते निवारण, तपासणी ते करोनामुक्तीपर्यंतची तत्पर सेवा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


*'जम्बो' बनले कुष्ठरोग्यांचे कैवारी - कुष्ठरोग्यांसाठी ४० बेड राखीव*


*जम्बो कोविड सेंटरचा अभिनव उपक्रम*


"टेस्टिंग, ट्रीटमेंट टू क्युअर"- 


**


पुणे : कुष्ठरोगाने ग्रासलेल्या व्यक्तींना करोना विषाणूचा संसर्ग झाला तर उपचार कोठे व कोण करणार असा वेगळाच प्रश्न अलीकडे समोर आला. मात्र पुणे महापालिका प्रशासनाने या प्रश्नावर ताबडतोब तोडगा काढून कार्यवाहीदेखील केली. जम्बो कोविड सेंटरमध्ये करोनाबाधित कुष्ठरोग्यांना त्वरीत प्रवेश देण्यात आले. तसेच या ठिकाणी कुष्ठरोग्यांसाठी 40 बेड राखीव ठेवण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली आहे. सध्या येथे 21 कुष्ठरोगाने ग्रासलेल्या व्यक्तींवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जम्बोच्या कार्यकारी अध्यक्ष व अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.


बंडोरावाला कुष्ठरोग निवारण केंद्रातील चार करोनाबाधित व्यक्तींची तपासणी करायची होती. त्यासाठी चार दिवसांपूर्वी महापालिकेचे आरोग्य कर्मचारी गेले. मात्र नेहमीप्रमाणे त्यांची तपासणी करणे शक्य नव्हते, कारण कुष्ठरोगामुळे त्यांची बोटे, कानाची पाळी वगैरे अवयव झडलेले होते. त्यामुळे त्यांची ऑक्सिजन पातळी तपासणेही कठीण होते. तसेच एक्स रे, रक्त तपासणी अशा इतर चाचण्या त्यांच्या संस्थेत केल्या जात नाहीत. त्यांना महापालिकेच्या सहकार्याने रुग्णवाहिकेतून एका मोठ्या रुग्णालयात पाठवले, मात्र काही रुग्णांकडे आधार कार्ड वगैरे लगेच उपलब्ध नसल्याने त्यांना दाखल करून घेण्यात आले नाही. रात्री 11 वाजता ते सर्व करोनाबाधित हताश होऊन कुष्ठरोग केंद्रात परतले... ही व्यथा कोंढवा कोविड सेंटरच्या प्रमुख डॉ. दीप्ती बच्छाव यांनी रात्रीच मेसेज करून अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांना कळवली. 


या प्रकाराची दखल घेत कुष्ठरोगी व्यक्तींबद्दल संवेदनशीलता दाखवणे आवश्यक आहे, त्यांना ताबडतोब जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करून घेण्याचे आदेश श्रीमती अग्रवाल यांनी आम्हाला दिले, असे जम्बोमधील वैद्यकीय प्रमुख डॉ. श्रेयांश कपाले यांनी सांगितले. त्याप्रमाणे संबंधित यंत्रणेला सूचना देऊन रुग्णांना रात्रीच जम्बोमध्ये प्रवेश देऊन त्वरीत पुढील उपचार सुरू करण्यात आले. महापालिकेच्या सहकार्याने जम्बो सेंटरद्वारे आम्ही कोविड निदान ते रोग निवारण अशी संपूर्ण सेवा देत आहोत, असे अग्रवाल यांनी सांगितले. 


याबाबत माहिती मिळताच महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी त्या चार करोनाबाधितांच्या संपर्कातील व बंडोरावाला केंद्रातील सर्व कुष्ठरोग्यांची तपासणी महापालिकेच्या वतीने करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार कोंढवा क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त तानाजी नारळे यांनी पुढील कार्यवाही करून तेथील 128 कुष्ठरोगग्रस्त व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एकूण 21 व्यक्ती करोनाबाधित आढळून आल्या. 


महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत महापालिका प्रशासनाचे अभिनंदन केले. तसेच, याबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, महापालिका प्रशासन व जम्बो सेंटरने कुष्ठरोग्यांबद्दल दाखवलेली संवेदनशीलता व तत्परता कौतुकास्पद आहे. कोणत्याही करोनाबाधित व्यक्तीस प्रवेश नाकारला जाणार नाही. जम्बो सेंटर ही सेवा सर्वांसाठी खुली आहे.