बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे राज्यस्तरीय बँकिंग समितीच्या १४८ व्या बैठकीचे आयोजन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



पुणे, २ सप्टेंबर २०२०: श्री. हेमंत टम्टा, महाराष्ट्र बँकेचे कार्यकारी संचालक आणि राज्यस्तरीय बँकिंग समितीचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बँकिंग समितीची १४८ वी त्रैमासिक बैठक घेण्यात आली. पीक कर्ज वितरणाची प्रगती, आर्थिक वर्ष २०२०-२१ दरम्यान कर्जपुरवठा, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, (MJPSKY) कर्जमाफी योजना २०१९ आणि आत्मनिर्भर भारत पॅकेजमधील विविध आर्थिक योजना यांची कार्यवाही इत्यादी विषयांवर बैठकीत चर्चा झाली.


सु.श्री. वंदिता कौल सहसचिव, आर्थिक सेवा विभाग भारत सरकार; महाराष्ट्र राज्याचे प्रमुख सचिव, तसेच महाराष्ट्र सरकार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नाबार्ड, सदस्य बँका, आणि लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर्स (एलडीएम) यांचे वरिष्ठ अधिकारी हे या बैठकीस उपस्थित होते.


बैठकीमध्ये महाराष्ट्र शासनाने राज्यातील बँकांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांना कोविड-१९ मुळे झालेल्या लॉकडाऊनमध्येही सतत आधार दिल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. १५ ऑगस्ट २०२० रोजी पीक कर्ज वितरण निर्धारित लक्ष्याच्या ५९% इतके होते जे गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक होते. मात्र महाराष्ट्र शासनाने राज्यातील बँकांना खरीप हंगामाच्या उर्वरित कालावधीत पीक कर्जाचा अधिक पुरवठा करण्याचे आवाहन केले. तसेच महाराष्ट्र शासनाने महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना व २०१९ कर्जमाफी यांच्या पात्र लाभार्थींना ३० सप्टेंबर २०२० पर्यंत त्वरित कर्जपुरवठा करण्याचा आग्रह केला. चांगला पाऊस, MJPSKY योजना मुळे लाभार्थी शेतकऱ्यांचे मागील देणे निरंक होणे, आणि भारत सरकारने आत्मनिर्भर, भारत अंतर्गत जाहीर केलेले आर्थिक पॅकेज इ. यामुळे सदस्य बँकांना गुंतवणूक कर्जासाठी वित्तपुरवठा वाढविण्याची संधी मिळत आहे.


श्री बाळासाहेब टाव्हरे उपमहाव्यवस्थापक व सदस्य सचिव राज्यस्तरीय बँकिंग समिती, महाराष्ट्र यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. श्री. प्रमोद दातार महाव्यवस्थापक व राज्यस्तरीय बँकिंग समितीचे निमंत्रक यांनी बैठकीच्या कार्याचे संचालन केले. श्री. भरत बर्वे सहाय्यक महाव्यवस्थापक यांनी आभार प्रदर्शन केल्यावर बैठकीचा समारोप झाला.