पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पारनेर : विविध मिठाईच्या दुकानांमध्ये ट्रेमध्ये विनापॅकिंग ठेवण्यात येणारी खुली मिठाई, दुधापासून बनविलेले पदार्थ यांच्या ट्रेसमोर त्या पदार्थाची एक्सपायरी डेट (मुदतीची तारीख) टाकण्याचे केंद्र सरकारच्या अन्न व पुरवठा विभागाने बंधनकारक केले आहे.
१ आॅक्टोबरपासून याची अंमलबजावणी करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत.
विनापॅकिंग असणारा पदार्थ कधी बनविला आहे किंवा बनविल्यापासून तो किती दिवस खाण्यासाठी उपयुक्त आहे हे ग्राहकांना माहिती नसते.
ट्रेमधील मिठाई व अन्न पदार्थ विक्री केले जातात. उघड्यावर ठेवलेली मिठाई, शिळे अन्न पदार्थ खाल्ल्याने विषबाधा होण्याचे प्रकार घडतात.
मुदत संपत असल्याची तारीख लिहिल्यास खराब मिठाईची विक्री होणार नाही. याबाबतचे आदेश केंद्र सरकारच्या अन्न व पुरवठा विभागाने काढले आहेत.
मिठाई दुकानांमध्ये मिठाई किंवा इतर अन्न पदार्थांची उघड्यावर विक्री होते. त्यांना आता या पदार्थांच्या ट्रेसमोर एक्सपायरी डेट लिहिणे बंधनकारक असेल. हा चांगला निर्णय असून राज्यात त्याची कडक अंमलबजावणी केली जाईल.