ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोना मुळे सातारा येथे दुःखद निधन झाले 🌺🌷🌹💐💥🌸🌹🌷🌻💐🌺💥 सा. पुणे प्रवाह परिवारा कडून भावपूर्ण श्रद्धांजली 🌸🌺🍿🌹💥🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


*


ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे दिनांक २२ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ४.४५ वाजता सातारा येथील प्रतिभा रुग्णालयात कोरोना मुळे दुःखद निधन झाले. अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्या सहीत काळूबाईच्या नावानं चांगभलं या मालिकेच्या चित्रीकरणासाठी सेटवर आलेल्या २७ जणांना कोरोनाची लागण झाली होती. अचानक आशालता वाबगावकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजताच त्यांना तातडीने प्रतिभा रुग्णालयात दाखल केले.त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. परंतु प्रकृती जास्त बिघडलल्याने आशालता वाबगावकर यांनी प्रतिभा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.


ज्येष्ठ अभिनेत्रीआशालता वाबगावकर यांचा 


जन्म २ जुलै १९४१ रोजी झाला.


आशालता नाईक हे आशालता वाबगांवकर यांचे माहेरचे नाव.


 ‘दि गोवा हिंदू असोसिएशन’ या संस्थेने महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत सादर केलेल्या ‘सं. संशयकल्लोळ’ या नाटकातील रेवतीच्या भूमिकेतून आशालता वाबगावकर यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. या नाटकाचे गोपीनाथ सावकार हे दिग्दर्शक होते. रेवतीच्या भूमिकेसाठी मुलींचा शोध चालू झाला. काहींची भाषा योग्य नव्हती, काहींना रेवतीचे सौंदर्य नव्हते, तर काहींना गाण्याचे अंग नव्हते. मुंबई आकाशवाणीवर त्या काळी कोकणी विभागात असणारे विष्णू नाईक यांनी आशालता नाईक या मुलीचे नाव सुचवले. आकाशवाणीवर त्यांनी या मुलीची भाषा ऐकली होती. गाणेही ऐकले होते. 


घरात स्कर्ट घालणारी ही षोडशवर्षा मुलगी साडी नेसून चाचणीला आली आणि एकही प्रश्न न विचारता सावकारांनी तिची निवड केली. सर्व जण अवाक झाले. सावकारांना विचारताच ते म्हणाले, ‘तिचा नाकाचा शेंडा फार बोलका आहे. ही मुलगी रंगभूमीवर नाव काढील.’ त्यांची निवड योग्य ठरली. संस्थेने स्पर्धेत सादर केलेल्या ‘संगीत संशयकल्लोळ’, ‘संगीत शारदा’ व ‘संगीत मृच्छकटीक’ या तिन्ही नाटकांत अनुक्रमे रेवती, शारदा व वसंतसेना या भूमिकांसाठी दर वर्षी आशालता वाबगावकर यांना उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले. त्यांनी साकार केलेल्या भूमिका अद्यापि लोकांच्या स्मरणातून गेलेल्या नाहीत. पं. गोविंदराव अग्नींनी त्यांची सर्व गाणी पारंपरिक पद्धतीने बसवली होती. त्यांची वसंतसेनेची भूमिका पाहूनच प्रा. वसंतराव कानेटकरांनी ‘हीच माझी मत्स्यगंधा,’ असे उद्गार काढले होते. म्हणून आशालता वाबगावकर या आपल्या दोन्ही गुरूंचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करत असत.


नाट्यस्पर्धांतून बक्षिसे मिळविणारी आशालता वाबगावकर सर्वार्थाने रसिकांच्या मनात कायमची जाऊन बसल्या, त्या त्यांच्या मत्स्यगंधेच्या भूमिकेने. या नाटकात संवादाबरोबरच संगीताची परीक्षा त्यांना प्रेक्षकांसमोर द्यायची होती. जितेंद्र अभिषेकी या नव्या दमाच्या कल्पक संगीत दिग्दर्शकाचेही ते पहिलेच नाटक. त्यामुळे एक वेगळा तणाव आशाच्या मनावर येणे स्वाभाविक होते. अभिषेकींनी आपल्या कौशल्याने त्यांच्या गळ्यात चपखल बसतील, अशा चाली अलगदपणे तिच्या गळ्यात उतरवल्या. आशालता वाबगावकर यांनीही परिश्रमपूर्वक या चालींचे सोने केले. कुठलीही भूमिका साकारताना त्यासाठी अपार कष्ट घेण्याची त्यांची तयारी होती. म्हणूनच ‘भावबंधन’ नाटकात चित्तरंजन कोल्हटकर (घनश्याम) व प्रसाद सावकार (प्रभाकर) यांसारख्या मुरलेल्या अनुभवी कलाकारांबरोबर आपल्याला लतिकेची भूमिका करावी लागणार आहे, हे समजल्यावर त्यांनी, त्या मा. नरेश यांना आपल्या घरी येऊन तालीम देण्याची विनंती केली. मा. नरेश यांनी प्रकृती अस्वस्थ असूनसुद्धा पंधरा दिवस आशाताईंच्या घरी राहून त्यांना या भूमिकेचे बारकावे समजावून दिले होते. दुर्दैवाने अल्पावधीतच त्यांचे निधन झाल्यामुळे मा.नरेश त्यांचा प्रयोग मात्र पाहू शकले नाहीत.


