स्टार प्रवाह वाहिनी ठरलीय महाराष्ट्र आणि गोव्यातील लोकप्रिय वाहिनी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल पुणे :- दर्जेदार मालिका आणि प्रेक्षकांना गुंतवून ठेवणाऱ्या कथानकाच्या माध्यमातून स्टार प्रवाहने नुकत्याच चार नव्या मालिका सादर केल्या. या मालिकांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. याचीच प्रचिती म्हणून महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये स्टार प्रवाह वाहिनीने २९२ दशलक्ष इम्प्रेशन्स पटकावले आहेत.


१३ जुलैपासून स्टार प्रवाहवरील वाहिन्यांचे नवे आणि मनोरंजनाने परिपूर्ण भाग सुरु झाल्यानंतर स्टार प्रवाह वाहिनीचा प्रभाव विशेष करुन दिसून आला. यामध्ये सुख म्हणजे नक्की काय असतं, देवा श्री गणेशा, फुलाला सुगंध मातीचा आणि मुलगी झाली हो या मालिकांचा उल्लेख करावा लागेल. या मालिकांमुळे महाराष्ट्रातील मराठी मनोरंजन वाहिन्यांमध्ये स्टार प्रवाह वाहिनी सर्वात जलद गतीने वाढणारी वाहिनी ठरली आहे. या दर्जेदार मालिकांमुळेच स्टार प्रवाहच्या यशाचा आलेख १२१%**ने चढताच राहिला.


स्टार इंडिया- रिजनल एण्टरटेन्मेण्टचे सीईओ केविन वाज म्हणाले, स्टार प्रवाहने नेहमीच मराठी भाषिक प्रेक्षकांना मनोरंजनाचा निवडक ठेवा सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल नक्कीच आनंद आहे. कथानकातल्या गुणवत्तेमुळेच प्रेक्षकांसोबत नवं नातं जोडण्यास आम्हाला मदत झाली आहे. हे बंध असेच दृढ होत जातील यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.


ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात स्टार प्रवाहवर चार नव्या मालिका दाखल झाल्या. त्यापैकी गणपती बाप्पाच्या ११ लोकप्रिय कथांवर आधारित असलेली ‘देवा श्री गणेशा’ ही मालिका, हृदयस्पर्शी कथानक असणारी आणि खरं सुख म्हणजे काय याची प्रचिती देणारी ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका, ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका ज्यामध्ये स्वप्नांना गवसणी घालू इच्छिणाऱ्या अश्या एका दृढनिश्चयी मुलीची कथा आहे जिची स्वप्न पूर्ण करण्यात तिला तिच्या नवऱ्याची साथ हवीय, आणि वडिलांच्या प्रेमाची आस असलेल्या मुक्या मुलीची करुणामय कहाणी सांगणारी ‘मुलगी झाली हो’ ही मालिका. अश्या चार वेगळ्या धाटणीचं कथानक असलेल्या मालिकांचा सहभाग आहे.


यासोबतच आनंदाची गोष्ट म्हणजे ज्योतिबाचं महात्म्य सांगणारी ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ ही भव्यदिव्य मालिका स्टार प्रवाहवर सुरु होणार आहे. ज्योतिबा हे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत. २३ ऑक्टोबरपासून सायंकाळी ६.३० वाजता घरबसल्या आपल्या लाडक्या दैवताचं दर्शन प्रेक्षकांना घेता येईल. या मालिकेच्या निमित्ताने स्टार प्रवाहच्या प्राईम टाईममध्ये आणखी एक स्लॉट वाढणार आहे.


ऑक्टोबर २०१९ मध्ये भेटीला आलेल्या ‘रंग माझा वेगळा’ आणि ‘आई कुठे काय करते’ या मालिकांनीही प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप सोडली आहे. यासोबतच ‘मी होणार सुपरस्टार’ हा कथाबाह्य कार्यक्रमही गेल्या २ वर्षांतील मराठी मनोरंजन वाहिन्यांमधील सर्वोत्कृष्ट गाण्याचा कार्यक्रम ठरला आहे.