पदव्युत्तर शिक्षणासाठी १०० विद्यार्थ्यांना 'सूर्यदत्ता'तर्फे १०० टक्के शिष्यवृत्तीची घोषणा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल पुणे : "सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने उच्च शिक्षणासाठी (पदव्युत्तर अभ्यासक्रम) १०० विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित एमएस्सी (संगणकशास्त्र), एमकॉम, एमबीए, अखिल तंत्रशिक्षण महामंडळ संलग्नित पीजीडीएम आणि मास्टर इन फाईन आर्टस् व पदव्युत्तर डिप्लोमा (अर्धवेळ) या पाच अभ्यासक्रमांना प्रत्येकी २० याप्रमाणे १०० विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळणार आहे, कोरोना संसर्गामुळे ओढवलेल्या आर्थिक संकटात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, त्यांचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या एज्यु-सोशियो कनेक्ट & सीएसआर इनिशिएटिव्ह' अंतर्गत ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. ३० सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांनी अर्ज करायचा आहे," अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी 'सूर्यदत्ता'चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. डॉ. शैलेश कासांडे, कार्यकारी संचालक प्रा. सुनील धाडीवाल, प्राचार्य अजित शिंदे, विभागप्रमुख मंदार दिवाने आदी उपस्थित होते.


 


प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, "कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन लागले. त्याचा मोठा आर्थिक फटका सर्वच स्तरातील लोकांना बसला. शिक्षण क्षेत्रावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. आर्थिक संकट ओढावल्याने अनेकांनी यंदाच्या वर्षाकरिता उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्याचे टाळण्याचा विचार करत आहेत. शिकण्याची इच्छा असूनही केवळ आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, या विचारातून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ही शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय आम्ही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला. एमएस्सी (संगणकशास्त्र), एमकॉम, एमबीए, पीजीडीएम आणि मास्टर इन फाईन आर्टस्, पदव्युत्तर डिप्लोमा (अर्धवेळ) हे सगळे अभ्यासक्रम व्यवसायाभिमुख आणि रोजगाराभिमुख आहेत. त्यामुळे हे अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थी चांगली नोकरी मिळवू शकतात किंवा स्वतःचा व्यवसाय उभारू शकतात. आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊन विद्यार्थी व पालकामध्ये नैराश्याची भावना येऊ नये, हाही यामागील उद्देश आहे. सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट दर्जेदार, संशोधनात्मक शिक्षण, सर्वांगीण विकास आणि तज्ज्ञ व्यवस्थापन असलेली शिक्षण संस्था म्हणून ओळखली जाते. सोबतच सामाजिक जागरूकता जपत विविध उपक्रम संस्थेत राबवले जातात."


     "या अभ्यासक्रमांचे शुल्क साधारणपणे ३० हजार ते २.५० लाख इतके आहे. १०० विद्यार्थ्यांचे एकत्रित शुल्क साधारणपणे एक ते दीड कोटी इतके असणार आहे. या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम झालेल्या नोकरदारांच्या मुलांसाठी, नोकरी गेलेल्यांच्या मुलांकरिता, हमाल पंचायत, स्वच्छ संस्था, बांधकाम मजूर, अल्प उत्त्पन्न गटातील नागरिकांच्या मुलांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल. यासह कोरोनामध्ये फ्रंटलाईनवर काम करणारे सर्व कोरोना वॉरियर्सची मुले, डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, शहीद जवान यांची मुले, अनाथ मुलांसह आर्थिक मागास वर्गातील कोणत्याही मुलाला या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल. विद्यार्थी सहायक समिती, पुणे विद्यार्थी गृह, पुणे श्रमिक पत्रकार संघ, जनसेवा फाउंडेशन, लीला पुनावाला फाउंडेशन यांसारख्या संस्थांकडून आलेल्या शिफारशींचा विचार शिष्यवृत्तीसाठी केला जाणार आहे. समाजातील विविध संस्थांना अशा गरजू विद्यार्थ्यांना आमच्यापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करत आहोत." असेही डॉ. संजय चोरडिया यांनी सांगितले.


 


प्रा. डॉ. शैलेश कासंडे म्हणाले, "या शिष्यवृत्ती योजनेत अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२० अशी आहे. विविध संस्थांकडून आलेल्या, तसेच ऑनलाईन स्वरूपात आलेल्या अर्जाची तज्ज्ञ समितीकडून छाननी करून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. अधिक माहिती व नमुना अर्ज www.suryadatta.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ८९५६९३२४००/ ९७६३२६६८२९ यावर संपर्क साधावा."


-------------------------------


पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मुलाचा


शैक्षणिक खर्च 'सूर्यदत्ता' करणार


पत्रकार पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे नुकतेच दुर्दैवी निधन झाले. त्यांना चार वर्षाचा मुलगा व अडीच वर्षांची मुलगी आहे. त्यांच्या मुलाचा दहावीपर्यंच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने केला जाणार आहे. तो मुलगा जिथे शिकेल, ज्या शाळेत शिकेल तिथला संपूर्ण खर्च सूर्यदत्ता करणार असल्याचे डॉ. संजय चोरडिया म्हणाले. त्याचबरोबर पत्रकारांच्या मुलांना ही शिष्यवृत्ती मिळणार असून, त्यासाठी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षांची शिफारस घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.