पहिल्यांदाच रंगभूमीवर येणाऱ्या नाटकात एखादी भूमिका साकार करणे हे जितके कठीण असते, त्याहीपेक्षा पूर्वी रंगभूमीवर येऊन गेलेल्या व प्रेक्षकांच्या मनात स्थिर होऊन राहिलेल्या, दुसऱ्या कलाकाराने साकारलेल्या भूमिका करणे हे अति अवघड असते; कारण प्रेक्षकांच्या नजरेसमोर तरळत असलेल्या पूर्वीच्या अभिनेत्रीच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कौशल्याचा प्रभाव स्वत:च्या भूमिकेने पुसून टाकणे हे आव्हान असते व ते पेलण्यासाठी धाडस लागते, जबर आत्मविश्वास लागतो. आशाताईंनी हे आव्हान अनेक वेळा यशस्वीरीत्या पेललेले होते. यात ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ मधील येसूबाई (सुधा करमरकर), ‘गारंबीचा बापू’मधील राधा (उषा किरण), ‘गुंतता हृदय हे’मधील कल्याणी (पद्मा चव्हाण) आणि ‘भाऊबंदकी’नाटकात त्यांनी आनंदीबाईची भूमिका केली होती. ही भूमिका आधी दुर्गाबाई खोटे करीत असत. दाजी भाटवडेकर (राघोबादादा), मा. दत्ताराम (रामशास्त्री) अशा कसलेल्या अनुभवी कलाकारांबरोबर काम करणे सोपी गोष्ट नव्हती. नटश्रेष्ठ केशवराव दाते यांनी आशाताईंना आनंदीबाईच्या स्वभावाचे कंगोरे समजावून सांगितले होते, मार्गदर्शन केले होते. आनंदीबाई ही राजकारण कोळून प्यालेली, आपल्या सौंदर्यावर आपला नवरा पूर्णपणे भाळलेला आहे हे जाणणारी, महत्त्वाकांक्षी स्त्री. ‘या नाटकात डोळ्यांचा आणि शब्दांचा उपयोग करा, शब्द प्रेक्षकांच्या उरी घुसले पाहिजेत,’ असा कानमंत्र दाते यांनी आशाताईंना दिला होता. एका प्रवेशात नारायणरावांची गारद्यांच्या हातून हत्या होताना आनंदीबाई पाहते आणि लगेच बाकी सर्वांच्या समोर त्यांचे प्रेत पाहून रडवेली होते, असा क्षणात मुद्राभिनय बदलण्याचा प्रसंग होता. साताऱ्याला या प्रसंगानंतर त्यांच्यावर प्रेक्षकांतून चप्पल फेकली. त्या क्षणभर नर्व्हस झाल्या. भाषण आठवेना. रामशास्त्रीच्या भूमिकेतील मा. दत्ताराम जवळच उभे होते. ते म्हणाले, ‘मुली, ही तुझ्या अभिनयाला दिलेली दाद आहे. पुढचं वाक्य बोल.’ या व अशा भूमिकांमुळे आशा आणि आव्हान हे रंगभूमीवरचे समीकरणच झालेले असावे.


दि गोवा हिंदू असोसिएशन, चंद्रलेखा, अभिजात, मुंबई मराठी साहित्य संघ, माउली प्रॉडक्शन्स व आय.एन.टी. अशा सहा संस्थांमधून त्यांनी जवळजवळ पन्नासहून अधिक नाटकांचे हजारो प्रयोग केले. चंद्रलेखा या संस्थेत त्यांनी सर्वाधिक नाटके केली. ‘घरात फुलला पारिजात’मध्ये चंद्रलेखा, ‘आश्चर्य नंबर दहा’ मध्ये विमला, ‘विदूषक’ मध्ये अंजली, ‘गरुडझेप’मधील सत्तरी ओलांडलेली राजमाता जिजाबाई आणि ‘वाऱ्यावरची वरात’मधली तारस्वरात कन्नड भाषेचे हेल काढून बोलणारी कडवेकर मामी अशा भिन्नभिन्न स्वभावाच्या भूमिकांमधून आशाताईंनी आपले नाट्यनैपुण्य प्रकर्षाने प्रगट केलेले आहे. ‘वाऱ्यावरची वरात’ या नाटकात खुद्द पु.लं.च्या बरोबर काम करायला मिळणे हा त्या आपल्या आयुष्यातील भाग्ययोग मानत असत.


‘गुड बाय डॉक्टर’ या नाटकाच्या शंभराव्या प्रयोगाच्या वेळी त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. पायाला बँडेज केले होते. असह्य वेदना होत होत्या. त्यामुळे हालचाली करणे कठीण झाले होते. शंभरावा प्रयोग रद्द करणे योग्य नसल्यामुळे त्या तशाही परिस्थितीत भूमिका करण्यासाठी तयार झाल्या. प्रयोग सुरू होण्याअगोदर त्यांनी ही परिस्थिती प्रेक्षकांना समजावून सांगितली. 


आपली भूमिका नेहमीप्रमाणे होऊ शकत नसल्यामुळे ज्यांना पैसे परत पाहिजेत, त्यांना ते देण्याची संस्थेने तयारी दाखविली; पण एकाही प्रेक्षकाने पैसे परत घेतले नाहीत. 


आशालता वाबगावकर यांनी अनेक हिंदी मराठी चित्रपटात अभिनय केला होता. 


दूरदर्शनवर आशालता वाबगावकर यांनी एका कोकणी नाटकात भाग घेतला होता. त्यातील त्यांचा अभिनय बघून नामांकित चित्रपट दिग्दर्शक बासू चटर्जी यांनी त्यांच्याबद्दल चौकशी केली. त्यांचे ‘गुंतता हृदय हे’हे नाटक पाहिले आणि ‘अपने पराये’ या आपल्या चित्रपटात त्यांना भूमिका दिली. अमोल पालेकर, गिरीश कार्नाड यांच्यासारख्या चित्रपटसृष्टीत मुरलेल्या कलाकारांबरोबर काम करण्याची संधी त्यांना पदार्पणातच मिळाली होती. त्यांनी चित्रपट तंत्राची मुळाक्षरे बासुदांसारख्या दिग्दर्शकाच्या हाताखाली गिरवल्यामुळे नंतर केलेल्या जवळजवळ दोनशेहून अधिक हिंदी व पन्नासहून अधिक मराठी चित्रपटांचा प्रवास सोपा झाला. आशाताई कधी स्तुतीने भाळल्या नाहीत किंवा निंदेने चळल्या नाहीत. रंगभूमीवर किंवा चित्रपटात डोळ्यांत पाणी आणण्यासाठी त्यांना कधी ग्लिसरीनचा वापर करावा लागला नाही, असे त्या अभिमानाने सांगतात. स्टेजवर नुसते रूप असून भागत नाही. आपण बोललेले शब्द प्रेक्षकांच्या मनाला गोड वाटले पाहिजेत. चेहरा बोलला पाहिजे. भूमिकेशी एकरूप व तन्मय झाले म्हणजे प्रेक्षक तुमचा अभिनय स्वीकारतात. प्रेक्षक हुशार असतात. त्यांना अस्सल व नक्कल यांतला फरक लगेच समजतो. याच प्रेक्षकांनी आपला अभिनय गोड मानून घेतला आणि आपल्याला उदंड प्रेम दिले, याबद्दल त्या त्यांचे ऋणही व्यक्त करत असत.त्यांच्या जाण्याने हळ हळ व्यक्त केली जात आहे. हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतील,मालिका आणि नाट्य क्षेत्रातील अनेक मान्यवर निर्माते, कलावंत, तंत्रज्ञांनी


ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर 


🌺🌷🌹💐💥🌸🌹🌷🌻💐🌺💥 सा. पुणे प्रवाह परिवारा कडून भावपूर्ण श्रद्धांजली 🌸🌺🍿🌹💥🙏🙏🙏🙏🙏🙏🙏